एक प्रकारचे गवत. गवताच्या पोएसी कुलातील ११५ प्रजातींमध्ये बांबूच्या १,४५० पेक्षा अधिक जाती आहेत. कांडे असलेले, गोल, बहुधा पोकळ, गुळगुळीत व काष्ठयुक्त खोड हे बांबूचे वैशिष्ट्य आहे. बांबूचा व्यास ३० सेंमी.पर्यंत वाढू शकतो, तर उंची काही सेंमी. ते ४० मी.पर्यंत वाढू शकते. बांबूचे उगमस्थान आशिया आहे, असे मानतात. जगातील उष्ण ते थंड तापमान असलेल्या प्रदेशांत त्याचा प्रसार झालेला दिसून येतो. भारतात बांबूच्या १० जाती आढळतात. भारताच्या पश्‍चिम व दक्षिण भागांत तो नैसर्गिकरीत्या वाढलेला आढळतो. गंगेचे खोरे, हिमालयाचा काही भाग व इतर प्रदेशांत त्याची पद्धतशीर लागवड होते. हिमालयात समुद्रसपाटीपासून ३,१०० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. आफ्रिकेच्या उष्ण भागात बांबूच्या कमी जाती आढळतात, तर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वतात हिमरेषेपर्यंत तो दिसून येतो. महाराष्ट्रात बांबूच्या ऑक्सिटेनँथेरा स्टॉक्साय आणि ऑक्सिटेनँथेरा रिचेयी या दोन जाती प्रामुख्याने आढळतात.

बांबू: (१) बांबूच्या बेटाचा काही भाग; (२) बांबूची फुले

बांबू ही बहुवर्षायू वनस्पती असून जमिनीतील कोंबापासून तिची वाढ होते. ते नेहमी बेटांच्या रूपात एकत्र वाढतात. त्यांच्या मुळांचे जाळे दाट असून त्यामुळे जमिनीची धूप थांबते. बांबूत कांडी असतात आणि दोन कांड्यांच्या प्रत्येक सांध्यापाशी भक्कम व जलाभेद्य पडदा असतो. खोडाला बहुधा फांद्या फुटत नाहीत. मात्र काही पूर्ण वाढीच्या पक्व बांबूंना आडव्या फांद्या येतात व त्यांना तलवारीच्या आकाराची पाने असतात. पाने साधी, लांबट, अरुंद, टोकदार, गुळगुळीत, चमकदार आणि गडद हिरवी असतात. पानाला लहान देठ असतो. बांबूचा जमिनीकडचा भाग पानांनी वेढलेला असतो; मात्र ही पाने लगेच गळतात. फुले गवतांच्या फुलांसारखी बारीक असून त्यांचे गुच्छ असतात. त्यांना आयुष्यात एकदाच फुले येतात आणि ती आल्यानंतर बांबू मरून जातात. बहुतेक बांबूंना क्वचितच दरवर्षी फुले येतात. काही बांबूंना ६५ वर्षांनी, तर काही मोजक्या बांबूंना १३० वर्षांनी फुले येतात.  भारतात बांबूंना ३२ व ६० वर्षांनी फुले येतात आणि ती सर्वत्र एकाच वेळी येतात. अशी वनस्पती इतरत्र नेऊन लावली, तरी तिला त्याच वेळी फुले येतात. फळे शुष्क व कणस्वरूप असतात. बांबूच्या बिया भाताप्रमाणे शिजवून खातात. फळे व बिया दुर्मिळ असल्याने बांबूची लागवड मुनवे व कलमे लावून करतात.

बांबूची वाढ अतिशय जलद होते. त्याची सर्वसाधारणपणे २४ तासांत सु. ७ सेंमी. उंची वाढते. त्याच्या काही जाती तर दिवसात ४०–६० सेंमी. वाढतात. अशा रीतीने काही महिन्यांत बांबूची वाढ पूर्ण होते. त्यांचा सभोवती होणारा प्रसारही जलदपणे होतो. बांबूमध्ये दरवर्षाची वाढ दर्शविणाऱ्या वृद्धिवलय रेषा नसतात.

बांबू मनुष्याला अतिशय उपयुक्त असून त्याचे अनेक उपयोग आहेत. कठीण पाठीचे बांबू भक्कम व टिकाऊ असल्यामुळे ते बांधकामासाठी उपयोगी पडतात. मांडव व पराती बांधण्यासाठी बांबू वापरतात. टोमॅटोसारख्या वनस्पतींना आधार द्यावयाच्या काठ्या, मासेमारीसाठी लागणाऱ्या काठ्या तसेच कुंपण, लाठ्या, खुंटा इत्यादींसाठी लहान व बारीक बांबू वापरतात. बुरुडकामात बांबूचा मोठा वापर होत असून टोपल्या, करंड्या, हारे, सुपे, कणग्या, पंखे, चटया, पडदे इ. वस्तू त्यापासून तयार करतात. पतंगाच्या कामट्या व फिरक्या अशा काही वस्तू त्यापासून बनवितात. जहाज बांधणीतही बांबू वापरतात; उदा., डोलकाठ्या, वल्ही, तराफे वगैरे. कठीण बांबूपासून सुऱ्या, तसेच इतर हत्यारे तयार करतात. त्यापासून स्वयंपाकघरातील काही साधने व फर्निचर तयार करतात. संपूर्ण घर, अंतर्गत सजावट, जमीन, छत, वासे, विभाजक पडदे, सजावटीचे सामान इत्यादींसाठी बांबू वापरतात. त्यापासून तक्ते, फळ्याही बनवितात. चपला, बूट, पेन, नळ्या, दारे, छत्र्यांचे दांडे, धनुष्यबाण, बैलगाड्या आणि कोंबड्यांचे व डुकरांचे पिंजरे तयार करण्यासाठी बांबू वापरतात. कागद तयार करण्यासाठी  त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. बांबूची कोवळी पाने गायीगुरांना खाऊ घालतात, तर त्याचे कोवळे भाग शिजवून खातात. कोवळ्या बांबूचे लोणचे घालतात वा त्याची चटणी तयार करतात.

चीनमध्ये उच्च दर्जाचा कागद बनविण्यासाठी बांबूच्या आतील नरम व मऊ भाग वापरतात. तसेच बांबूच्या बिया शिजवून खातात. भारतात बासरी तसेच जावा व इंडोनेशिया येथे बासरी व झायलोफोनसारखे वाद्य बनविण्यासाठी बांबू वापरतात. जपानमध्ये बांबूचा उपयोग नळाप्रमाणे करतात तर शोभेसाठी कमी उंचीचा बांबू कुंडीत लावतात. त्याची हिरवी व दाट पाने सुंदर दिसतात. चीन आणि जपान या देशांत ३-३·५ मी. उंचीचे व ३ सेंमी.पर्यंत चौरसाकृती छेदाचे बांबूचे खास पीक घेतात. असे बांबू मंदिरांचे सभामंडप व बागा यांमध्ये शोभेसाठी वापरतात. चीनमध्ये बांबूच्या पानांचा काढा अतिसार व हगवण यांवर देतात. भारतामध्ये अनेक भागांत बांबूच्या कोवळ्या भागांचा उपयोग श्‍वसनविकारावर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा