माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या रक्तावर पोसणारा एक परजीवी कीटक. ढेकणाचा समावेश संधिपाद संघातील कीटकांच्या हेमिप्टेरा गणातील सायमिसिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव सायमेक्स लेक्ट्युलॅरियस आहे. तो जगभरातील उष्ण प्रदेशांत आढळतो. ढेकणाला येणारा विशिष्ट वास त्याच्या गंध ग्रंथीतून निघालेल्या स्रावामुळे येतो. हेमिप्टेरा गणातील प्राण्यांचे ते वैशिष्ट्य आहे.

ढेकूण (सायमेक्स लेक्ट्युलॅरियस)

प्रौढ ढेकणाचा रंग गडद तपकिरी असतो. शरीर चपटे आणि लंबवर्तुळाकार असते. शरीराची लांबी ४–५ मिमी. आणि रुंदी १.५–३ मिमी. असते. अंगावर सूक्ष्म रोमकांचे पट्टे असतात. पंख अविकसित स्वरूपात असतात. ढेकणाची मुखांगे आश्रयी प्राण्याच्या शरीरात खूपसून रक्त पिण्यासाठी सोंडेत रूपांतरित झालेली असतात. जिभेचा डावा आणि उजवा भाग एकत्र आणल्यावर दुहेरी नलिका तयार होते. यातील अधर (खालच्या) नलिकेतून ढेकूण आश्रयीच्या शरीरात लाळ सोडून वरच्या नलिकेतून आश्रयीचे रक्त ओढून घेतो. ही लाळ मर्यादित क्षेत्रात बधिरता आणू शकते आणि आश्रयीचे रक्त साकळण्यापासून रोखते. आश्रयी शोधताना ढेकूण आश्रयीच्या उबेचा आणि कार्बन डायऑक्साइडचा आधार घेतो.

ढेकूण हा निशाचर नसून आश्रयीचे सान्निध्य लाभले तर तो केव्हाही रक्त पितो. ४–५ दिवसांत एकदा रक्त प्यायला मिळाले की त्याचे काम भागते. तो रक्त पिऊन ५–१० मिनिटांत फुगतो. त्यानंतर तो सहा महिने ते एक वर्ष इतका काळ अन्नाविना राहू शकतो. ढेकूण चावलेल्या ठिकाणी त्वचेवर स्फुटन उद्भवते; क्वचित प्रसंगी पुरळ उठते. अशा व्यक्तीला अधिहर्षतेचा (अलर्जीचा) त्रास होऊ शकतो.

ढेकणामध्ये प्रजनन संस्था विकसित झालेली असते. प्रजननाच्या वेळी नर ढेकूण आपली जननेंद्रिये मादीच्या उदर भागातील त्वचेमध्ये कोणत्याही ठिकाणी खुपसून तिच्या रुधिर गुहेमध्ये (हिमोसील) शुक्रपेशी सोडतो. तेथून शुक्रपेशी मादीच्या शुक्रग्राहिका पेशीपर्यंत पोहत जाऊन पोहोचतात व अंडकोशातील अंडपेशींचे फलन करतात. सामान्य तापमानाला व मुबलक अन्नपुरवठा असताना मादी दिवसाला ३–४ या हिशोबाने सु. २०० अंडी घालते. अंडी लांबट व पांढरी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ही अंडी लाकडी सामानाच्या फटीत चिकटलेली दिसून येतात. साधारणपणे ६–१५ दिवसांत अंडी फुटून पिले बाहेर पडतात. त्यातून बाहेर पडणारी अर्भके लहान, पांढरी आणि अर्धपार्य असतात. एकूण सहा वेळा कात टाकून प्रत्येक वेळी थोडी वाढ होऊन त्यांचे प्रौढावस्थेत रूपांतर होते.

मुख्यत: माणूस हा ढेकणाचा आश्रयी असला तरी पक्षी, पाकोळ्या वगैरे अन्य उष्ण रक्ताच्या प्राण्यांचे रक्तही तो पितो. झोपण्याचे पलंग, खुर्च्या, टेबले, कपाटे, भिंतीवरील खड्डे, भेगा, शाळांतील बाकडी, चित्रपटगृहातील आसने, मोटार व आगगाड्यांची आसने अशा ठिकाणी ढेकणाचे वसतिस्थान असते. त्याच्या चपट्या आकारामुळे अगदी लहान फटीतही ते मोठ्या संख्येने दडून राहतात.

हवामानातील बदल, विशेषेकरून तापमानातील चढउतार, ढेकूण सहन करू शकतात. तापमान १६.१ से. पर्यंत असलेल्या थंडीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. मात्र, त्यापेक्षा अधिक थंड वातावरणात त्यांच्या हालचाली मंदावतात आणि प्रौढावस्थेतील ढेकूण अर्धशीत निद्रावस्थेत जातात. हे तापमान –३२ से. पेक्षा कमी झाले तर ढेकूण १५ मिनिटांत मरतात. तसेच ४५से. पेक्षा अधिक तापमान ढेकणांना सोसवत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अंथरूण-पांघरूण कडक उन्हात टाकायची पद्धत आहे. झुरळे, मुंग्या, काही जातींचे कोळी, गोम आणि गोचिड हे ढेकणांचे नैसर्गिक शत्रू आहेत. पायरेथ्रॉइडस्, डायक्लॉव्हॉस्, मॅलॅथिऑन आणि डीडीटी या रसायनांचा वापर करून ढेकणांना मारता येते. परंतु अनेक ठिकाणी या विषारी रसायनांसाठी प्रतिरोध करण्याची क्षमता त्यांच्या ठायी निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. ढेकणांच्या जैविक नियंत्रण पद्धती विकसित झालेल्या नाहीत. मानवामध्ये आजार निर्माण करू शकणारे २८ प्रकारचे जीवाणू ढेकणांवरही प्रभाव करू शकतात. मात्र ढेकणांच्या माध्यमातून अशा रोगांचा प्रसार होत नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यूरोप-अमेरिकेत ढेकणांचा प्रचंड त्रास झाला. त्यानंतर या प्रगत राष्ट्रांना ढेकणांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. मात्र, १९८० नंतरच्या दशकात पुन्हा प्रगत राष्ट्रांमध्ये ढेकणांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. ढेकणाच्या शरीरातून मिळविलेल्या मानवी रक्ताची डीएनए चाचणी घेऊन ९० दिवसांपूर्वीपर्यंत तो बिछाना वापरलेल्या व्यक्तीची ओळख पटविता येते. याचा उपयोग गुन्हे अन्वेषण शास्त्रामध्ये करतात.