तमाल (सिनॅमोमम तमाला) वृक्षाची पाने

लॉरेसी कुलातील एक सदापर्णी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम तमाला आहे. भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्र (तेजपात) म्हणून या वनस्पतीची पाने वापरली जातात. हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात सस. पासून ९००–२४०० मी. उंचीपर्यंत आढळून येतो. कापूर, दालचिनी या वनस्पतीही लॉरेसी कुलात येतात. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि मेघालयातील खासी टेकड्या, जैंतिया टेकड्या इ. भागांत हा लागवडीखाली आहे.

तमाल वृक्ष सु. ८–९ मी. उंच वाढतो. खोडाचा परिघ सु. १.५ मी. पर्यंत वाढत असून साल पातळ, तपकिरी आणि सुरकुतलेली असते. पाने साधी, समोरासमोर किंवा एका आड एक, ५–७ सेंमी. लांब, आयताकार किंवा भाल्यासारखी, निमुळत्या टोकाची, जाड व केसाळ असून त्यांत देठापासून टोकाकडे गेलेल्या तीन शिरा असतात. या पानांनाच तमालपत्र म्हणतात. फुले पांढरी, लहान, असंख्य व एकलिंगी असून एकाच झाडावर असतात. ती कक्षस्थ किंवा अग्रस्थ असून विरल सूक्ष्मरोमिल स्तबकात येतात. मृदुफळ अंडाकृती, मांसल, आठळीयुक्त, काळे आणि परिदल नलिकेने वेढलेले असते.

तमाल वृक्षाच्या खोडाच्या सालीपासून मिळणारे सुगंधित तेल साबणात वापरतात. पाने सुगंधित असून ती मसाल्यात वापरतात. सालीतील तेलात ७०–८५% सिनॅमिक आल्डिहाइड असते. पानांतील तेलात सु. ७८% यूजेनॉल असते. सालीची पूड मज्जाविकार व हृदयविकार यांवर उपयुक्त असते. पाने उत्तेजक व कृमिनाशक म्हणून ओळखली जातात. काश्मीरमध्ये तमालची हिरवी पाने नागवेलीच्या पानांप्रमाणे खाल्ली जातात. पुलाव, बिर्याणी यांसारख्या अन्नपदार्थांना चव आणि गंध येण्यासाठी तमालपत्रे वापरतात.