माका ही बहुवर्षायू वनस्पती अ‍ॅस्टरेसी कुलातील एक्लिप्टा (किंवा व्हर्बेसिना ) या प्रजातीची असून तिचे शास्त्रीय नाव एक्लिप्टा आल्बा आहे. एक्लिप्टा प्रोस्ट्रॅटा किंवा एक्लिप्टा इरेक्टा  या नावांनीही ती ओळखली जाते. मराठी भाषेत ती भृंगराज किंवा पांढरा माका या नावांनी ओळखली जाते. जगातील सर्व उष्ण प्रदेशांत माका ओलसर जागी व रस्त्याच्या कडेला तण म्हणून वाढते. भारत, पाकिस्तान, चीन, म्यानमार, थायलंड, श्रीलंका आणि ब्राझील या देशांत ती मोठ्या प्रमाणावर आढळते.

माका (एक्लिप्टा आल्बा) : पाने, फुल आणि फळे यांसह फांदी

माक्याचे क्षुप सु. ३० सेंमी.पर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फांद्या असून खोड व फांद्या केसाळ असतात. कधीकधी फांद्यांच्या पेरांपासून आगंतुक मुळे फुटलेली असतात. पाने साधी, समोरासमोर, अवृंत म्हणजे बिनदेठाची, लांबट व भाल्याच्या आकाराची असून त्यांच्या कडा दंतुर असतात. पान ३–५ सेंमी. लांब व १-१·५ सेंमी. रुंद असते. फुले लहान, पांढरी व स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात येत असून फुलोरा पानांच्या बगलेत किंवा टोकाला येतो. स्तबकातील किरण पुष्पके म्हणजे परिघावरची फुले स्त्रीलिंगी, वंध्य किंवा अवंध्य आणि जिभेसारखी असतात. बिंबपुष्पके म्हणजे मध्यभागी असलेली फुले उभयलिंगी व नलिकाकृती असतात. फळ शुष्क, एकबीजी, चपटे व पंखधारी असून जिऱ्यासारखे असते.

माक्याचे सर्व भाग औषधी आहेत. मूळ वांतिकारक व विरेचक आहे. माक्याचा रस कावीळ व मूळव्याध यांवर गुणकारी आहे. माक्याचा पाला किंवा रस खोबरेल तेलात उकळून केसांच्या वाढीसाठी व काळेपणा आणण्यासाठी वापरतात. माका, मरवा व मेंदीचा पाला वाटून भाजलेल्या जागी लावल्यास आग कमी होते आणि डाग राहत नाही. भारतात माक्याच्या कोवळ्या पानांची चटणी करतात. पानांचा व खोडाचा रस गोंदण्यामध्ये वापरतात.

माका हे नाव आणखी दोन वनस्पतींशी संबंधित आहे. या दोन्ही वनस्पती अ‍ॅस्टरेसी कुलातील आहेत. वेडेलिया चायनेन्सिस या माक्यासारख्या दिसणाऱ्या वनस्पतीला पिवळा माका म्हणतात. पांढऱ्या माक्याप्रमाणेच तिचा उपयोग केशरंजनासाठी होतो. दलदलीत वाढणाऱ्या सीसुलिया अ‍ॅक्सिलॅरिस या वनस्पतीला काळा माका म्हणतात. ही एक औषधी वनस्पती असून तिच्यापासून मिळालेल्या तेलामध्ये कवकरोधी तसेच जीवाणुरोधी गुणधर्म आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा