अस्थिमीन वर्गाच्या चर्मपरअर उपवर्गाच्या क्लुपिफॉर्मिस गणाच्या क्लुपिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला लाँगिसेप्स आहे. काही ठिकाणी या माशाला तारली असेही म्हणतात. भारताची पश्चिम किनारपट्टी, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, ओमान, फिलिपीन्स, सोमालिया, व्हिएटनाम आणि येमेन या देशांच्या किनारपट्टीला हा मासा आढळतो. त्यापासून तेल मिळते म्हणून या माशाला इंग्रजीत ऑइल सार्डीन म्हणतात.
तरळी माशाचे शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमुळते असून दोन्ही बाजूंनी चपटे असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीकडची कडा जवळपास सरळ तर पोटाची कडा फुगलेली असते. पोटावरील कडेवर धारदार खवल्यांची रांग असते. पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात मधूनमधून सोनेरी चमक दिसते. पोट रुपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची तकाकी असते. प्रच्छदावर (कल्ल्यावरील कवचाच्या बाहेरील कडेवर) काळा ठिपका असतो. पृष्ठपर आणि पुच्छपर हिरवट तपकिरी रंगाचे असतात. सर्वसाधारणपणे हा मासा २०–२३ सेंमी. लांब व २०० ग्रॅ. एवढ्या वजनापर्यंत वाढतो. मात्र मत्स्योद्योगात पकडले गेलेले मासे १२–१५ सेंमी. लांबीचे असतात. नर आणि मादी यांच्या बाह्यस्वरूपात फरक नसतो.
तरळी माशाचे प्रजनन समुद्राच्या पाण्याचे तापमान आणि क्षारता कमी असताना म्हणजे ऑगस्ट–सप्टेंबर महिन्यांत होते. अंडी पाण्यात सोडण्याची क्रिया बहुधा रात्री होते. २२०–२६० से. तापमानाला ही क्रिया मोठ्या प्रमाणावर होते. अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे मीलन शरीराबाहेरच होते. भ्रूणांची वाढ समुद्राच्या पृष्ठभागालगत होत राहते. नर आणि मादी पिलांची काळजी घेत नाहीत.
हे मासे थव्याने किनाऱ्याजवळ समुद्राच्या वरच्या थरात राहतात. त्यांचे हे थवे बुडबुडे काढणारे किंवा पाण्यावर लहरी उत्पन्न करणारे असतात. त्यांच्या थव्यांमुळे पाणी चंदेरी दिसते. यावरून मासेमारी करणारे तरळीचा थवा सहज ओळखतात. ते त्यांच्याभोवती बटवा जाळे लावून त्यांना पकडतात.
समुद्राच्या पाण्यातील तलप्लावी वनस्पती, प्राणी, प्लवकांवर वाढणारे झिंग्यांसारखे प्राणी व त्यांचे डिंभ आणि इतर लहान मासे खाऊन तरळी मासे वाढतात. तरळी हा समुद्रामधील अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. ते अन्नसाखळीच्या प्रारंभिक पातळीवर असल्यामुळे पारा, शिसे वगैरे घातक जलप्रदूषके त्यांच्या शरीरात साठत नाहीत. तरळीच्या सेवनातून प्रथिने, ड व ब१२ जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम मिळतात, तसेच हृदयविकार आणि अल्झायमर या रोगांवर उपयुक्त असलेली ओमेगा-३ मेदाम्ले मोठ्या प्रमाणावर शरीराला मिळतात. त्यामुळे मानवी आहारात तरळीला खूपच महत्त्व आहे.
भारतात तरळी मासे भाजून, तळून किंवा त्यांची लोणची करून खातात. समुद्रकिनाऱ्यानजीक हे मासे ताजे खाल्ले जातात, तर किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी ते बर्फातून, खारवून किंवा हवाबंद डब्यांतून नेतात. या माशांपासून तेल काढतात. या तेलापासून साबण, रंग, व्हार्निश आणि लिनोलियम तयार करतात. तेल वेगळे केल्यानंतर उरलेल्या भुकटीचा वापर पशुपक्ष्यांच्या खाद्यामध्ये पूरकघटक म्हणून करतात. ही भुकटी काही कारणाने खराब झाली तर तिचा वापर चहाच्या मळ्यांमध्ये व फळबागांमध्ये खताप्रमाणे करतात. समुद्रातील मोठे मासे मिळविण्यासाठी गळांना लावण्यासाठी तरळीचा वापर केला जातो.
तरळी माशाची चव आणि पोषणमूल्य चांगले असते. तसेच हा मासा स्वस्त असून मोठ्या प्रमाणावर मिळतो. भारतात आणि परदेशातही याला मोठी मागणी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. या माशाचे साठे संपुष्टात येण्याची शक्यता तज्ज्ञ संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.