फुलकोबी (ब्रॅसिका ओलेरॅसिया) : पाने व फुलोरा (गड्डा) यांसह वनस्पती

फुलकोबी ही वर्षायू वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया (प्रकार बॉट्रिटिस) आहे. कोबी, नवलकोल व ब्रोकोली या वनस्पतीदेखील ब्रॅसिका ओलेरॅसिया या जातीचे प्रकार आहेत. सलगम, मोहरी व राई या वनस्पतीही ब्रॅसिका या प्रजातीत येतात. ब्रॅसिकेसी कुलातील बहुधा सर्व वनस्पतींचे मूलस्थान यूरोपमधील समशीतोष्ण प्रदेशातील आहे. तेथून त्यांचा प्रसार जगात सर्वत्र खाद्य वनस्पती म्हणून झालेला आहे. फुलकोबीच्या अनेक उपप्रकारांची लागवड वेगवेगळ्या देशांमध्ये भाजीसाठी केलेली आढळते. त्यांमध्ये हिरव्या, लाल, नारिंगी व जांभळ्या रंगांचे प्रकारही असतात; परंतु पांढरा फुलकोबी सर्वाधिक चवदार आणि लोकप्रिय आहे. भारतात फुलकोबीची लागवड सर्वत्र केली जाते. सामान्य व्यवहारात या भाजीला ‘फ्लॉवर’, ‘फुलवर’ असेही म्हणतात.

फुलकोबी वनस्पतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. खोड जमिनीलगत व कमी उंचीचे असते. या खोडाला अनेक साधी व मोठी पाने आणि वर टोकाला पांढरा किंवा पिवळसर पांढरा गड्डा म्हणजे फुलोरा असतो. हा गड्डा दाटीवाटीने वाढणाऱ्या बहुशाखीय फुलोऱ्याच्या विभाजी ऊतींचा बनलेला असतो. या बाबतीत त्याचे ‘ब्रोकोली’ वनस्पतीशी साम्य आहे. मात्र ब्रोकोलीमध्ये विभाजी ऊतींपासून काही कळ्याही होतात. फुलकोबीतील दाटीवाटीने वाढणारे बहुशाखीय फुलोरे हे निसर्गात आढळणाऱ्या अपूर्णमित रचनेचे उदाहरण आहे.

फुलकोबीचे गड्डे भाजी, कोशिंबीर वगैरे बनविण्यासाठी वापरतात. पाने गुरांना खायला देतात. गड्डा न तोडता तसाच वाढू दिला तर त्याला असंख्य लहान व पांढरी फुले येतात. फळे तयार झाल्यावर त्यातील बिया काढून वाळवून ठेवतात. पुढच्या हंगामात लागवडीसाठी या बिया उपयोगी पडतात.

फुलकोबीचे पोषणमूल्य उच्च दर्जाचे असते. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ आणि मेद पदार्थ यांचे प्रमाण कमी असते. मात्र, त्यांत पाणी, तंतुमय अन्नांश, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. याशिवाय ब्रॅसिकेसी कुलातील वनस्पतींमध्ये आढळणारी काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतिज रसायने फुलकोबीमध्ये असतात, उदा., सल्फोरॅफेन, कॅरोटिनॉइडे आणि ग्लुकोसिनोलेट. या रसायनांमध्ये कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असतात.तसेच फुलकोबीमध्ये इंडॉल-३ कार्बिनॉल असते. त्यामुळे डीएनए दुरुस्तीला चालना मिळते आणि पुरुषांना होऊ शकणाऱ्या पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा