खाद्य फळांसाठी आणि रेशीम निर्माण करणाऱ्या कीटकांच्या अळ्यांच्या खाद्य पानांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. मोरेसी कुलातील मोरस प्रजातीच्या दीर्घायू वृक्षांना किंवा झुडपांना सामान्यपणे तुती म्हणतात. जगभर या प्रजातीच्या १०–१६ जाती आढळतात. या वनस्पती मूळच्या उत्तर गोलार्धाच्या समशीतोष्ण आणि उपोष्ण प्रदेशांतील आहेत. भारतात तुतीच्या चार-पाच जाती असून त्यांपैकी मोरस आल्बा ही जाती लागवडीखाली आहे. ही जाती मूळची चीनमधील आहे. ती भारतात रेशीम उद्योगासाठी कीटकांच्या अळ्यांकरिता पाने खाद्य असल्यामुळे लागवडीखाली आहे.
तुतीचा वृक्ष मध्यम आकारमानाचा असून त्याची उंची ३–५ मी. असते. खोडाचा घेर साधारणपणे १.८ मी. असतो. साल गडद तपकिरी, खरबरीत व भेगाळलेली असते. पाने साधी, अंडाकृती, दातेरी व एकाआड एक असतात. फुले लहान व एकलिंगी असून ती एकाच किंवा वेगवेगळ्या झाडांवर येतात. नर-फुलोरा लोंबणाऱ्या कणिश प्रकारचा, काहीसा रुंद व दंडाकार असतो. स्त्री-फुलोरा लांबट-गोल असून त्यापासून संयुक्त फळ तयार होते. ते अनेक लहान आठळी फळांचे बनलेले असते. फळांचा रंग पांढरा, लालसर, जांभळा किंवा काळा असतो. ती साधारणपणे उन्हाळ्याच्या मध्यानंतर पिकतात. या फळांना बाजारात तुतू म्हणतात. तुतीचा प्रसार पक्षी, कोल्हे आणि माणसांमार्फत होतो.
रेशीम कीटकांचे खाद्य म्हणून तुतीच्या पानांचा वापर सु. २,००० वर्षांपासून होत आहे. जनावरांना चारा म्हणून त्यांचा वापर होतो. फळे खाद्य असून सुकामेवा, तसेच वाइन तयार करण्यासाठी वापरतात. फळे बद्धकोष्ठता व मधुमेहावर उपयुक्त आहेत. खोडाची साल खोकल्यावर गुणकारी आहे. तसेच ती डोकेदुखी, ज्वर आणि नेत्रविकारावर गुणकारी आहे. तुतीच्या फळांमधील घट्ट रसापासून जेली तयार करतात. तुतीची पूर्ण वाढलेली पाने रेशीमनिर्मिती करणाऱ्या कीटकांच्या अळ्यांना पोसण्याकरिता खाऊ घालतात. पानांत १६–३९% प्रथिने व ७–२६% शर्करा असते. फळांत ८७% पाणी, १.५% प्रथिने तसेच ८.३% कर्बोदके असून कॅरोटीन, रिबोफ्लाविन, क जीवनसत्त्व इत्यादी असतात. बियांत २५–३५% सुकणारे पिवळट तेल असते.