(रेन ट्री). भारतात सर्वपरिचित असलेला एक वृक्ष. वर्षावृक्ष ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अल्बिझिया सॅमन किंवा सॅनानिया सॅमन आहे. बाभूळ, शिरीष इ. वृक्षदेखील फॅबेसी कुलातील आहेत. वर्षावृक्ष व शिरीष हे वृक्ष अगदी जवळचे आहेत, कारण दोन्ही वृक्ष अल्बिझिया प्रजातीतील आहेत. वर्षावृक्ष मूळचा दक्षिण अमेरिकेतील असून त्याचा प्रसार मेक्सिको ते पेरू, ब्राझील या देशांपर्यंत आहे. आता त्याचा प्रसार दक्षिण आशिया, आग्नेय आशिया खंडातील देशांत तसेच पॅसिफिक बेटे येथे झालेला आहे. अनेक उष्ण प्रदेशांत सहसा हा वृक्ष शोभेसाठी, सावलीसाठी सार्वजनिक उद्यानांतून आणि रस्त्याच्या दुतर्फा लावलेला आढळतो. त्याची मुळे फार खोलवर जात नसल्याने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे किंवा वादळामुळे तो उन्मळून पडतो. वर्षावृक्षाला ‘गुलाबी शिरीष’ असेही म्हणतात.

वर्षावृक्ष (अल्बिझिया सॅमन) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया.

वर्षावृक्ष सु. २५ मी. उंच वाढतो. पूर्ण वाढलेल्या या वृक्षाच्या पर्णसंभाराचा परिघ सु. १२५ मी. असू शकतो. साल गडद करडी असून फांद्या पसरट असतात. त्यामुळे त्याच्या पर्णसंभाराचा माथा एखाद्या घुमटासारखा दिसतो. पाने संयुक्त, पिसांसारखी व दोनदा विभागलेली असतात; त्यांवर ४–८ दलांच्या जोड्या आणि त्यांवर ३–७ दलकांच्या जोड्या असतात. या वृक्षाची पाने संध्याकाळी, कधीकधी दिवसादेखील मिटलेली असतात. तसेच पावसापूर्वी ती मिटतात, हे पाहून मलेशियात या वृक्षाला ‘रेन ट्री’ हे नाव पडले आहे. या वृक्षाला रेन ट्री म्हणण्याचे आणखी एक कारण असे दिले जाते की, या वृक्षांच्या पानांवर हेमिप्टेरा गणातील सिकाडा नावाचे कीटक पोसले जातात. ते एक चिकट, पाण्यासारखा द्रव स्रवतात आणि त्यामुळे या वृक्षाखालची जमीन ओली झालेली आढळते. या वृक्षाला फुलोरे येण्याच्या सुमारास व फुले आल्यानंतर या वृक्षाखाली बारीक फुलांचा सडा पडलेला दिसतो. फुलोरे पानांच्या बगलेत येतात; ते अनेक लहान फुलांचे गुच्छ असतात. प्रत्येक फुलांमध्ये निदलपुंज बारीक नळीसारखा हिरवट असतो आणि दलपुंज पिवळट लाल पाकळ्यांचा, तुतारीसारखा असतो. याखेरीज फुलांत अनेक पुंकेसर (अर्धी लाल व अर्धी पांढरी) असून मध्यभागी एकच अंडपी असते. पुंकेसराचे तंतू नाजूक, झुबकेदार असतात आणि फुलातील हाच भाग उठून दिसतो. फुले सुकून खाली पडलेल्या सड्यात पुंकेसर अधिक असतात. एप्रिल महिन्यात झाडावर अनेक तपकिरी, जाड, चपट्या, न तडकणाऱ्या व मांसल शेंगा येतात. शेंगांमध्ये चिंचेप्रमाणे गोड मगज असून कठीण व चकचकीत ५–१० बिया असतात. या बियांपासून नवीन रोपे बनतात, जी लागवडीसाठी वापरतात.

वर्षावृक्षाचे लाकूड हलके, कमी प्रतीचे व नाजूक असून जळण्यासाठीही ते योग्य नसते. इंडोनेशियातील बोगोर ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट संस्थेने केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, सु. १५ मी. व्यासाचा वर्षावृक्ष एका वर्षात हवेतील सु. २८ टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने वर्षावृक्ष एक महत्त्वाचा वृक्ष आहे.

अनेकदा वर्षावृक्षावर काही जातीचे कीटक (हेमिप्टेरा गण) वाढल्याने हे वृक्ष कुजून जाऊन मरतात. मुंबई शहरात वर्षावृक्षांमध्ये अशा कीटकांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. या कीटकांची संख्या वाढण्यामागे शहराचे अनिर्बंध काँक्रीटीकरण आणि जागतिक तापन ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.