मानवप्राणी (Man) व त्याच्या कार्यांचा सांगोपांग आणि सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. ‘Anthropology’ हा इंग्रजी शब्द सर्वप्रथम ॲरिस्टॉटल (Aristotle) या ग्रीक तत्त्ववेत्याने वापरला असून ‘Anthropos’ आणि ‘Logos’ या दोन ग्रीक शब्दांपासून तो बनला आहे. Anthropos म्हणजे ‘मानव’ आणि Logos म्हणजे ‘अभ्यास’, म्हणजेच ‘मानवाचा अभ्यास’ होय. अँथ्रोपॉलॉजी या शब्दाचा सुरुवातीला मानववंशशास्त्र असा उल्लेख केला जात; परंतु या विषयात फक्त मानवी वंशाचाच अभ्यास होत नाही. आधुनिक संशोधनामुळे वंश कल्पना इतकी पोकळ झाली आहे की, व्यापक अर्थाने मानवशास्त्र हा शब्दच अधिक संयुक्तिक आहे. त्याचे व्यापकत्व वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी केलेल्या मानवशास्त्राविषयी पुढील व्याख्यांमधून लक्षात येते.

जेकब व स्टर्न यांच्या मते, ‘मानवाच्या अस्तित्वापासून ते आत्तापर्यंत त्यांची शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या जी वाढ झाली, तिचा व मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे मानवशास्त्र होय.’

क्रोबर यांच्या मते, ‘मानवशास्त्र म्हणजे मानवाचे शास्त्र होय’. मानव आणि त्याची कार्यनिर्मिती व वर्तन यांचे ते शास्त्र होय, असे त्यांनी व्याख्येचे स्पष्टिकरण केले आहे.

बिअल्स आणि हॉईजर यांनी ‘मानव आणि त्यांच्या सर्व कार्यनिष्पत्तीचा अभ्यास मानवशास्त्रात केला जोतो.’ अशी व्यापक व्याख्या केली आहे.

हरस्कोविट्स व हॉबेल यांनी ‘मानव आणि त्यांची कार्यनिर्मिती यांचा अभ्यास म्हणजे मानवशास्त्र होय’ अशी व्याख्या केली आहे. हरस्कोविट्स म्हणतात की, मानवशास्त्रामध्ये शारीरिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अंगांचा विचार येतो; तर हॉबेल यांच्या मते, हे शास्त्र सामाजिक व नैसर्गिक स्वरूपाचे शास्त्र आहे.

मुजुमदार व मदन यांच्या मते, ‘मानवशास्त्र हे मानवाचा उदय आणि विकास यांचा शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्टीकोनातून अभ्यास करते.

वरील सर्व व्यांख्यांवरून ‘मानवाचे शरीर, मानवाची उत्क्रांती, विविध मानवजाती, मानवसंस्कृती, सामाजिक चालीरीती, धर्म या सर्व गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र महणजे मानवशास्त्र, असे मानवशास्त्राचे स्वरूप स्पष्ट होते. मानवशास्त्र हे मानवाच्या उत्क्रांतीपासून (अप्रगत अवस्थेपासून) ते आजच्या अर्वाचीन (प्रगत) अशा सर्व मानवांचे अध्ययन करते. मानवशास्त्र हे सर्व मानव समूहांचे जीवशास्त्रीय दृष्ट्या तसेच सामाजिक, सांस्कृतिक अंगाने अभ्यास करीत असून एका विशिष्ट काळापुरते अथवा स्थळापुरते ते मर्यादित नाही.

मानवशास्त्रात शास्त्रीय व समाजशास्त्रीय अशा होनही दृष्टीकोनाचे विवेचन-विश्लेषण केले जाते. त्यामुळे मानवशास्त्राचा विविध विषयांशी सहयोग होतो. मानवाच्या विविध अंगांना स्पर्श करून जाणारा मानवशास्त्र हा विषय विज्ञाननिष्ठ असून त्याची स्वतंत्र अभ्यासपद्धती आहे. मानवाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात एकोणिसाव्या शतकापासून झाली. युरोपियन लोक जग पादाक्रांत करण्यासाठी जेव्हा युरोपबाहेर पडले, तेव्हा त्यांनी विविध मानवी समाज, त्यांच्या संस्कृती आणि शारीरिक विविधता पाहिली. त्यांनी आपल्या उत्सुकतेपोटी मानवप्राण्याच्या अभ्यासास सुरुवात केली आणि त्यास गती मिळाली. मानवप्राणी, मानवी समाज, मानवी वर्तन इत्यादीविषयींचा उल्लेख ग्रीक, रोम, भारत आणि चीन या देशांतील संस्कृतीमध्ये तसेच विविध धर्मग्रंथांत आहे; मात्र त्यामध्ये काही मर्यादा आहेत. इजिप्शिअन, पर्शिअन व ग्रीक या लोकांच्या चालीरीतीमधील साम्य आणि भेद प्राचीन इतिहासकार हीरॉडोटस (Herodotus) यांनी वर्णिले आहे. मार्कोपोलो, कॅप्टन कूक यांनीही अप्रत्यक्षपणे मानवशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध ब्रिटिश निसर्गवादी चार्ल्स रॉबर्ट डार्विन (Charles Robert Darwin) यांनीही मानवशास्त्राला पूरक असेच संशोधन केले. या सर्व अभ्यासांतून माणूस, त्याची उत्क्रांती, संस्कृती व सांस्कृतिक विविधता यांविषयी अगदी ढोबळ आणि प्राथमिक स्वरूपाची माहिती जमा होऊ लागली.

मानवाच्या उगम कालाबद्दल अनेक मानवशास्त्रज्ञांत मतभिन्नता असून काहिंच्या मते, त्याचा उगम सुमारे चौदा ते पंधरा दशलक्ष वर्षांपूर्वी झाला असावा. मानवप्राणी हा आनुवंशिकता व परिस्थिती या प्रक्रियेतून निर्माण झाला. मानवाची विचारसरणी आणि वर्तन यांपैकी किती भाग आनुवंशिक असतो व किती भाग परिस्थिती ठरविते, हा विवाद्य परंतु अभ्यासनीय विषय आहे. त्याचे मूळ वसतीस्थान आफ्रिकेत होते. तेथून मानवाचा संचार हळूहळू सर्व जगभर झाला. प्राणीजगतात मानवाचे स्थान अद्वितीय आहे. अगदी प्राचीन काळी मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा अशा प्राथमिक गरजा भागविण्यातच गर्क होता; मात्र आद्य मानवाला प्राप्त झालेली शरीर संपदा महत्त्वपूर्ण ठरली. त्याचे इतर प्राण्यांशी काही साम्य असले, तरी तो इतरांपेक्षा अगदी भिन्न आहे. मानव दोन पायांवर नैसर्गिक रीत्या उभा राहणारा एकमेव प्राणी आहे. मानवाचा मेंदू जटिल असतो. त्याच्या हातांची, पायांची व पाठीच्या कण्याची रचना इतर प्राण्यांपेक्षा अगदी वेगळी असते. मानवशरीराचा हात हा भाग विविध उपयोगी आहे. हाताच्या रचनेमुळे त्यांच्या अंगठा आणि बोटांचा उपयोग झाड चढताना फांद्या पकडणे, जमीन खरवडून कंदमुळे आणि बीळ खणून छोटे प्राणी अन्न म्हणून मिळविणे, वस्तू पकडणे, उचलणे, तसेच अन्न मिळविण्यास किंवा स्वरक्षणार्थ दगड वापरण्यास आणि कालांतराने त्या दगडाला आकार देण्यास तो शिकला. त्याला अवगत झालेली ही कला, संस्कृतीची नांदीच होती. यथावकाश अग्नीचा शोध लागला. अन्न भाजून, प्रक्रिया करून खाणे आणि शेती करून स्थिर आयुष्य जगणे त्याला शक्य झाले. तो आपल्या गरजा भागविण्यासाठी विशिष्ट मार्ग आक्रमू लागला आणि मानवीजीवन जगण्याचे प्रकार अस्तित्वात येऊ लागले.  यातूनच रूढी-परंपरा, पंथ, समूह, जाती, धर्म इत्यादी संकल्पना उदयास आल्या. दळवळण, भाषा आणि लिपी यांसारख्या शोधानंतर तर माणूस आणि समाज अधिकच जवळ येऊ लागला. त्याच्या या संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये आजही प्रगत समाजासह प्राथमिक अवस्थेतील जमाती दिसतात.

इतर प्राणी एका विशिष्ट नैसर्गिक (परिस्थिती) वातावरणातच जिवंत राहू शकतात; परंतु माणूस आपल्या बुद्धीचा व विचारशक्तीचा वापर करून कोणत्याही वातावरणात स्वत:स अनुकूल अशी परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी उपयोगी साधने निर्माण करून जिवंत राहू शकतो. निसर्गापासून फायदे मिळवीत, आजूबाजूच्या सजीव सृष्टीवर स्वतःचा वरचष्मा ठेवत त्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. मनुष्य हा केवळ जीवशास्त्रीय घटक म्हणजे सजीव प्राणी नसून तो एक संस्कृती उत्पन्न करणारा समाजशील प्राणी आहे. आपल्या संस्कृतीमुळे कोणत्याही पर्यावरणात राहणे त्यास शक्य आहे. संस्कृतीची निर्मिती भाषेशिवाय शक्य झाली नसती. एका समाजातील लोकांना भाषेमुळे एकमेकांशी सुरळीतपणे व्यवहार करता येतो. तसेच मानवाला आपले अनुभव व ज्ञान भाषेमुळे संचित करता येते. यामुळेच लाखो वर्षांपूर्वीचा अश्मयुगीन माणूस आज मोठ्या प्रमाणात वैचारिक प्रगल्भता मिळवू शकला आहे.

मनुष्य हा समाजाचा मूळ घटक आहे; मात्र जगातील कोणत्याही समाजात दोन माणसे कधीही एकसारखी आढळत नाही. मानवाच्या वेगवेगळ्या वातावरणात राहण्यामुळे त्याच्या शरीररचनेवर परिणाम झाला आहे. जसे डोळ्यांचा रंग, आकार, त्वचेचा रंग, केसांचा रंग, प्रकार आणि पोत, नाकाचा आकार यांत व्यक्तीनिहाय फरक असतोच. विशिष्ट समाजांची अथवा समूहांचीसुद्धा काही वैशिष्ट्ये असतात. जसे थंड प्रदेशातील लोक गोरे, तर उष्ण कटिबंधातील लोक सामान्यतः काळे असतात. तसेच मानवी संस्कृती आणि भाषांमध्येही अनेकविध वैचित्र्य आढळते. समाजातील ही वैशिष्ट्ये त्या त्या प्रदेशातील हवामान, आहार-विहार, पर्यावरण इत्यादीनुसार होणारे अनुकूल आणि मुलभूत अनुवंशिकता यांनुसार दिसून येतात.

जगामधील मानवसमाजात विवाहविधीचे विविध प्रकार आढळून येतात. दक्षिण भारतात आते-मामे विवाह होतात, तर उत्तर भारतात नात्यातले विवाह टाळले जातात. विवाहासाठी एक गोत्र टाळले जाते. या सर्वांसाठी मानवशास्त्रीय स्पष्टीकरण कसे देता येते? अनुवंशशास्त्राच्या दृष्टीने त्याचे महत्त्व काय? एखादे व्यंग किंवा वेगळेपण घेऊन जन्माला आलेले मूल, कुटुंबासाठी किंवा समाजात तो गुणधर्म येण्यासाठी कितपत धोकादायक ठरते? अशा प्रकारचे गुणधर्म घेऊन जन्माला येणारे अपत्य टाळता येते काय? आजारपण, रोग यांबाबत समाजाला कितपत जाण असते? एखाद्या विशिष्ट रोगाबद्दल समाजाची भावना काय असते? तो रोग निवारण्याबद्दल कोणती उपचारपद्धती ते अवलंबितात? विशिष्ट रोगाच्या रोग्याला समाजात काणते स्थान राहते? आदिवासी आणि इतर काही समाजात आजही आजाराचे निवारण करण्यासाठी जादूटोणा, मंत्र-तंत्र, शमन इत्यादी प्रकार वापरले जाते, त्याचे त्या समाजाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? त्यांची या बाबतची मानसिकता कशी बदलू शकेल? पोषण आणि कुपोषणाचा आहाराशी कसा संबंध असतो? एखाद्या समाजाचा आहारविषयक दृष्टीकोन कसा असतो? लहान मुले कुपोषणाला कशी बळी पडतात? त्यासाठी परिणामकारक ठरणारे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक कोणते? मुलांची वाढ कशा प्रकारे होते? भारतीय मुलांसाठी वाढीचे आदर्श प्रमाण काय आहे? वाढीचा दर मोजण्याच्या कोणत्या पद्धती अस्तित्वात आहेत? वयानुरूप होणारी वाढ कशा प्रकारे होते? मुला-मुलींमध्ये असलेले वाढीचे फरक कोणते? वयानुरूप बदलणाऱ्या मानसिक आणि सामाजिक घटकांचा वाढीवर कसा परिणाम होतो? आहाराचा वाढीवर होणारा परिणाम कोणता? वृद्धांच्या बाबतीत येणाऱ्या समस्या कोणत्या? शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या घटकांचा वृद्धांवर होणारा परिणाम आणि वृद्धत्व समस्या कोणत्या? असे कितीतरी प्रश्न मनात येतात. अशा प्रश्नांची लांबच लांब माळ वाढत राहते. हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मनुष्यांशीच निगडीत असून या प्रश्नांची उत्तरे मानवशास्त्राच्या अभ्यासातून मिळविता येते.

मानवशास्त्रीय अभ्यासासाठी अभ्यासकाला समाजात जावे लागते. लोकांत मिसळून समाजाचा इतिहास, संस्कृती, सामाजिक-सांस्कृतिक बदल, रूढी, परंपरा अभ्यासावा लागतो. त्याचप्रमाणे या मानवाचे जीवशास्त्रीय अंतरंग कळण्यासाठी त्याच्या स्वरूपाचा, शारीरिक मापांचा, परिणामांचा, अनुवंशिक घटकांचाही विचार करावा लागतो. जैविक गुणधर्म हे पिढ्यांपिढ्यांतून अनुवंशिकतेद्वारे संक्रमीत होत असतात, तर संस्कृतीही परंपरेद्वारे संक्रमीत होत असते. अनुवंशिकता हे सर्वच सजीवांचे लक्षण आहे; परंतु संस्कृती अथवा परंपरा निर्माण करण्याची शक्ती प्रामुख्याने मानवातच आहे. निसर्गापासून मिळणाऱ्या गोष्टी घेऊन प्राणी आपल्या गरजा भागवतात; परंतु मानव आपल्या गरजेनुसार निसर्गाला वापरून घेतो. या शास्त्राची अभ्यासासाठी विविध शाखांत विभागणी होते. मानवाच्या जीवशास्त्रीय घटकांवर दृष्टी टाकणारे ‘शारीरिक किंवा जीवशास्त्रीय मानवशास्त्र’, मानवी समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करणारे ‘सामाजिक आणि सांस्कृतिक मानवशास्त्र’ या दोनही शाखांचा उल्लेख काही वेळा स्वतंत्र केला जातो; मात्र सांस्कृतिक मानवशास्त्र (Cultural Anthropology) ज्या संस्कृतीचा अभ्यास करते, ती संस्कृती केवळ एकाच समाजाची असते. कुटुंब नियोजानासारख्या विषयात धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक मतप्रवाहांसारखे घटक अंतर्भूत असतात. ज्या वेळी एखाद्या समाजातील आरोग्याची समस्या हाताळायची असते, त्या वेळी या विषयावर संस्कृतीचे पडलेले प्रतिबिंब डोळेझाक करता येत नाही. त्यासाठी सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र हा विषय उपयोगास येतो. सांस्कृतिक मानवशास्त्राची व्याप्ती विशाल असून त्यात संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा विचार करण्यात येतो. मानवशास्त्राच्या कक्षेत सामाजिक मानवशास्त्राचाही स्वतंत्र विकास झाला आहे.

प्राचीन मानवाच्या अथवा आदिमानवाच्या जीवनाचा अभ्यास ‘पुरातत्वीय मानवशास्त्र’ या विषयात केला जातो. मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजच्या मानवापर्यंत त्याच्यात जे शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल झालेत, अशा प्राचीन पुराव्यांचा अभ्यास पुरातत्वीय मानवशास्त्रात केला जातो. शारीरिक आणि सांस्कृतिक मानवशास्त्राचा प्राचीन मानवासंबंधीचा सहयोग या शाखेत पाहावयास मिळतो. कपिसदृश मानव (ऑस्ट्रेलोपिथिकस), आदिमानव (होमोइरेक्टस), निएंडरथल मानव आणि आजचा आधुनिक-शहाणा मानव (होमोसॅपीयन) हे उत्क्रांतीतील महत्त्वाचे टप्पे आहेत; तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि महाष्मयुग हे मानवाच्या संस्कृतीचे टप्पे पडले आहेत. संस्कृतीमधील या स्थित्यंतराचे पुरावे पुरामानवशास्त्रीय अभ्यासासाठी महत्त्वाचे असतात.  कामाच्या बदलत्या स्वरूपामुळे (उदा., शिकारी अवस्था, शेती व्यवसाय इत्यादींमुळे) शरीर अवस्थेत झालेले सूक्ष्म बदल, तत्कालीन आहार, आजार, पर्यावरण, लोकसंख्या यांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. तसेच मानवशास्त्राच्या या सर्व शाखांच्या समन्वयातून मानवाचा सर्वांगीण अभ्यास होतो. मानवशस्त्राचा संबंध जीवशास्त्र व सामाजिकशास्त्र या दोनही शाखांत येत असल्याने या विषयाच्या अभ्यासात दोनही शास्त्रांतील अभ्यासपद्धतींचा विचार करावा लागतो. हे एक अनुभवसिद्ध आणि प्रत्यक्षतावादी शास्त्र आहे. या विषयांचा अभ्यास करताना ऐतिहासिक पद्धती, पुरावस्तू संशोधन पद्धती, तौलनिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती, सहभागी आणि असहभागी निरीक्षण पद्धती, संख्याशात्रीय पद्धती, वंशावळ पद्धत, अभिलेखन पद्धती, कार्यशोधक पद्धती इत्यादींचा गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार वापर केला जातो. मानवशास्त्राचे सर्व प्रकारच्या विज्ञानांशी व मानव्यविद्यांशी परस्परसंबंध असल्यामुळे मानवाचा सर्वांगीण, साकल्याने अभ्यास करणारे मानवशास्त्र हे एकमेव शास्त्र आहे.

समीक्षक : सुभाष वाळिंबे