एक सुगंधी झुडूप. दवणा ही वर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आर्टेमिसिया पॅलेन्स आहे. ॲस्टर, डेझी, सूर्यफूल या वनस्पतीही ॲस्टरेसी कुलात समाविष्ट आहेत. ही वनस्पती मूळची भारतातील असून दक्षिण भारतात कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत लागवडीखाली आहे.
दवणा वनस्पती ४०–६० सेमी. उंच व सरळ वाढते. खोडावर लव असते. दवण्याच्या खालच्या, मधल्या व वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. खालून वर पानांची विभागणी कमी-कमी होत गेलेली असते. सर्वांत खालची पाने फार विभागलेली, मधली कमी विभागलेली तर वरची अखंडित असतात. फुले (स्तबक फुलोरे) गोलसर, पिवळट हिरवे, लहान आणि गुच्छाने येतात. बी फार लहान, काळे व लांबट असते.
दवणा सुगंधी, कडू आणि तिखट आहे. या वनस्पतीपासून बाष्पनशील तेल मिळते. या तेलात दवॅनोन आणि लिनॅलूल हे मुख्य घटक असतात. हे तेल दाट व सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात. वनस्पतीची पाने, देठ इ. पुष्पगुच्छ व हार तयार करण्यासाठी वापरतात.