शेवंती (क्रिसँथेमम इंडिकम)

(इंडियन क्रिसँथेमम). एक आकर्षक व शोभिवंत वनस्पती. शेवंती ही बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी (कंपॉझिटी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम आहे. झेंडू, सूर्यफूल, डेलिया या वनस्पतीही ॲस्टरेसी कुलातील आहेत. शेवंती मूळची आशिया खंडातील असून चीन व जपान या देशांतील असावी, असे मानतात.

शेवंतीचे झुडूप ३०–९० सेंमी. उंच वाढते. खोड खरबरीत असून तपकिरी असते. पाने साधी, एकाआड एक, पिसांसारखी असून पानांच्या कडा विभागलेल्या (कुरतडल्यासारख्या) असतात. कडा क्वचित मऊ असतात. फुलोरे स्तबक प्रकारचे, एकेकटे किंवा कमी-अधिक समशिखी असून साधारणपणे नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात येतात. फुले मुख्यत: पांढऱ्या-पिवळ्या रंगाची असतात. मात्र संकर पद्धतीने उत्पादित केलेली शेवंतीची फुले लाल, गुलाबी, जांभळा या रंगांच्या विविध छटांमध्ये आढळतात. फुलांमध्ये असलेल्या कॅरॉटिनॉइडमुळे फुलांना विविध रंग प्राप्त होतात.

विविधरंगी आकर्षक फुलांसाठी शेवंतीची लागवड करतात. शेवंतीच्या लाल प्रकारच्या फुलात क्रिसँथेमिन हे ग्लुकोसाइड असते, तर पिवळ्या फुलात फ्लॅव्होन हे रंगद्रव्य ल्यूटिओलिन या ग्लुकोसाइडाच्या रूपात असते. फुलांपासून पायरेथ्रम हे द्रव्य मिळवितात. त्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून केला जातो. चीनमध्ये पारंपरिक औषधांत शेवंतीचा उपयोग करतात. काही ठिकाणी शेवंतीच्या फुलांपासून चहा बनवतात. तो सुगंधी असून आरोग्यदायी मानतात. घशाची सूज, ताप, डोकेदुखी यापासून आराम मिळण्यासाठी शेवंतीचा चहा पितात. हवेतील प्रदूषके – विशेषत: बेंझीन, फॉर्माल्डिहाइड, ट्रायक्लोरोएथिलीन, झायलीन, टोल्यूइन, अमोनिया अशी – शेवंतीच्या क्रिसँथेमम प्रजातीतील वनस्पती कमी करू शकतात, असे अमेरिकेतील नॅशनल ॲरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) या संस्थेच्या प्रयोगशाळेतील संशोधनात आढळून आले आहे. ऑस्ट्रेलियात ‘मदर्स डे’ या दिवशी शेवंतीची फुले आईला भेट म्हणून देतात. शेवंतीचे फूल शिकागो शहराचे अधिकृत फूल आहे.