फॅगेसी कुलातील कॅस्टानिया प्रजातीतील वनस्पतींना सामान्यपणे चेस्टनट म्हणतात. ओक, बीच या वनस्पतीही याच कुलातील आहेत. चेस्टनट मूळची उत्तर गोलार्धातील आहे. कॅस्टानिया प्रजातीमध्ये ८ ते ९ जाती असून त्यांपैकी युरोपीय चेस्टनट (कॅ.सॅटिव्हा ), चिनी चेस्टनट (कॅ. मॉलीसीमा ), जपानी चेस्टनट (कॅ. क्रेनॅटा) व अमेरिकन चेस्टनट (कॅ. डेंटॅटा) या चार मुख्य जाती आहेत. पुढील माहिती जपानी चेस्टनट या जातीसंबंधी आहे.

चेस्टनट वृक्ष

झुडूप ते महावृक्ष या प्रकारात ही वनस्पती आढळते. तिची उंची १०-१५ मी. असते. खोड मजबूत, ताठ आणि सरळ वाढणारे असून खोडाचा रंग राखाडी असतो. पाने साधी, अंडाकृती किंवा भाल्याप्रमाणे, ८.१९ सेंमी. लांब आणि ३.५ सेंमी. रुंद असून कडा दातेरी असतात. फुलोरा कणिशासारखा असतो. फुले वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या आरंभी येतात. कणिशाच्या वरच्या भागात नर-फुले तर खालच्या भागात मादी-फुले येतात. फुले उन्हाळ्यात येतात आणि साधारणपणे दोन महिन्यांनंतर मादीफूलांचे काटेरी चषिकांमध्ये रूपांतर होते. या फळांमध्ये ३-७ दृढफळे असतात. फळांचा व्यास २.५ – ५ सेंमी. असतो. फळे पक्व झाल्यानंतर पिवळट तपकिरी रंगाची दिसतात. भेगा पडून फळे फुटतात. फळाचे एक टोक निमुळते असून तिथे मऊ केसांचा झुपका असतो. फळांच्या सालीला दोन स्तर असतात; बाहेरचा स्तर कठीण, चमकदार व तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या आतील पातळ पापुद्रयाला तनुत्वचा म्हणतात. त्याला बी चिकटलेले असते.

चेस्टनट फळे

बियांतील मगज (गर) कच्चे, शिजवून, भाजून किंवा पीठ करून इतर पदार्थांमध्ये घालतात. फळे आंबट-गोड असल्यामुळे ती खातात. लाकूड कठीण, टिकाऊ आणि उपयुक्त असून ते सजावटीचे सामान, कुंपणाचे खांब व सिलीपाट (रेल्वे स्लीपर्स) यांसाठी वापरतात. भारतात इंडियन चेस्टनट नावाने ओळखली जाणारी वनस्पती आढळते. या वनस्पतीचे शास्त्रीय नांव अस्कुलस हिप्पोकॅस्टानिया असून ती प्रस्तुत प्रजातीहून वेगळी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा