दारुहळद हे सदापर्णी झुडूप बर्बेरिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बर्बेरिस अरिस्टॅटा आहे. ही वनस्पती मूळची भारत आणि नेपाळ या देशांमधील हिमालय पर्वतातील आहे. बर्बेरिस प्रजातीत ४००–४५० जातींचा समावेश होतो. आशिया, यूरोप व अमेरिका खंडांतील समशीतोष्ण विभागात या जाती आढळतात. दारुहळद ही भारतात सर्वत्र तसेच श्रीलंकेतील आर्द्र प्रदेशात आढळते.

दारुहळद (बर्बेरिस अरिस्टॅटा): फुलोरा

दारुहळद हे काटेरी व लहान झुडूप २–३ मी. उंच वाढते. सरळ वाढणाऱ्या या झुडपाचे खोड काष्ठीय असून बाहेरून तपकिरी तर आतून पिवळ्या रंगाचे असते. पाने साधी, एकाआड एक व लांब असून काही पानांचे रूपांतर काट्यांत (शल्क) झालेले असते. हे शल्क हाताने काढता येतात. मार्च ते एप्रिल महिन्यांत या झुडपाला फुले येतात. फुले मोठी, पिवळी व द्विलिंगी असून फुलोरा असीमाक्ष प्रकारातील असतो. फुलांत तीन लहान व तीन मोठ्या पाकळ्या (निदलपुंज) असून त्या एकमेकांपासून अलग असतात. मृदुफळ रसाळ व गडद लाल असून त्याचे वजन सु. २० ग्रॅ. असते.

दारुहळद झुडपाचे मूळ, खोड व फळ औषधी आहे. मुळांच्या सालीपासून काढलेल्या अर्काला ‘रसौत’ म्हणतात. साल व रसौत आरोग्यदायी आणि रेचक असून त्वचाविकार, कावीळ, डोळ्यांचे विकार इत्यादींवर वापरतात. फळांमध्ये अनेक प्रकारच्या शर्करा व उपयुक्त पोषणमूल्ये असतात. मुळे व खोड यांपासून मिळालेला पिवळा रंग कापड रंगविण्यासाठी तर कातडे कमाविण्यासाठी टॅनीन उपयुक्त असते.