संकेश्वर (सीसॅल्पिनिया पल्चेरिमा): (१) झुडूप, (२) फुले, (३) शेंगा, (४) बिया.

(पीकॉक फ्लॉवर). एक शिंबावंत व शोभिवंत फुलझाड. संकेश्वर ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया पल्चेरिमा आहे. गुलमोहर, सोयाबीन, वाटाणा या शिंबावंत वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. संकेश्वर बहुधा मूळची अमेरिकेतील असून जगभर तिचा प्रसार झालेला असावा. काहींच्या मते ती मूळची वेस्ट इंडिजमधील असावी, परंतु तिची लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झाल्याने तिचे मूलस्थान नक्की सांगता येत नाही. तिला ‘संकासूर’ असेही म्हणतात.

संकेश्वराचे झुडूप २–३ मी. उंच वाढते. काही वेळा ते अधिक उंच वाढल्याचे दिसून आलेले आहे. फांद्यांवर तुरळकपणे नरम काटे असतात. पाने एकाआड एक संयुक्त व पिसांसारखी, २०–४० सेंमी. लांब असतात. ती दोनदा विभागलेली असून त्यांवर दलांच्या ६–१२ जोड्या असतात. प्रत्येक दल सु. ७ सेंमी. लांब असून त्यावर दलकांच्या ६–१० जोड्या असतात. फुलोरे बहुधा फांद्यांच्या टोकास येत असून त्यांवर लांब देठाची लाल किंवा पिवळी फुले वर्षभर येतात. फुले मध्यम आकाराची असून निदले आणि दले (पाकळ्या) रंगीत व प्रत्येकी पाच असतात. फुलातील एक निदल व एक दल इतरांहून भिन्न असते. पुंकेसर दहा, लांब, ठळक, वेगवेगळी आणि लाल किंवा पिवळी असतात. अंडपी एक असते. फळ (शेंग) ६–१२ सेंमी. लांब, पातळ, पिंगट आणि टोकदार असते. बिया ५–१०, चपट्या व फिकट तपकिरी असतात. तडकताना शेंगेची दोन्ही शकले स्वत:भोवती पिळवटतात आणि त्यामुळे बिया काही अंतरावर फेकल्या जातात.

संकेश्वराच्या फुलाला कॅरिबियन बेटावरील बार्बाडोस देशाने राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे. फुले भडक व आकर्षक असल्यामुळे अनेक देशांत तसेच भारतात बागांची शोभा वाढविण्यासाठी या वनस्पतीची लागवड करतात. तिच्या उंचीमुळे तिचा कुंपणासाठीदेखील वापर करतात. संकेश्वराच्या फुलांतील मकरंद मिळविण्यासाठी तिच्या फुलांकडे हमिंग पक्षी (गुंजन पक्षी) पटकन आकर्षित होतात. सीसॅल्पिनिया प्रजातीतील सर्व वनस्पतींच्या बिया विषारी असतात. परंतु, काही जातींच्या कोवळ्या किंवा भाजलेल्या बिया खाण्यालायक असतात. फुले जंतविकार व जुनाट खोकल्यावर गुणकारी असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे. सतराव्या शतकात सुरिनाम या देशात संकेश्वराच्या फुलांचा उपयोग गर्भपात घडवून आणण्यासाठी वापरल्याचा उल्लेख आहे.