(इंडियन जायंट स्क्विरल). सर्वांत मोठ्या आकाराची खार. शेकरूचा समावेश स्तनी वर्गाच्या कृंतक गणाच्या सायूरिडी कुलातील रॅट्युफा प्रजातीत होतो. महाराष्ट्रात सामान्यपणे आढळणाऱ्या शेकरूचे शास्त्रीय नाव रॅट्युफा इंडिका आहे. तिला ‘शेकरी’, ‘शेकरा’, ‘भीमाशंकरी’ असेही म्हणतात. पश्चिम घाटातील घनदाट वनांपासून पूर्वेकडच्या मिदनापूर, कटक या प्रदेशांपर्यंत ती आढळते. इंडियन जायंट स्क्विरल (रॅट्युफा इंडिका), ग्रिझल्ड जायंट स्क्विरल (रॅट्युफा मॅक्रोयुरा) व मलबार जायंट स्क्विरल (रॅट्युफा बायकलर) या तिन्ही जाती शेकरू नावाने ओळखल्या जातात. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.

शेकरू (रॅट्युफा इंडिका)

पूर्ण वाढलेल्या शेकरूची डोक्यासहित शरीराची लांबी सु. एक मी.पर्यंत असून त्यांपैकी शेपटी सु. ६० सेंमी. लांब असते. वजन सु. २ किग्रॅ. असते. शरीराचा रंग केशरी तपकिरी असून खालचा भाग पांढरा असतो. शेपटी जाड व झुपकेदार असते. तिचा उपयोग शेकरूला लांब उड्या मारताना तोल सावरण्यासाठी होतो.

शेकरू लाजाळू व भित्रे असल्याने दाट झाडीत लपून राहतात. त्यांच्या आवाजावरून त्यांचे वास्तव्याचे ठिकाण कळते. जमिनीवर ते क्वचितच दिसतात. ते बहुतकरून उंच झाडाच्या वरच्या शेंड्यावर बसलेले आढळतात. ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब-लांब उड्या मोठ्या चपळतेने मारतात. त्यांचे हातपाय लांब असल्याने ते एका उडीत ६-७ मी. अंतर पार करू शकतात. ते पहाटे व संध्याकाळी अधिक सक्रिय असतात. दुपारची उन्हाची वेळ ही त्यांची विश्रांतीची वेळ असते. हातपाय ताणून आणि शेपटी खाली लोंबत सोडून ते झाडांच्या फांदीवर झोपी जातात. झाडांची फळे, फुले व पाने हे त्यांचे खाद्य आहे. त्यांना धोका वाटला किंवा कोणी घाबरविले तर ते माकडाप्रमाणे खूप गलका करतात. ते सहसा एकटे किंवा नर-मादी जोडीने दिसतात. दाट फांद्यांमध्ये पाने व काटक्या जमवून गोल आकाराची घरटी बांधतात. एक शेकरू अनेक झाडांवर आपली घरटे बांधतो. झोपण्यासाठी तसेच पिले ठेवण्यासाठी या घरट्यांचा उपयोग होतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो.

शिकारी पक्षी व बिबटे हे शेकरूचे भक्षक आहेत. शेकरू त्यांच्या अधिवासात बियांचा प्रसार करीत असल्याने तेथील परिसंस्थांना आकार देण्यात व विकासात ते मोलाचा वाटा उचलतात. महाराष्ट्र राज्याने पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे शेकरूसाठी अभयारण्य राखून ठेवले आहे.

भारतात शेकरूच्या रॅ. मॅक्रोयुरा, रॅ. बायकलर आणि रॅ. ॲफिनीस या तीन जाती आढळतात. रॅ. मॅक्रोयुरा ही जाती भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत आणि श्रीलंकेत आढळते. शेकरूंमध्ये ही जाती सर्वांत लहान असून तिच्या शरीराची लांबी २५–४५ सेंमी. असते. रॅ. बायकलर ही जाती भारत, चीन, बांगला देश, नेपाळ, भूतान ते व्हिएटनाम, इंडोनेशिया या देशांत आढळते. ही जाती आकारमानाने सर्वांत मोठी असून शरीराची लांबी ३५–५८ सेंमी. असते. शरीराचा पाठीकडील भाग व शेपटी पूर्णपणे काळी असते; तर गाल, छाती आणि पोटाकडचा भाग पिवळसर तपकिरी किंवा नारिंगी असतो. रॅ. ॲफिनीस ही जाती भारत, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड या देशांत आढळते. ही जाती आकाराने रॅ. इंडिका एवढीच असून तिच्या शरीरावर असलेल्या रंगांच्या वैशिष्ट्यपूर्ण खुणांमुळे ती वनांमध्ये सहज ओळखता येते. शेकरूचा आयु:काल सु. २० वर्षे असतो.