फायलँथॅसी कुलातील आवळी हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात, वनामध्ये किंवा लागवडीखाली वाढतो. त्याचे शास्त्रीय नाव एंब्लिका ऑफिसिनॅलिस आहे. भारतात सर्व पानझडी वनामध्ये, समुद्रसपाटीपासून सु. २०० मी. उंचीपर्यंत टेकड्यांच्या उतारावर आणि सपाटीला लागवडीखाली तो आढळतो. महाराष्ट्रात हा वृक्ष कोकण, पश्चिम घाट, दख्खनचे पठार इ. ठिकाणी आढळतो.

आवळीचे झाड मध्यम आकाराचे असून ते सु. ८ ते १५ मी. उंच वाढते. त्याचे खोड वाकडे-तिकडे, फांद्या पसरट व मोठ्या, साल जाड व हिरवट करडी असून तिच्या लहान व पातळ ढलप्या निघतात. पाने साधी, अनेक, एकाआड एक, लहान देठांची व लहान असून लहान फांद्यांवर दोन रांगांत असतात. त्यामुळे पाने पिसांसारखी दिसतात. हिरवट पिवळ्या फुलांचे झुबके पानांच्या बगलेत किंवा पानांखालच्या फांदीच्या भागावर मार्च-मे मध्ये येतात. फुले एकलिंगी असून नर फुलांची संख्या मादी फुलांच्या तुलनते अधिक असते. मृदुफळ (आवळा) गोल, मांसल, फिकट हिरवट पिवळे व त्यावर सहा उभ्या रेषा असतात. बी एकच व त्रिधारी असते.

आवळ्यात पाणी (८१ %), प्रथिने (०.५ %), स्निग्ध पदार्थ (०.१ %), क्षार (०.५ %), कर्बोदके (१३-१४ %) आणि तंतू असतात. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असते. तसेच त्यामध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादींची संयुगेही असतात.

आवळा (फळ) हे एक उपयुक्त खाद्य आहे. त्यापासून लोणचे, मुरांबा, सुपारी इ. करतात. आवळा तुरट, शीतल व मूत्रल असून वाळलेली फळे (आवळाकाठी) अतिसार, आमांश व रक्तस्राव यांवर उपयुक्त ठरतात. मधुमेह, खोकला, श्वासनलिकादाह, दमा, कावीळ, त्वचारोग, केस अकाली पांढरे होणे आणि इतर अनेक रोगांवर आवळा गुणकारी ठरतो. हिरडा व बेहडा या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून ‘त्रिफळा चूर्ण’ तयार करतात. ‘क’ जीवनसत्त्व असल्याने आवळा स्कर्व्ही या विकारावर गुणकारी ठरतो. आवळीचे मूळ व साल तुरट असून कावीळ, हगवण आणि व्रण (अल्सर) या विकारांवर उपयुक्त असते, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. सालीत, पानात व फळात टॅनिन भरपूर असते. याचा उपयोग चामडी कमाविण्यासाठी करतात. इमारतीच्या बांधकामात किरकोळ उपयोगासाठी या वृक्षाचे लाकूड वापरतात.