पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता ही अत्यंत गरजेची व महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक वर्षी पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होतो. याचा परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होतो.‍ जमिनीची सुपिकता आजमाविण्यासाठी माती परीक्षण करण्याची गरज आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यास मदत होते. त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते. शाश्वत शेतीसाठी मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे व त्याचे योग्य प्रकारे पृथ:करण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. परीक्षणाची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यत:नमुना घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. म्हणूनच नमुना हा शास्त्रोक्त पद्धतीने घेणे गरजेचे आहे.

मातीचा प्रातिनिधीक नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत : प्रथम शेतीची पहाणी करून जमिनीच्या गुणधर्मांनुसार (उदा., जमिनीचा रंग, खोली, चढउतार, उंचसखलपणा, पाणथळपणा आणि चोपण इत्यादीनुसार) विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. नमुना ज्या जमिनीवर घ्यावयाचा आहे, त्या क्षेत्रावर सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक नागमोडी रेषा गृहीत धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे अंदाजे १०-१२ ठिकाणचा नमुना घ्यावा. नमुना घ्यावयाचे जागेवरील काडीकचरा बाजूला करून कुदळ किंवा फावड्याच्या साहाय्याने इंग्रजी व्ही (V) आकाराचे खड्डे घ्यावेत. विविध पिकांच्या मुळांच्या वाढीनुसार खड्ड्यांची खोली ठरविणे आवश्यक आहे.

तक्ता : १ विविध पिकांसाठी माती नमुना घेण्यासाठी जमिनीची खोली

अ.क्र. पिकांचे नाव खड्ड्यांची खोली
हंगामी पिके – उदा., ज्वारी, भात, गहू, सोयाबीन, भुईमुग इत्यादी. १५-२० सेंमी
नगदी पिके – कापूस, ऊस, केळी इत्यादी ३० सेंमी
फळ पिके झाडाच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या थरातून

जमिनीच्या वरील पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खड्ड्यांतून खुरप्याच्या/लाकडी खुंटीच्या साहाय्याने खरडून गोळा करावी.  १०-१२ ठिकाणच्या एकत्र केलेल्या मातीचे चार समान भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत व उर्वरित दोन भाग एकत्र मिसळून एक किलो माती शिल्लक राहील अशा पद्धतीचा अवलंब करावा. माती गोळा करण्यासाठी खुरपे, गीरमीट, घमेले इ. वापरावे.धातूचे साहित्य वापरू नये. माती ओली असल्यास ती कापडावर सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ कापडी/पॉलिथीन पिशवीत भरून खाली नमूद केलेल्या योग्य माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी.

 • शेतकऱ्यांचे नाव, पूर्ण पत्ता व दूरध्वनी/मोबाईल क्र.
 • नमुना घेतल्याची तारीख.
 • सर्व्हे नंबर/गट क्रमांक.
 • शेतीचा प्रकार-बागायती/कोरडवाहू.
 • ओलिताचे साधन.
 • जमिनीचा निचरा (चांगला/मध्यम/कमी).
 • जमिनीचा प्रकार- (वाळू/पोयटा/चिकणमाती/क्षारयुक्त/विम्ल/चुनखडीयुक्त).
 • जमिनीचा उतार (जास्त/मध्यम/सपाट).
 • जमिनीची खोली (उथळ २५ सेंमी, मध्यम २५ ते ५० सेंमी, खोल ५० ते १०० सेंमी, अतीखोल १०० सेंमीपेक्षा जास्त).
 • मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन.
 • मागील हंगामातील पिकास वापरलेली खते व त्यांचे प्रमाण.
 • पुढील हंगामात घ्यावयाची पिके आणि त्याचे वाण.

फळबागेसाठी जमीन : फळझाडांच्या लागवडीसाठी शेतातील मातीचे परीक्षण करून घेऊन योग्य जमिनीची निवड करावी. याकरिता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार वर सांगितल्याप्रमाणे विभाग पाडून प्रत्येक विभागातून नागमोडी वळणावर खड्डे घ्यावेत. फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीत ९० सेंमी. किंवा मुरुम अगोदर लागल्यास मुरुमापर्यंत खोल खड्डा करून मातीचे नमुने गोळा करावेत. जमिनीच्या उभ्या छेदाचे ० ते ३० (एक फूट), ३० ते ६० (दोन फूट) व ६० ते ९० (तीन फूट) सेंमी नुसार भाग पाडावेत व प्रत्येक खोलीच्या थरातून सारख्या जाडीची मातीची खाप काढून वेगवेगळ्या पिशवीत भरावी. सर्व खड्ड्यातील थरांप्रमाणे माती ज्या त्या थरांतील खोलीप्रमाणे एकत्र करून एक किलो माती वेगवेगळ्या पिशवीत भरावी. त्यामध्ये नमुन्याची खोली व वरील माहितीची चिठ्ठी टाकावी.

खारवट व चोपण जमीन : खारवट व चोपण जमिनीचे यशस्वीरित्या सुधारणा व व्यवस्थापन करण्यासाठी समस्यांचे स्वरूप आणि त्याची तीव्रता याचे योग्य मूल्यमापन करून निदान होणे जरुरीचे आहे. यासाठी अशा जमिनीतून परीक्षणासाठी मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे गरजेचे आहे. जमिनीच्या प्रकारानुसार शेतीचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे विभाग पाडून एका विभागातील एक याप्रमाणे एक मीटर लांब, एक मीटर रुंद व एक मीटर खोल या आकाराचे खड्डे करावेत. खड्ड्याच्या उभ्या छेदाचे ० ते ३० (एक फूट), ३० ते ६० (दोन फूट), ६० ते ९० (तीन फूट) व ९०-१२० (चार फूट) सेंमी असे भाग पाडावेत. प्रत्येक भागातून सारख्या जाडीचा मातीचा थर काढून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरावा. क्षारयुक्त जमिनीच्या पृष्ठभागावर थर असल्यास त्या थरातील माती वेगळी गोळा करावी व योग्य त्या माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी.

माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना घेताना घ्यावयाची काळजी : १) शेतात जनावरे बसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहिरीजवळील जागा, शेतीचा बांध, दलदलीची जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नयेत; २) मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर; परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा, शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा; ३) शेतामध्ये रासायनिक खते,शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा. रासायनिक तसेच सेंद्रीय खते दिल्यानंतर साधारणपणे दोन ते अडीच महिन्यापर्यंत मातीचा नमुना घेऊ नये; ४) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे वा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत; ५) रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत; ६) मातीचा नमुना घेताना कृषी सहायक किंवा ग्राम विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

समीक्षक – भीमराव उल्मेक