अब्जांश तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्राला लाभलेले एक वरदान आहे. या तंत्रज्ञानामध्ये कृषी व अन्न उद्योग क्षेत्रात प्रचंड बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे अनेक देश आता अब्जांश तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करीत आहेत.

अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषी व अन्न या क्षेत्रात विविध उपयोग आहेत. अब्जांश कण (Nanoparticles) व कार्बन अब्जांश  नलिका (Carbon Nanotubes) यांच्या सहाय्याने बीजप्रक्रिया करून बीजांची उगवण क्षमता वाढविता येते. याचा उपयोग मुख्यत्वेकरून सुप्तावस्थेत असलेल्या व जाड बीजावरण असलेल्या बियांसाठी केला जातो. रोग, कीड व तृण हे पिकांचे प्रमुख शत्रू आहेत. या शत्रूंचे नियंत्रण करण्यासाठी सर्वसामान्यपणे पारंपरिक कृषी-रसायने वापरली जातात. यांच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन, वायू व पाणी यांचे प्रदूषण होते. शिवाय तयार फळावर या रसायनांचा अंश (Chemical residue) राहतो, तो मानवी आरोग्यास हानिकारक असतो. पारंपरिक कृषी-रसायनांऐवजी अब्जांश कृषी-रसायने वापरल्याने रोग, कीड व तृण यांचे परिणामकारक नियंत्रण होतेच व याचबरोबर त्यांचा हानिकारक अंश फळे, भाजीपाला यांवर शिल्लक रहात नाही.

‘अब्जांश अन्नउद्योग’ (Nano-food industry) जगामध्ये आता मोठया प्रमाणात वाढत आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग, अन्न पाकिटे तयार करण्याचा उद्योग (Food packaging industry) व अन्न वाहतूक उद्योग यांचा मोठा वाटा आहे. अन्नपदार्थांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी अद्ययावत वेष्टनांचा आता वाढत्या प्रमाणावर उपयोग केला जावू लागला आहे. ही वेष्टने उष्णतेला प्रतिरोध करतात, तसेच त्यांचा वापर केल्याने अन्न पाकिटांची यांत्रिक हानी (Mechanical damage) खूपच कमी प्रमाणात होते. काही कंपन्या अन्नाच्या वेष्टनांमध्ये इलेक्ट्रॉनिक रसनेंद्रिये बसवितात. त्यामुळे अन्न खराब झाल्याचे पूर्वसंकेत मिळतात व अशी अन्न पाकिटे खुल्या बाजारात विक्रीला जाणार नाहीत याची काळजी घेता येते. अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग अन्नाचा स्वाद, चव, पोत यामध्ये सुधारणा करण्यासाठी देखील होतो.

अब्जांश तंत्रज्ञानाचे इतरही अनेक उपयोग आहेत. लाकडाच्या उत्पादनाचा टिकाऊपणा वाढविणे, सिंचनाचे पाणी गाळणे, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविणे अशा विविध गोष्टींसाठी अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. दुष्काळी भागामध्ये पीक उत्पादन वाढीसाठी हे तंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. फुलदाणीतील फुलांचा ताजेपणा अधिक काळ टिकविण्यासाठी चांदीच्या अब्जांश कणांचा उपयोग केला जातो. वनस्पतीमध्ये आवश्यक ते जनुकीय बदल घडवून सुधारणा करण्यासाठी अब्जांश पदार्थांचा वापर केला जातो. अब्जांश तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली कृषी यंत्रे व अवजारे ही अधिक टिकाऊ असतात. कारण त्यांची होणारी झीज व गंजण्याची क्रिया खूपच कमी प्रमाणात असते. या विवेचनावरून आपणास असे म्हणता येईल की अब्जांश तंत्रज्ञानामध्येपुढील हरितक्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.

समीक्षक – वसंत वाघ

This Post Has One Comment

  1. Ruchika Shinde (I can study this nanotechnology )

    Beautiful and intersecting information to agricultural . I am belong to the farmer family so I can reading to the agricultural information to book Internet and you tube.
    I am commerce study but farming is my hobbies so I can reading to the agricultural information to so many book and etc .reading to this information to nano technology waau india can increased to agricultural development

प्रतिक्रिया व्यक्त करा