मनुष्याला तसेच इतर प्राण्यांना होणारा तीव्र संक्रामक रोग. क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी या जीवाणूंपासून शरीरात तयार होणाऱ्या जीवविषामुळे या रोगाची बाधा होते.ऐच्छिक स्नायूंना आकडी येऊन ते ताठरणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारच्या जखमेतून तसेच अगदी साध्या ओरखड्यातून हे जीवाणू आत शिरू शकतात. क्सिजनविरहित वातावरण या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्याने जखमा व खोल भेगामध्ये सहज वाढतात. विशेषत: मातीत व धुळीत हे जीवाणू मोठ्या संख्येने असतात. गायी, म्हशी, घोडे, कुत्रे इ. प्राण्यांच्या आतड्यांत व विष्ठेतही हे जीवाणू असतात. जखमेवर साचलेल्या मातीत धनुर्वाताचे जीवाणू असू शकतात. या रोगाचे संक्रामण रुग्णाच्या संपर्कातून किंवा हवेतून होत नाही.

धनुर्वाताचे जीवाणू: क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी

धनुर्वात जीवाणूंचा परिपाक (उबवण) काल साधारणपणे दोन दिवस ते दोन आठवडे असतो; परंतु काही वेळा हा काल तीन महिन्यांचा असू शकतो. हा काल जेवढा अधिक तेवढा रोग सौम्य असतो. शरीरात जीवाणूंनी प्रवेश केल्यानंतर ३–१४ दिवसांत या रोगाची लक्षणे दिसू लागतात. या जीवाणूंपासून टेटॅनोस्पाझ्मीन हे जीवविष तयार होऊन ते त्यांच्या पेशींमधून उत्सर्जित होते. या तयार झालेल्या घातक जीवविषाच्या प्रमाणानुसार आणि बाधित व्यक्तीच्या प्रतिकारक्षमतेनुसार या रोगाची शक्यता आणि तीव्रता ठरते. ज्या ठिकाणी हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात तेथे हे जीवविष रक्तप्रवाहात मिसळून मेरुरज्जूतील चेतापेशींपर्यंत पोहोचते आणि चेतापेशींची हानी करते. ते ॲसिटील कोलीन या पदार्थाच्या निर्मितीवर देखील वाईट परिणाम करते. त्यामुळे शरीरभर चेताआवेगांचे पारेषण नीट घडून येत नाही. रुग्णाच्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे ऐच्छिक स्नायू कडक व ताठर होतात आणि वारंवार व कधीही तीव्र आकडी येते. पाठीच्या मणक्यातील स्नायू आकाराने मोठे व मजबूजत असतात. या स्नायूंच्या आकुंचनामुळे पाठीच्या कण्याला बाक येऊन शरीराचा आकार धनुष्यासारखा होतो. या अवस्थेवरून या रोगाला धनुर्वात हे नाव पडले आहे. आजाराने गंभीर रूप धारण केल्यास हात, पाय व इतर काही ऐच्छिक स्नायूंच्या ताठरपणामुळे रुग्णाला वस्तू नीट पकडता येत नाहीत. तोंडाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे रुग्ण हसत असल्याचा भास होतो. या अवस्थेला रायझस सारडोलिकस हास्यानुकारी मुखभंग म्हणतात. काही वेळा गुंतागुंत झाल्यामुळे रुग्ण दगावू शकतो.

धनुर्वात या रोगाची सुरुवात जबड्याच्या स्नायूंपासून होते. रुग्णाच्या जबड्याचे स्नायू अंकुचित झाल्यामुळे त्याला तोंड उघडायला त्रास होतो, उच्चार नीट करता येत नाहीत आणि अन्न गिळतानाही त्रास होतो. म्हणून या रोगाला ‘लॉकजॉ’ असेही म्हणतात.

धनुर्वात उद्भवलेले बालक

धनुर्वाताच्या अवस्थेनुसार या रोगाचे प्रकार पडतात. सार्वदेहिक प्रकारात शरीरातील सर्व स्नायू आकुंचन पावतात. स्थानिक धनुर्वातामध्ये जखमेलगतचे स्नायू आकुंचन पावतात. नवजात बालकांमध्ये नाळ कापताना झालेल्या संसर्गातून तात्काळ संक्रामण होऊन धनुर्वात उद्भवू शकतो. गरोदरपणी ज्या मातांना धनुर्वाताची लस दिलेली असते, त्या अर्भकांना मातेकडून प्रतिकारशक्ती अगोदरच मिळालेली असते. अशा अर्भकांना धनुर्वात होत नाही. धनुर्वाताच्या लसीकरणामुळे नवजात अर्भकांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.

जखमेवर उपचार करताना प्रथम जखम स्वच्छ करतात आणि जखमेवरील मृत व बाधीत ऊती खास मृतऊतिनाशक द्रवाद्वारे काढून टाकतात. जीवाणूंची संख्या कमी करण्यासाठी मेट्रोनाडेझॉल या प्रतिजैविकाचा वापर करतात. जखम झालेल्या कोणत्याही व्यक्तीला प्राथमिक सुरक्षितता म्हणून धनुर्वाताच्या निर्विषीकरणाची लस देतात. याखेरीज प्रतिजैविके, शामके आणि स्नायू शिथिल होणारी औषधे देतात. रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर कृत्रिम श्वासोच्छवासाला मदत करणाऱ्या साधनाचा (व्हेंटिलेटर) वापर करतात.

अनेक संक्रामक रोगांप्रमाणे धनुर्वातातून एखादा रुग्ण आपोआप बरा झाल्यास त्याच्या शरीरात धनुर्वातरोधी प्रतिकारक्षमता निर्माण झाली, असे होत नाही. याचे कारण टेटॅनोस्पाझ्मीन या जीवविषाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो. धनुर्वात निर्विषीकरणाची लस देऊन या रोगाचा प्रतिबंध करता येतो. म्हणून नवजात अर्भकांना सहा महिन्यांच्या आत घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला यांवरील त्रिगुणी लस (ट्रिपल डोस) देतात. अर्भकाला ही लस इंजेक्शनावाटे वयाच्या ६व्या, १०व्या आणि १४व्या आठवड्यांत देतात. तसेच या रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती टिकून राहावी म्हणून दोन बूस्टर डोस देतात; पहिला डोस दोन वर्षांनंतर, तर दुसरा पाच वर्षांनंतर देतात. तसेच प्रत्येक बालकाला दर पाच वर्षांनी आणि प्रत्येक प्रौढाला साधारणपणे दहा वर्षांनी धनुर्वाताचा एक बुस्टर डोस द्यावा, असे सुचविले जाते. सात वर्षांखालील बालकांना त्रिगुणी लस देतात तर सात वर्षांवरील बालकांसाठी व प्रौढांसाठी धनुर्वात आणि घटसर्प या रोगांवरील द्विगुणी लस देतात.