रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणार्‍या वनस्पती. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. वनस्पतींचे औषधी गुणधर्म व उपयोग वैदिक काळात (इ.स.पू.२५०० ते ६५०) ऋषिमुनींनी व अभ्यासकांनी विविध ग्रंथांतून लिहून ठेवले आहेत. आयुर्वेद औषधी पद्धतीचा उदय व विकास भारत देशात झाला. चरकसंहितेमध्ये अष्टांग आयुर्वेद आणि विविध औषधी वनस्पतींचे उपयोग यांची माहिती आढळते. वनस्पती द्रव्यांचे गुणधर्म व उपयोग यांचे वर्णन असलेल्या निघंटुया ग्रंथामध्ये औषधी द्रव्यांचे गुणधर्म विस्ताराने मांडले आहेत.
आयुर्वेद, युनानी, सिद्धा यांसारख्या पारंपरिक औषधी पद्धतींमध्ये ९०% विकारांवर व रोगांवर औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. सांधेदुखी, वात व कावीळ यांसारख्या रोगांवर तयार करण्यात आलेली प्रभावी औषधे केवळ वनस्पतिजन्य आहेत. आजही आपल्या देशात ७०% लोक आरोग्य संवर्धनासाठी वनस्पतिजन्य औषधांचा वापर करतात. भारतातील औषधनिर्मितीमधील २५ हजार सूत्रे वनस्पतिजन्य आहेत.

औषधी वनस्पतींचा वापर करणारे सु. चार लक्ष परवानाधारक वैद्य भारतात आहेत, तर जगात सु. पंधरा लक्ष वैद्य औषधी वनस्पतींचा वापर करतात. वनस्पतिजन्य औषधी निर्माण करणार्‍या प्रयोगशाळा व कारखान्यांची आज भारतातील संख्या सु. आठ हजार आहे.

वनस्पती आपले अन्न हरितद्रव्याच्या मदतीने तयार करतात. या अन्नाच्या चयापचय प्रक्रियेमुळे अनेक प्राथमिक व द्वितीयक रासायनिक पदार्थ तयार होतात. यांना रसस्राव असे म्हणतात. या रसस्रावामध्ये औषधी गुणधर्म असतात. हे रसस्राव वनस्पतींच्या मूळ, खोड, कंद, पान, साल, फूल, फळ व बिया या विविध भागांत साठविले जातात. आयुर्वेदात वनस्पतींच्या या भागांचा वापर औषधनिर्मितीत करतात. आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पतींमधील ३३% वनस्पती वृक्षवर्गीय, २०% झुडूपवर्गीय, ३२% रोपवर्गीय तर १२% वेलवर्गीय आहेत. एकूण औषधी वनस्पतींपैकी २६% वनस्पतींची मुळे, १६.३% वनस्पतींचे पूर्ण अंग, १३.५% वनस्पतींची साल, ४.४% वनस्पतींचे कंद, २.८% वनस्पतींचे लाकूड, १०.३% वनस्पतींची फळे, ६.६% वनस्पतींच्या बिया, ५.८ % वनस्पतींची पाने,५.५% वनस्पतींची खोडे तर ५.२% वनस्पतींची फुले औषधनिर्मितीसाठी वापरतात. ही औषधे काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत असतात. वैद्यकशास्त्रात मटेरिया मेडिका हा एक स्वतंत्र विषय असून यामध्ये वनस्पती औषधांसंबंधी विविध अंगांनी माहिती दिलेली आहे.

वनस्पतींचे औषधी महत्त्व हे त्या वनस्पतींमध्ये असलेल्या औषधी कार्यकारी घटकांवर अवलंबून असते. या घटकांचे अल्कलॉइड, स्टेरॉइड व ग्लायकोसाइड या गणांत वर्गीकरण केले जाते. अलीकडील काळात हे घटक विशिष्ट प्रक्रियेद्वारे वेगळे करून ते वेगवेगळ्या औषधांमध्ये वापरले जातात, तसेच ते परदेशातही पाठविले जातात. यांपैकी स्टेरॉइडांना जगभर खूप मागणी आहे. सॅपोजेनिन व डायोसेजेनिन ही विशिष्ट स्टेरॉइडांची आधारद्रव्ये याम (वराहकंद) या औषधी वनस्पतीच्या कंदापासून मिळवितात. सर्पगंधा या वनौषधीच्या मुळांपासून अनेक अल्कलॉइडे मिळवितात. यांपैकी अजमलिन, सर्पेंटाइन व रेसरपिन महत्त्वाची आहेत. रानरिंगणी किंवा डोर्लीच्या बियांमध्ये सोलॅसोडिन नावाचे अल्कलॉइड असते. ते संतती प्रतिबंधक औषधात वापरतात. डिजिटॅलिस वनस्पतींच्या वाळलेल्या पानांत डिजॉक्सिन नावाचे ग्लायकोसाइड असते. हृदयविकारांवर हे गुणकारी आहे.

अतिविष, बचनाग, सफेद मुसळी, गुग्गूळ, सालमपंजा, वावडिंग, नागकेशर, जटामांसी, कुटकी, सर्पगंधा, मंजिष्ठ, चंदन, चोपचिनी व चिरायत या औषधी वनस्पतींना आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. तसेच कोरफड, बेलाडोना, दारूहळद, सोनामुखी, सदाफुली, ब्राह्मी, कळलावी, ज्येष्ठमध, खाजकुइली, इसबगोल, सिंकोना, अश्वगंधा, अक्ककारा, वेखंड, माका, शतावरी, पिंपळी, कालमेद्य, भुई-आवळी, आवळा, अशोक, बेल, कोकम, गुळवेल व गुडमार या औषधी वनस्पतींनाही बरीच मागणी आहे.

वने ही औषधे वनस्पतींची नैसर्गिक भांडारे आहेत. औषधी वनस्पती पुरविणारा एक महत्त्वाचा देश म्हणून भारत ओळखला जातो. भारतात. सु. ७०% औषधी वनस्पती द्वीपकल्पीय वनांत, तर ३०% वनस्पती हिमालयीन भूप्रदेशातील वनांत आढळतात. सु. ९६% औषधी वनस्पती भारत देशात गोळा केल्या जातात. सतत होणारी बेसुमार औषधी वनस्पतींची तोड व उचल तसेच वृक्षतोडीचा प्रचंड वेग यांमुळे भारतातील १२० औषधी वनस्पती संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. यांपैकी २९ बहुपयोगी दुर्मिळ वनौषधींची तोड करण्यास भारत सरकारने कायद्याने बंदी घातली आहे. यांमध्ये रक्तचंदन, सर्पगंधा, बचनाग, अतिविष, कुटकी, जटामांसी, चिरायत इ. औषधी वनस्पतींचा समावेश आहे. भारतात सु. ८०० वनौषधींचा वापर आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात केला जातो; पण यांपैकी केवळ ७० औषधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर शेतात लागवड केली जाते. औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी त्यांची शास्त्रीय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आवश्यक आहे.