फुलांसह अंबाडी वनस्पती

माल्व्हेसी कुलातील ही वनस्पती मूळची आफ्रिकेतील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस आहे. भारत, बांगला देश, थायलंड,  पाकिस्तान इ. देशांत मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची लागवड करतात. भारतात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र या राज्यांत अंबाडीची लागवड होते. महाराष्ट्रात सोलापूर, धुळे व जळगाव अशा कमी पावसाच्या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात ती लावतात. तंतुमय धाग्यांसाठी ताग या वनस्पतीखालोखाल अंबाडीचा क्रमांक येतो.

अंबाडी साधारण ३-४ मी. उंच व सरळ वाढणारे काटेरी झुडूप आहे. खोडाच्या खालच्या भागातील पाने हृदयाकृती तर वरच्या भागातील पाने हस्ताकृती, खंडित आणि दातेरी असतात. फुले पिवळी व मध्यभागी जांभळी असतात. ती जानेवारी महिन्यात येतात. बिया मोठ्या व तपकिरी असतात.

अंबाडीच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात तर बोंडांची चटणी करतात. कोवळ्या फांद्या पानांसह जनावरांना वैरण म्हणून खाऊ घालतात. गूळ तयार करताना अंबाडीचा वापर केला जातो. बी कोंबड्यांच्या आणि गुरांच्या खुराकासाठी वापरतात. काही लोक पचनशक्ती सुधारण्यासाठी बी भाजून खातात. खोड व फांद्यांपासून धागा (वाख) काढतात. दोर, पिशव्या, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणण्यासाठी वाखाचा उपयोग केला जातो. अंबाडीच्या बियांपासून खाद्यतेलही काढतात. त्यात मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ हे प्रतिऑक्सिडीकारक असते. या तेलाचा उपयोग जैवइंधन म्हणूनही करतात. अनेक देशांत कागद बनविण्यासाठी या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा