धायटी: पानाफुलांसह फांदी

धायटी हे बहुवर्षायू व पानझडी झुडूप लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वुडफोर्डिया फ्लोरिबंडा आहे. वुडफोर्डिया फ्रुटीकोझा अशा शास्त्रीय नावानेही ते ओळखले जाते. ही वनस्पती मूळची भारतातील असून श्रीलंकेतही आढळते. भारतात ती दक्षिण कोकणापासून उत्तरेपर्यंत आढळते. हिमालयात ती समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी.पर्यंत आढळते. मात्र दक्षिण भारतात ती तुरळकपणे दिसते. महाराष्ट्रात धायटीचे झुडूप केशरी फुलांमुळे खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर इत्यादी ठिकाणी उठून दिसते.

धायटीचे झुडूप २ ते ३ मी. उंच वाढते. परंतु धायटीची अर्धा मी.पर्यंत वाढलेली झुडपे आढळतात. खोड खाचा पाडल्याप्रमाणे दिसते. फांद्या पातळ असून त्यावरची साल निघालेली असते. पाने साधी, समोरासमोर, लांबट-त्रिकोणी व टोकदार आणि देठ अतिशय लहान असून ती निस्तेज हिरव्या रंगाची असतात. फुले असंख्य, लहान, गर्द केशरी व द्विलिंगी असून ती पानांच्या बेचक्यात झुबक्याने डिसेंबर ते मे महिन्यांत येतात. फूल म्हणजे २.५ सेंमी. ची पोकळ नळीच असते. तिचे टोक जरा रुंद झालेले असते आणि कडा दातेरी असतात. त्यामधून लाल पुंकेसर बाहेर डोकावताना दिसतात.

फुलांत पाकळ्या (निदलपुंज) प्रत्येकी सहा असून दलपुंज अरुंद, लांबट व टोकदार असतात. फळे (बोंडे) लहान व लवंगासारखी असून ती अनियमितपणे तडकतात. बिया असंख्य, लांबट-त्रिकोणी, तपकिरी आणि गुळगुळीत असतात. धायटीची पाने व फुले स्तंभक आहेत. आयुर्वेदिक आसवे करण्यासाठी धायटीची फुले वापरतात. त्यामुळे किण्वन क्रिया घडते. फुलांमुळे सुंदर रंग येतो आणि ते आंबट होत नाही. मासिक पाळींचे दोष, यकृत विकार, अतिसार इत्यादींवर सुकलेल्या फुलांचे चूर्ण देतात. फुलांत सु. २०.५% टॅनिन आम्ल असते. फुलांपासून लाल रंग मिळतो. रेशमी कपड्यांना रंग देण्यासाठी त्यांचा उपयोग करतात.