शहाजिरे (कॅरम नायग्रम) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे.

(ब्लॅक कॅरॅवे). भारतीय मसाल्यांतील एक महत्त्वाचा घटक. शहाजिरे ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरम नायग्रम आहे. कोथिंबीर, गाजर या वनस्पतीही एपिएसी कुलातीलच आहेत. शहाजिरे मूळची यूरोप, बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीर येथील असून समुद्रसपाटीपासून १,८००–३,३०० मी. उंचीच्या प्रदेशात वाढते. डोंगराळ भागात उतरणीवर ही वनस्पती वन्य स्थितीत दिसून येते; लागवडीतील जमिनीत ती तणासारखी वाढते. शहाजिऱ्याच्या कॅरम प्रजातीत एकूण २० जाती असून भारतात फक्त तीन जाती आढळतात. भारताखेरीज शहाजिऱ्याची लागवड डेन्मार्क, नेदर्लंड्‌स, पोलंड, लेबानन, रशिया व इथिओपिया या देशांत केली जाते. भारतात काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून १,८६०–२,७९० मी. उंचीपर्यंत, तसेच पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेश या राज्यांत तिची लागवड केली जाते.

शहाजिरे ही बहुवर्षायू वनस्पती सु. १५–१७ सेंमी. उंच वाढते. मुळे मांसल असतात. तिच्या फांद्या सरळ वाढतात. पाने दोनदा किंवा तीनदा पिसांसारखी विभागलेली असून टोकाला अरुंद व रेषेप्रमाणे असतात. फुले छत्रीसारख्या उच्छत्र फुलोऱ्यात येत असून ती पांढरी व लहान असतात. फळे शुष्क, लहान, पिवळसर तपकिरी असतात. या फळांनाच शहाजिरे म्हणतात. तडकल्यावर फळाचे दोन भाग होतात आणि ते भाग बारीक दांड्याला चिकटून लोंबतात. फळावर कंगोरे व खोबणी असतात. फळांचा वास सुसह्य असतो, चव उग्र असते.

शहाजिरे दीपक (भूक वाढविणारे), वायुनाशी (पोटातील वायुनाशक), सुगंधी, तिखट, उष्ण असून अजीर्ण, ज्वर, कफ, सूज इत्यादींवर गुणकारी असते. या वनस्पतीची पक्व व सुकलेली फळे मसाल्याचा एक पदार्थ म्हणून बाजारात मिळतात. कपड्यात शहाजिऱ्यांची लहान पुरचुंडी करून ठेवल्यास कपड्यांना कसर लागत नाही.