धावडा (ॲनोजिसस लॅटिफोलिया): वृक्ष

धावडा हा मध्यम आकाराचा व पानगळी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोजिसस लॅटिफोलिया आहे. हा वृक्ष मूळचा भारत, नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका येथील आहे. धावडा सु. ३० मी. उंच वाढतो. त्याचे खोड मऊ असून खोडावरील साल खपल्यांच्या रूपात गळून पडते. पाने साधी, दीर्घवृत्ताकार, टोकाला रुंद, देठाशी गोलाकार व रोमविहीन असतात. पाने मोठी झाल्यावर पानांची मध्यशीर फुगीर व गुलाबी रंगाची दिसते.

मध्यशिरेपासून ६–१० उपशिरांच्या जोड्या पानभर पसरतात. पानाच्या खालील बाजूने त्या स्पष्ट दिसतात. पाने थंडीत गळण्यापूर्वी लाल रंगाची होतात. फुले हिरवट पिवळी व लहान असून ती झुबक्यात दाटीदाटीने येतात. फळे लहान, अनेक व गोलाकार फुलोऱ्या पासून येतात. फळांचा रंग पिवळसर तपकिरी असून ती पंखयुक्त व चोचयुक्त असतात. त्यांमध्ये एकच बी असते. भारतात धावडा हा एक उपयुक्त वृक्ष मानला जातो. त्यापासून मोठ्या प्रमाणात गॅलोटॅनीन मिळते.

या पदार्थाची हायड्रोक्लोरिक किंवा सल्फ्युरिक आम्लाबरोबर क्रिया केली असता गॅलिक आम्ल मिळते. त्याचा वापर टॅनिंग उद्योगात केला जातो. तसेच भारतात जो खडे डिंक जमा केला जातो तो प्रामुख्याने याच वृक्षापासून मिळतो. हा डिंक कापड उद्योगात वापरतात. अँथेरिया नावाच्या रेशीम कीटकाच्या अळीला याच वृक्षाची पाने खाऊ घालतात. या अळीच्या कोशापासून टसर रेशीम मिळवितात.