(रेपटाइल). सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग. उत्तर तसेच दक्षिण असे दोन्ही ध्रुव वगळता, सरीसृप जगभर आढळतात. त्यांच्या सु. ६,५०० जाती असून भारतात त्यांच्या सु. ४२५ जाती आढळतात. ते मुख्यत: जमिनीवर राहतात. मात्र काहींना जमीन व पाणी या दोन्हींची आवश्यकता असते, तर काही मोजके वृक्षवासी आहेत.

शरीररचना : सरीसृप प्राण्यांचे शरीर डोके, मान, धड आणि शेपटी यांत विभागलेले असते. त्यांची त्वचा जाड, शुष्क, ग्रंथीविरहीत असून खरखरीत खवल्यांनी अथवा अस्थिपट्टिकांनी युक्त असते. यामुळे शरीराचे घर्षण न होता संरक्षण होते. बहुतेक सरीसृप चार पायांच्या साहाय्याने हालचाल करतात. लहान सरीसृप वेगाने हालचाल करतात, तर मोठे त्यांच्या लहान पायांमुळे मंद गतीने हालचाल करतात. जसे मगर आपले शरीर पायांवर जमिनीपासून थोडे वर उचलते व मध्यम गतीने हालचाल करते. सापांना पाय नसतात; त्यांच्या शरीराला इंग्लिश ‘एस (S)’ आकाराची अनेक वळणे असतात. ते खडक, जमीन अशा कठीण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकतात.

सरीसृप शाकाहारी अथवा मांसाहारी असून गवत, पाने, कीटक, मृदुकाय, मासे, बेडूक, पक्षी तसेच लहान सस्तन प्राणी खातात. पचनसंस्था विकसित असून अन्ननलिका आणि पचनसंस्था ग्रंथींनी युक्त असते. विषारी सापांमध्ये लाळ ग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. सरीसृप अनियततापी असतात; वातावरणातील तापमानात जसजसे चढउतार होतात, त्यानुसार एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांच्या शरीराच्या तापमानात बदल होतात. सर्व सरीसृप फुप्फुसाने श्वसन करतात. पाण्यात राहणारे कासव, मगर यांसारखे सरीसृप पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन शरीरात हवा घेतात. हृदयात दोन अलिंदे आणि पडद्याने अपुरे विभागलेले निलय असते. याशिवाय एक कोटर असते. मगरीमध्ये हृदय चार कप्प्यांचे असते. रक्तातील तांबड्या पेशी अंडाकृती, द्विबर्हिगोल असून त्यातील केंद्रक ठळक असते. उत्सर्जन संस्थेत दोन वृक्के असून त्यांचा आकार इंग्लिश ‘व्ही (V)’ सारखा असतो. जमिनीवर वावरणारे सरीसृप यूरिक आम्ल उत्सर्जित करतात, तर पाण्यात राहणारे अमोनिया उत्सर्जित करतात. जमिनीवरील सरीसृप अवस्कर छिद्रावाटे त्याज्य पदार्थ बाहेर टाकतात. त्याज्य पदार्थ स्थायूरूप असून त्यात पांढऱ्या रंगाचे यूरिक आम्ल व काळ्या रंगाची विष्ठा असते. त्याज्य पदार्थाला लेंडी म्हणतात. मेंदूमधील प्रमस्तिष्क मोठे असते, कर्पार चेतांच्या १२ जोड्या असतात. डोळे, घ्राणेंद्रिये आणि श्रवणेंद्रिय उभयचर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित असतात. प्रजनन संस्थेत नरामध्ये वृषणांची एक जोडी आणि मादीमध्ये अंडाशयाची एक जोडी असते. या प्राण्यांत आंतरफलन होते. मादी सामान्यपणे अंडी जमिनीवरच घालते. अंड्यांमध्ये पिवळा बलक (पीतक) जास्त प्रमाणात असतो. त्यावर गर्भाची वाढ होते. गर्भाभोवती उल्ब, भ्रूणवेष्ट, पीतककोश, अपरापोषिका अशा गर्भकला असतात. काही सरीसृप पिलांना जन्म देतात. डोळे दोन असून दृष्टी सामान्यपणे एकनेत्री असते. डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांची हालचाल होते. त्यांच्या पापणीच्या आकारात विविधता दिसून येते; कासवामध्ये पापणी गोल छिद्राप्रमाणे, तर मगरीमध्ये लहान फटीप्रमाणे असते. सापांना पापण्या नसतात. त्यांच्या डोळ्यांवर पारदर्शक खवला असतो. मगरीमध्ये निमेषक पटल असते. मगर, सरडा यांच्या अनेक जातींमध्ये श्रवणशक्ती विकसित झालेली असते. कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण असे तीन भाग असतात. बाह्यकर्ण शरीरापासून वेगळा दिसत नाही, तेथे एक छोटा खड्डा असून त्याच्या तळाशी मध्यकर्णातील कर्णपटल असते. गंधेंद्रिय दोन नासीय कप्प्यांच्या स्वरूपात असून त्यांच्याद्वारे गंधाचे ज्ञान होते. काही सरड्यांमध्ये तसेच सापांमध्ये गंधासाठी व चवीसाठी जॅकॉबसन इंद्रिय असते. साप त्याची जीभ सतत आतबाहेर काढत असतो आणि प्रत्येक वेळी या इंद्रियाला जिभेने स्पर्श करतो. अशा रीतीने जिभेला चिकटलेले रसायनांचे कण तो तोंडात घेतो. त्यामुळे या प्राण्यांना अन्न कोणत्या दिशेला आहे, हे कळते. या इंद्रियाचा उपयोग अन्न शोधणे, शत्रूची चाहूल घेणे आणि जोडीदार निवडणे यासाठी होतो. कासव आणि मगर यांना जॅकॉबसन इंद्रिय नसते. सरीसृप प्राण्यांमध्ये सांगाडा अस्थींनी तयार झालेला असून पाठीचा कणा लांब असतो. उरोस्थी व बरगड्या यांपासून छातीचा पिंजरा तयार होतो. त्यांच्या दोन्ही जबड्यात दात असून त्यांचा उपयोग अन्नाचे तुकडे करण्यासाठी होतो.

सरीसृप प्राण्यांमध्ये आकार, आकारमान आणि रंग यामध्ये विविधता आढळते. समुद्री मगर सु. ९.१५ मी. लांब असते. समुद्री कासव सु. २.७१ मी. लांब असून वजन सु. ६८० किग्रॅ. असते. मॉनिटर सरडा सु. ३.०५ मी. लांब असतो, तर दक्षिण अमेरिकेतील ॲनॅकाँडा सु. ९.१५ मी. लांब असतो.

सरीसृपांचे वर्गीकरण करताना त्यांची कवटी आणि दातांची रचना विचारात घेतली जाते. कवटीमध्ये डोळ्यांमागे शंखास्थी हाडे असून शंखास्थी भागात अथवा कानशिलांच्या भागात शंखक रिक्ती म्हणजे छिद्र असतात. या रिक्ती असणे व नसणे आणि त्यांची संख्या यावरून सरीसृप वर्गाचे पुढील प्रमाणे चार उपवर्ग केले आहेत.‍

उपवर्ग ॲनॅप्सिडा : या उपवर्गातील प्राण्यांच्या कवटीवर शंखक रिक्ती असते. या उपवर्गातील प्राणी काहीसे उभयचरांसारखे दिसतात. या उपवर्गात दोन गण आहेत;

(१) गण कॉटिलोसॉरिया : हे उभयचर प्राण्यांसारखे असून सध्या अस्तित्वात नाहीत. त्यांना सरीसृपांचे पूर्वज समजतात. उदा., सैमुरिया.

(२) गण किलोनिया : या गणातील प्राण्यांची हालचाल संथ असते म्हणून त्यांना कूर्म असेही म्हणतात. या गणामध्ये काही विलुप्त झालेल्या तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये धडाच्या पृष्ठभागावर कठीण कवच असून अधर भागाकडील हाडे एकमेकांना घट्ट जोडली जाऊन पेटी तयार होते. या प्राण्यांना दात नसतात. ते अंडज आहेत. उदा., सागरी कासव, गोड्या पाण्यातील कासव, जमिनीवरील कासव.

उपवर्ग पॅरॅप्सिडा : या उपवर्गातील प्राण्यांच्या कवटीवर एक शंखक रिक्ती असते. हे प्राणी सध्या अस्तित्वात नाहीत. उदा., आर्कीओस्केलीस, प्लिओसॉरस, इक्थिओसॉरस.

उपवर्ग डायॉप्सिडा : या उपवर्गातील प्राण्यांच्या कवटीवर एक शंखक रिक्ती असते. या उपवर्गातील चार गण विलुप्त झालेले आहेत, तर अस्तित्वात असलेले प्राणी तीन गणांमध्ये विभागलेले आहेत:

(१) गण ऱ्हिंकोसेफॅलिया : या गणातील सरीसृपांची मान आखूड असते. पायांच्या दोन जोड्या असून मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा थोडे जास्त लांब असतात. पाय दुर्बल असतात. शंखक रिक्ती मोठ्या असतात. उदा., स्फेनोडॉन.

(२) गण स्क्वॅमेटा : या गणातील प्राण्यांची शेपटी लांब असते. साप वगळता, पायांच्या दोन जोड्या असतात आणि प्रत्येक पायाला पाच बोटे असतात. या गणात दोन उपगण आहेत. (अ) उपगण लॅसर्टीलिया : या प्राण्यांचे शरीर लांबट असून पायांच्या दोन जोड्या असतात. डोळ्यांच्या पापण्या हालचाल करणाऱ्या असतात. उदा., घोरपड, पाल, सरडगुहिरा, सरडा. (आ) उपगण ऑफीडिया : या प्राण्यांचा जबडा मोठा असतो. डोळ्यांवर निमेषक पटल नसते. जीभ लांब असून दोन भागांत विभागलेली असते. उदा., अजगर, ॲनॅकाँडा, गवत्या साप, घोणस, दिवड, धामण, नाग, नागराज, नानेटी, फुरसे, मण्यार, मांडूळ, सागर सर्प, सापसुरळी, हरणटोळ इ.

सरीसृप वर्ग : (१) गोड्या पाण्यातील कासव, (२) स्फेनोडॉन, (३) हरणटोळ.

(३) गण क्रोकोडिलिया : या गणातील प्राणी पाण्यात राहतात आणि आकारमानाने मोठे असतात. शरीरावर खवले व अस्थिपट्ट असतात. देहगुहेत मध्यपटल असते. पायांच्या दोन जोड्या असतात. हृदय चार कप्प्यांचे असते. हे प्राणी जमिनीवर अंडी घालतात. उदा., मगर.

डायॉप्सिडा उपवर्गातील विलुप्त झालेल्या सरड्यांना ‘डायनोसॉर’ म्हणतात. सर्व डायनोसॉरांचा समावेश आर्कोसॉरिया (पुरासरडे) या महागणात केला जातो.

उपवर्ग सिनॅप्सिडा : या प्राण्यांच्या कवटीवर एक शंखक रिक्ती असते. दात कृंतक, सुळे, उपदाढा आणि दाढा असे चार प्रकारांचे असतात. हे सस्तन प्राण्यांसारखे दिसतात. त्यामुळे त्यातील काही प्राण्यांना सरीसृप व सस्तन प्राणी यांच्यातील दुवा मानतात. उदा., डायमेट्रॉडॉन, बिक्यानोडॉन, इस्ट्रॉडॉन, ट्रिटिटोडॉन.

अनेक सरीसृप मानवाला उपयुक्त आहेत. काही अन्न म्हणून वापरले जातात. काही शेतातील उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवतात. त्यांच्या त्वचेपासून शोभेच्या वस्तू तयार करतात. त्यांच्या त्वचेला मोठी मागणी असल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.