नागरमोथा हे एकदलिकित क्षुप सायपरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सायपरस स्कॅरिओसस आहे. भारतात मध्य प्रदेशातील वनांत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.
पाणथळ जागेत नागरमोथ्याचे झुडूप २–३ मी. उंच वाढते. खोड हिरवे, त्रिकोणी व मऊ असून पाने वरच्या टोकाला मंडलात येतात. पाने १०–१५ सेंमी. लांब व १ सेंमी. रुंद असून त्यांच्या बगलेत फुलोरे येतात. फुलोऱ्यांत अनेक लहान फुले असतात. फुलांची रचना एकदलिकित गवताच्या फुलांसारखी असते. फळ एकबीजी असते.
नागरमोथ्याच्या मुळांना बाजारात चांगली किंमत मिळते. ही मुळे सुगंधी असून त्यांचा उपयोग अत्तरांमध्ये, अरोमा उपचार पद्धतीत आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. नागरमोथ्याच्या खोडापासून तेल मिळवितात. या तेलात सायपरिन हा मुख्य घटक असतो. हे तेल दुखणाऱ्या भागावर लावल्यास वेदना कमी होतात. पाने वेदनाशामक आहेत.