कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा (कलापंखी) गणाच्या झायलोकोपिडी (काष्ठनिवासी) कुलात भुंग्यांचा समावेश होतो. त्यांना भ्रमर व सुतारी भुंगा असेही म्हणतात. ते जगात सर्वत्र आढळत असून त्यांच्या सु. ५०० जाती आहेत. भारतात त्यांच्या १८ जाती आढळतात. त्यांपैकी एका जातीचे शास्त्रीय नाव झायलोकोपा फेनिस्ट्रेटा आहे. पल्लेदार उड्डाण आणि पंखांचा भीतिदायक आवाज ही भुंग्यांची वैशिष्ट्ये आहेत.

भुंगा (झायलोकोपा फेनिस्ट्रेटा)

भुंग्यांचा रंग चमकदार काळा असून शरीराची लांबी सु. २० मिमी. असते. डोके, वक्ष व उदर असे त्याच्या शरीराचे तीन भाग पडतात. शरीर दणकट असून त्याची ठेवण इतर कीटकांच्या तुलनेत मोठी असते. शरीरावर बारीक खळगे व डोक्यावर शृंगिका असतात. नराच्या शृंगिका १३ खंडांच्या, तर मादीच्या १२ खंडांच्या असतात. सर्व शरीरावर लव असते. नराच्या शरीरावर पिवळी लव असते. मादीमध्ये वक्षावरील लव पिवळी असते व इतर अवयवांवरील लव काळी असते. मुखांगात सोंड (जीभ) व जबडे असतात. नराला जबड्याच्या टोकावर दोन दात असतात, तर मादीला दोन दात व वरच्या कडेवरही दोन दात असतात. जबड्यांनी भुंगे लाकूड पोखरतात. वक्षावर पंखांच्या दोन जोड्या व पायांच्या तीन जोड्या असतात. पायाच्या चवथ्या खंडावर टोकाला नराला एक काटा, तर मादीला दोन काटे असतात. पंखांच्या दोन्ही जोड्या रुंद, पातळ व पारदर्शक असतात. पंखांचे रंग वेगवेगळे असून ते झगमगणारे असतात. मादीला नांगी असून ती डंख मारते. मादी सहसा उपद्रव देत नाही. मात्र तिला हातात पकडले किंवा त्रास दिला तरच ती डंख मारते. त्यामुळे माणसाच्या शरीराची आग होते व गांधी उठतात. नर भुंगा डंख मारत नाही.

भुंगे एकेकटे राहत असून ते सतत पंखांचा भुणभुण आवाज करतात. त्यांची घरटी जवळजवळ असतात. काही जातींमध्ये मादी आणि तिच्यापासून जन्मलेल्या माद्या समूहाने राहतात. अशा ठिकाणी श्रमाची विभागणी झालेली असते. एखादी मादी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडते, तेव्हा दुसरी मादी घराचे रक्षण करते.

भुंगे त्यांच्या जिभेने परागकण व मकरंद गोळा करतात आणि फुलांच्या परागणास मदत करतात. कमळ, बाहवा, तुळस, रानतुळस व रुई या वनस्पतींच्या फुलांवर भुंगे जास्त आढळतात. ते जुन्या लाकडी इमारतीमधील तुळया, बांबू, कपाट, टेबल व खुर्च्या यांसारख्या वस्तूंमध्ये लाकडात बोगदा खोदल्याप्रमाणे घरटी तयार करतात. ही घरटी सु. ३० सेंमी. किंवा त्यापेक्षा लांब असतात. प्रत्येक घरट्याला एकच प्रवेशद्वार असून आत अनेक कप्पे असतात. प्रवेशद्वार वर्तुळाकार असून त्याचा व्यास १६ मिमी. असतो. घरट्याच्या कप्प्यांमध्ये मकरंदमिश्रित परागकणांचा साठा असतो आणि प्रत्येक कप्प्यात एक अंडे असते. भुंग्यांमध्ये पूर्ण रूपांतरण दिसून येते. अंडे, अळी, कोश आणि प्रौढ भुंगा असे त्यांच्या वाढीचे चार टप्पे असतात.

मादीला आकर्षित करण्याच्या भुंग्यांच्या दोन पद्धती दिसतात. काही नर भुंगे हवेत उडताना मादीच्या शोधात भटकतात, तिच्याभोवती घिरट्या घालतात आणि तिला वश करतात. काही भुंग्यांच्या शरीरात विशेष ग्रंथी असतात. हे भुंगे जेव्हा हवेत उडतात तेव्हा त्या ग्रंथीपासून कामगंध (फेरोमोन) स्रवला जातो. कामगंधामुळे एका जातीतील मादीला आपल्याच जातीच्या नराचे अस्तित्व समजते आणि ती नराकडे आकर्षित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा