उभयचर वर्गाच्या युरोडेला (कॉर्डेटा) गणातील सरड्यासारखे दिसणारे प्राणी. युरोडेला गणाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणातील प्राण्यांना डिंभ आणि प्रौढ दोन्ही अवस्थेत शेपटी असते. जगात सॅलॅमँडरांच्या सु. ३८० प्रजाती आढळतात. बहुतकरून ते उत्तर गोलार्धात दिसून येतात. ते मुख्यत: अमेरिका, मेक्सिको या देशांत तसेच जपान, तैवान या देशांतील काही बेटांवर आढळतात. त्यांच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव सॅलॅमँडर सॅलॉमँड्रा आहे.

सॅलॅमँडर (सॅलॅमँडर सॅलॉमँड्रा)

सॅलॅमॅंडरच्या शरीराची लांबी काही सेंमी. ते १.२ मी.पर्यंत असते. शरीराचे डोके, धड, शेपटी असे भाग असतात; मान नसते. त्वचा गुळगुळीत व ओलसर असते. श्वसनक्रिया त्वचा आणि फुप्फुस यांद्वारे होते. जलीय डिंभात श्वसनासाठी बाह्य क्लोम (गिल) असतात. प्रौढांमध्ये श्वसनासाठी डोक्यावर अग्र बाजूस दोन बाह्य नासाद्वारे असतात आणि ती ग्रसनीमधून फुप्फुसांना जोडलेली असतात. काही सॅलॅमॅंडरच्या त्वचाग्रंथीतून विष स्रवते. पायांच्या दोन जोड्या असून पुढचे व मागचे पाय सारखेच लांब असतात. पुढच्या पायाला चार बोटे, तर मागच्या पायाला पाच बोटे असतात. शेपटी लांब असते. तिचा उपयोग पोहण्यासाठी होतो. त्यांना बेडकांप्रमाणे मध्यकर्ण, यूस्टेशियन नलिका आणि कानाचा पडदा नसतो. कानाच्या ठिकाणी असलेल्या त्वचेपासून आंतरकर्णापर्यंत दोन अस्थिद्वारे हवेतील ध्वनिलहरी वाहून नेल्या जातात. त्याद्वारे त्यांना आवाज ऐकू येतो. त्यांची घ्राणेंद्रिये तीव्र असतात. त्यांद्वारे ते अधिवासाची सीमा, भक्षक तसेच प्रणयासाठी जोडीदार ओळखतात. बहुतेक सॅलॅमँडरांचे डोळे रात्रीच्या काळोखात पाहण्यासाठी अनुकूलित झालेले असतात. त्यांच्या उभयचर जातींतील प्राण्यांना हवेत जवळचे स्पष्ट, तर पाण्यात दूरचे स्पष्ट दिसते.

सॅलॅमँडर (अँबीस्टोमा मॅक्सिकॅनम)

सॅलॅमँडर लाजाळू व निरुपद्रवी असतात. ते थंड, काळोख्या व दमट भागात राहतात. थंड हवामानात जमिनीखाली तसेच डबक्याच्या तळाशी ते निपचित पडून राहतात. पर्वतीय प्रदेशात ते वर्षभर सक्रिय असतात. ते अधिक काळ जमिनीवर वावरतात, तर प्रजननकाळात पाण्यात वावरतात. सॅलॅमॅंडरचे अन्न मुख्यत: बेडकाचे डिंभ, कीटकांच्या अळ्या, गोगलगायी आणि लहान मासे हे असते. बहुतेक सॅलॅमॅंडर डिंभावस्थेतून प्रौढ होण्यापूर्वी प्रजननक्षम होतात. या आविष्काराला ‘चिरडिंभकता’ (निओटेनी) म्हणतात. अशा डिंभांना बाह्य क्लोम असतात. बाह्य क्लोम नाहीसे होऊन प्रौढ सॅलॅमॅंडरमध्ये रूपांतर होण्यापूर्वी ते अंडी घालू लागतात किंवा शुक्रपेशी निर्मितीला प्रारंभ करतात. नवजात पिलू बेडकासारखे दिसते. सॅलॅमँडराची नर आणि मादी सारखेच दिसतात. गंध व स्पर्श यांद्वारे नर-मादी एकमेकांना ओळखतात किंवा निवड करतात. त्यांच्या सु. ९०% जातींमध्ये अंत:फलन घडून येते. यात नर शुक्रपेशीधर (शुक्रपेशींनी भरलेली पिशवी) जमिनीवर किंवा पाण्यात सोडतो, मादी ते तिच्या अवस्करात साठवून घेते आणि गरजेनुसार अंडपेशींचे फलन घडवून आणते. त्यांच्या आदिम जातींमध्ये बेडकाप्रमाणे बाह्यफलन होते. यात नर मादीने घातलेल्या अंडपेशींच्या पुंजक्यावर शुक्रपेशी विसर्जित करतो व त्यांचे फलन घडवून आणतो. अँबीस्टोमा मॅक्सिकॅनम नावाच्या सॅलॅमॅंडरच्या जातीत डिंभावस्थेत अवटू (थायरॉइड) संप्रेरकाचा अभाव असल्यास तात्पुरती चिरडिंभकता निर्माण होते. असे डिंभ पुरेसे आयोडीन असलेल्या पाण्यात स्थलांतरित केल्यास त्यांचे रूपांतर प्रौढ सॅलॅमॅंडरमध्ये होते.

हिमालयीन न्यूट (टायलोकट्रायटॉन व्हेरूकोसस)

सॅलॅमँडरांचा आयु:काल सु. २० वर्षे असतो. काही सॅलॅमँडर ५० वर्षे जगल्याची उदाहरणे आहेत. सॅलॅमॅंडरांमध्ये शेपटी, जबडा आणि दृष्टिपटल तुटल्यास त्यांचे पुनरुद्‌भवन होते. भारतात सॅलॅमँडर आढळत नाही. पण त्याच्यासारखा दिसणारा न्यूट हा प्राणी सिक्किम, मणिपूर या राज्यांत आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव टायलोकट्रायटॉन व्हेरूकोसस आहे. त्याला हिमालयीन न्यूट म्हणतात.