नाक हे माणसाच्या चेहऱ्या वर मध्यभागी असलेले एक इंद्रिय आहे. गंधज्ञानासाठी आणि श्वासोच्छ्वासासाठी नाक उपयोगी असते. शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी नाक एक इंद्रिय असून श्वसनसंस्थेतील एक भाग आहे. प्राणिसृष्टीत नाक ही संज्ञा खऱ्या अर्थाने स्तनी वर्गाच्या नर-वानर गणातील प्राण्यांसाठी वापरली जाते. नाकाद्वारे हवा श्वसनमार्गातून फुफ्फुसांमध्ये आत शिरते, तसेच बाहेर टाकली जाते. नाकामुळे गंधाची व स्वादाची जाणीव होते. आवाजाच्या अनुस्पंदनात नाकाचा वापर होतो.
शरीररचनाशास्त्राच्या दृष्टीने नाकाचे दोन भाग पडतात: (१) बाह्य नाक आणि (२) अंतर्गत नाक (नासागुहा). हे दोन्ही भाग एकमेकांशी सलग असतात. बाह्य नाक अस्थी आणि कास्थी या दोन्हींनी मिळून बनलेले असते. अस्थींचा भाग प्रामुख्याने प्रत्येक बाजूस नासास्थी व वरच्य जबड्याच्या हाडाचा ललाटीय प्रवर्ध यांनी मिळून बनतो. कास्थिमय भाग अनेक मोठ्या आणि छोट्या कास्थींनी बनलेला असतो. या कास्थींमुळे नाकाला आकार येतो. या कास्थींना काही स्नायू जोडलेले असतात. त्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे नाकपुड्या विस्फारता येतात. नासागुहा ही नासापटल नावाच्या पडद्याने उभी विभागलेली असून त्यामुळे नासागुहेचे उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी असे भाग पडतात. संपूर्ण नाक दोन अग्रनासांद्वारे बाह्य वातावरणात उघडलेले असते. ही अग्रनासाद्वारे नाकपुड्यांच्या टोकाला असतात. नाकपुड्या मागील बाजूस दोन पश्चनासांद्वारे नासाग्रसनीत उघडतात. नासाग्रसनी हा श्वसनसंस्थेचा भाग आहे प्रत्येक नाकपुडी ५–७ सेंमी. उंच असून नाकपुडीचे ऊर्ध्व, निम्न, अभिमध्य आणि बाजूच्या दान भिंती असे भाग असतात.
नासापटल हा अस्थी आणि कास्थींचा पडदा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना श्लेष्मकलेचे अस्तर असते. हा क्वचित मध्यभागी असून बहुतांशी वेळेला उजव्या किंवा डाव्या बाजूला झुकलेला असतो. नाकाच्या बाजूच्या दोन्ही भिंती अनियमित असतात. कारण प्रत्येक नाकपुडीत तीन नासा शंखास्थी असतात. त्यांची रचना एकावर एक असलेल्या कप्प्यांप्रमाणे असते. नाकपुड्यांना नासामार्ग असेही म्हणतात. नासामार्ग प्रथम कठीण तालू व नंतर मृदू तालूमुळे अन्नमार्गापासून वेगळा झालेला असतो. नासामार्गाचे सुरुवातीचा भाग प्रघाण, मधला श्वासोच्छ्वासासाठी उपयोगी पडणारा भाग आणि आतील गंधग्राही भाग असे तीन भाग पडतात.
प्रघाणामध्ये बाह्यत्वचेचे अस्तर असून तेथे केस असतात. तेथे त्वचाग्रंथींचे स्रावही सोडले जातात. त्यामुळे श्वास घेताना हवेतील धूलिकण, तंतू इ. सुरुवातीला रोखले जाऊन हवा स्वच्छ होऊन व गाळून आत जाते. मधल्या श्वासोच्छ्वासासाठी उपयोगी पडणाऱ्या भागावर वाहिनीवंत श्लेष्मकलेचे अस्तर असते. गाळलेली हवा येथे ओलसर व गरम करून फुप्फुसांकडे पाठविली जाते. नासामार्गाचा तिसरा भाग गंधवाही असतो. तो वरच्या मागील बाजूस असतो. त्यावर गंध उपकलेचे अस्तर असते. यात गंधग्राही पेशी असतात. हवेत मुक्त झालेल्या वायू अवस्थेतील गंधरेणूंमुळे या ग्राही पेशी उत्तेजित होतात. या ग्राही पेशी गंधाद्वारे निर्माण झालेले आवेग गंधचेतांमार्फत मेंदूच्या गंधपाली (मेंदूचा असा भाग जेथे वासाची जाणीव होते) भागाकडे जातात. त्यामुळे गंधाची जाणीव होते. नासापटलाच्या खालच्या पुढील बाजूस रक्तवाहिन्यांचे आधारहीन जाळे असते. या ठिकाणी बऱ्याच वेळा पटकन रक्तस्राव होतो. नाकाच्या आजूबाजूच्या अस्थींमध्ये असणाऱ्या पोकळ्यांना नासाकोटरे म्हणतात.
नाकासंबंधी सर्दी (पडसे) हा विकार होतो. जेव्हा सर्दी होते तेव्हा नासामार्गातील श्लेष्मल पटलाचा दाह होतो, ग्राही पेशी उत्तेजित होत नाहीत आणि आवेग गंधपालीपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी गंधाची जाणीव होत नाही. परिणामी सर्दीमुळे श्वासनलिकादाह व न्यूमोनिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय घोणा अथवा घोळणा फुटून रक्त येणे, हा विकार उद्भवतो. लहान मुलांच्या नाकात काही वेळा खडे, कागदाचे तुकडे इ. वस्तू अडकतात. अशा वस्तू अधिक वेळ राहिल्यास नाक दुखते आणि एकाच नाकपुडीतून पूयुक्त स्राव बाहेर पडतो. काही वेळा नासापटल एका बाजूस झुकते. अशा विकृती शस्त्रक्रियेने बऱ्या करतात. नासाकोटरांमधील श्लेष्म पटलांच्या दाहयुक्त सुजेला नासाकोटरशोथ म्हणतात. विषाणूंचे संक्रामण, अधिहर्षता इ. कारणांमुळे हा विकार उद्भवतो. नासाकोटरे निरोगी राहण्यासाठी रोमल पेशींच्या केसांची हालचाल आणि कोटरांची छिद्रे बंद न पडणे आवश्यक असते. मानवाच्या नाकाच्या आकारांत विविधता आढळून येते. ही विविधता विशिष्ट वंशांची लक्षणे म्हणून ओळखली जातात. कॉकेसॉइड वंशात नाक सामान्यत: सरळ, अरुंद व टोकदार, पुढे आलेले असते. नीग्रॉइड वंशात ते रुंद, बसकट व पसरट असते. माँगोलॉइड वंशात नासासेतू सखल व नाकपुड्या मध्यम स्वरूपाच्या पसरट असतात. ऑस्ट्रेलियन वंशात नाक रुंद असते तरी बसकट व पसरट नसते.
काही प्राण्यांतील वैशिष्ट्ये :
पक्ष्यांमध्ये नाकाचा उपयोग गंधज्ञान आणि श्वसनासाठी होत असला तरी पक्ष्यांमध्ये दृष्टी तीक्ष्ण असल्याने गंधज्ञानास फारसे महत्त्व नसते. सरीसृप आणि उभयचर प्राण्यांत नाकाचा उपयोग गंधज्ञान आणि श्वसनासाठी होतो. कास्थिमत्स्य आणि अस्थिमत्स्य या माशामध्ये नाकाचा उपयोग गंधज्ञानासाठी होतो मात्र श्वसनात होत नाही. सायक्लोस्टोमाटा या पृष्ठवंशी प्राण्यांत जंभहीन प्राण्यांचा समावेश होतो. त्यांचे लँप्री आणि हॅगफिश हे दोन प्रकार आहेत. यांपैकी लँप्रीमध्ये डोक्यावर मध्यभागी एक नासाद्वार असून ते ग्रसनीशी जुळलेले नसते. त्यामुळे त्याचा उपयोग केवळ गंधज्ञानापुरता होतो. हॅगफिशमध्ये नासाद्वार मुस्कटाच्या टोकाला असते. ते ग्रसनीशी जोडलेले असल्याने त्याचा उपयोग गंधज्ञान आणि श्वसन यांसाठी होतो. अपृष्ठवंशी प्राण्यांत नाक हा वेगळा अवयव नसतो.
अनेक सस्तन प्राण्यांमध्ये नाकपुड्यांभोवती उघडा, ओलसर भाग असतो. या भागाला नासाप्रदेश म्हणतात. या भागाच्या मध्यावर एक उभी खाच असून ती तोंडाला मिळालेली असते. नासाप्रदेश हा घ्राणसंस्थेचा भाग आहे. ज्या सस्तन प्राण्यांमध्ये नासाप्रदेश असतो त्या प्राण्यांना गंधाचे ज्ञान चांगले असते. असे प्राणी नासाप्रदेशामार्फत वाऱ्या ची दिशा ठरवू शकतात. त्यांच्या त्वचेत शीत ग्राही (कोल्ड रिसेप्टर, विशेष प्रकारच्या चेता) असतात. बाष्पनशील पदार्थांच्या सान्निध्यात या शीत ग्राही अधिक संवेदनशील होऊन कार्य करतात. बाष्पनशील पदार्थ हवेत मिसळतात आणि वाऱ्या च्या झोताने नाकापर्यंत येतात. नासाप्रदेशाच्या कुठच्या भागातील शीत ग्राही उद्दीपित झाल्या आहेत त्यावरून त्या वासाची दिशा ओळखली जाते. कुत्र्याचे नाक चांगलेच संवेदनाशील असते. कुत्र्याच्या मेंदूतील गंधपाली ही मनुष्याच्या गंधपालीच्या तुलनेत ४० पट मोठी असते. शिवाय त्याच्या नाकातून वाहणाऱ्या नि:स्रावाद्वारे (शरीरातून बाहेर पडणारा स्राव) कुत्रा आजूबाजूच्या हवेतील स्वाद व वास शोषून घेतो. परिणामी एखाद्या गुन्हेगाराने वापरलेल्या वस्तूचा जेथपर्यंत वास येत राहतो, तेथपर्यंत कुत्रा गुन्हेगाराचा माग काढू शकतो. कुत्र्यांच्या काही जाती (उदा., ब्लडहाउंड) या त्यांच्या गंध ओळखण्याच्या तीक्ष्ण क्षमतेसाठी निपजल्या गेल्या आहेत.
वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये पारिस्थितिकीय सुस्थानानुसार (इकॉलॉजिकल नीश) त्यांच्या नासाप्रदेशात अनुकू लन घडून आलेले असते. उदा., जलचर सस्तन प्राण्यांमध्ये, नाकपुडीला जोडून असलेली पाली अशी विकसित झालेली असते त्यामुळे पाण्यात शिरताना त्या प्राण्यांचे नाक बंद राहते. अन्नाच्या शोधात जे सस्तन प्राणी जमीन धुंडाळत फिरतात (उदा., डुक्कर) त्यांच्या नासाप्रदेशाचे कठीण भागात रूपांतर झालेले असते. वॉलरसांमध्ये नासाप्रदेश दाठ व आखूड केसांनी संरक्षित असतो. त्यामुळे अन्नासाठी शेलफिश शोधताना त्याचे संरक्षण होते. उंटाची अग्रनासाद्वारे मांसल झडपांनी मिटू शकतात. तापीर व हत्ती या प्राण्यांत नाक लांबट होऊन त्याचे सोंडेत रूपांतर झालेले असते. हत्तीची सोंड फारच लांब असून ती नाक व वरचा ओठ यांपासून बनलेली असते. हत्तीची सोंड स्पर्शज्ञानाच्या इंद्रियाचे काम करते. अनेक प्राण्यांमध्ये नासाप्रदेशाचे स्वरूप आणि कारण यांबाबत स्पष्ट माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.