लाख कीटकांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील हेमिप्टेरा गणाच्या केरिडी कुलात होतो. त्यांच्या स्रावापासून लाख हा पदार्थ मिळतो. याच कुलातील केरिया लॅक्का ही जाती लाखेसाठी मोठ्या प्रमाणावर संवर्धित केली जाते. भारत, थायलंड व म्यानमार या देशांत लाख कीटक आढळतात. भारतात त्यांच्या १४ जाती आढळतात. ते काही द्विदलिकित वनस्पतींवर वाढतात. भारतात पळस, बोर, वड, पिंपळ, खैर, बाभूळ, कुसुम, आंबा, साल, शिसव, अंजीर, रिठा अशा सु. १०० वनस्पतींवर लाखेचे कीटक दिसून येतात.

लाख कीटक (केरिया लॅक्का)

इतर कीटकांप्रमाणे लाख कीटकाच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. नर आणि मादी कीटकांचे बाह्यस्वरूप भिन्न असते. नर रंगाने तांबडा असून त्याची लांबी १·२–१·५ मिमी. असते. त्याच्या डोक्यावर दोन स्पृशा, दोन डोळे आणि मुखांगे असतात. काही नरांना पंख असतात, तर काहींना नसतात. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असून तिची लांबी ४-५ मिमी. असते. मादीच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे भाग स्पष्टपणे दिसत नाहीत. तिचे शरीर फुगीर, नासपती फळासारखे अथवा गोलसर पिशवीसारखे असते. शरीर राळेसारख्या पदार्थाने वेढलेले असते. स्पृशा आणि पाय अल्पविकसित असतात. नर व मादी यांची मुखांगे खुपसणे आणि शोषणे या प्रकाराची असून त्यांचे सोंडेत रूपांतर झालेले असते.

लाख कीटकाच्या जीवनचक्रात अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था असून त्यांच्यात पूर्ण रूपांतरण घडून येते. मीलनानंतर मादी लाखेपासून तयार केलेल्या कप्प्यात २००–१,००० अंडी घालते. अंड्यातून सहा आठवड्यांनंतर डिंभ बाहेर पडतो. डिंभानंतर कोश तयार होतो. कोशावस्थेतून कीटक बाहेर येऊन तीन वेळा कात टाकतो आणि त्यानंतर प्रौढ लाख कीटक तयार होतो.

लाख कीटक आश्रयी वनस्पतींवर समूहाने राहतात. त्यांचे डिंभ आणि प्रौढ यांना मुखांगे असतात. मुखांगे सोंडेसारखी असून ती वनस्पतींच्या डहाळ्या आणि कोंब यांच्यात घुसविली जाऊन वनस्पतींचा रस शोषून घेतात. डिंभ आणि प्रौढ कीटक यांच्या शरीरावर अनेक ग्रंथी असतात. त्या ग्रंथींमधून चिकट स्राव बाहेर टाकला जातो. तो स्राव घट्ट होतो व त्यालाच लाख म्हणतात. मादी कीटकांपासून जास्त लाख स्रवली जाते. त्या लाखेतच अंडी, डिंभ, कोश आणि प्रौढ या अवस्था पूर्ण होतात. लाखेच्या कप्प्यांमुळे कीटकांचे संरक्षण होते. लाख हे कीटकांचे अन्न नाही.

फांदीवर लाख कीटकाने स्रवलेली लाख

लाख कीटक आश्रयी वनस्पतींवर हजारो ते लाखांच्या संख्येने आढळतात. लाख स्रवल्यानंतर घट्ट होते. वनस्पतीच्या ज्या डहाळ्या व फांद्या यांवर लाख असते त्या सर्व तोडून काढतात आणि त्यांवरील लाख खरवडून काढली जाते. लाखेच्या अशा भुकटीवर काही प्रक्रिया करून लाख कांड्या तयार करतात.

लाखेचे अनेक उपयोग आहेत. सोन्याचे पोकळ मणी भरण्यासाठी भरणद्रव्य म्हणून लाख वापरतात. हातातील कडे, बाजूबंद, माळ व मंगळसूत्र असे अलंकार करताना लाख वापरतात. लाकडातील चिरा व भेगा भरण्यासाठीही लाख वापरतात. पॉलिश, रंग व रोगण यांत लाख एक घटक असतो. शोभेची दारू तयार करताना लाख वापरतात. लखोटे व गोपनीय कागदपत्रे लाखेने मुद्रांकित करतात. लाख व त्यापासून मिळणारे लाल रंजकद्रव्य फार पुरातन काळापासून भारतातील लोकांना माहीत असून तिचा उपयोग कलेमध्ये तसेच वास्तुनिर्मितीमध्ये केला जातो. योग्य आश्रयी वनस्पतींवर लाख कीटकांचे संवर्धन व संगोपन करून लाख मिळविणे हा शेतीला पूरक असा व्यवसाय देशातील अनेक राज्यांत चालू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा