नागवेली ही वनस्पती पायपरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपर बिटल आहे. तिला पानवेल, विड्याची पाने किंवा खाण्याची पाने असेही म्हणतात. मिरी ही वनस्पतीही याच कुलातील आहे. नागवेली वनस्पती भारत, बांगला देश, नेपाळ व श्रीलंका या देशांतील असावी. आशियात तिची पाने मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात. भारतासह आशिया खंडातील काही देशांत तिची लागवड केली जाते. उष्ण व ओलसर हवामानात ही वेल चांगली फोफावते.

नागवेली (पायपर बिटल): पाने

नागवेली ही सदाहरित व बहुवर्षायू वेल असून ती आधाराने वर (३०–४५ मी.) चढते किंवा जमिनीवर पसरते. वेलीचे खोड दुबळे असून त्याला कांडे असेही म्हणतात. कांडे आलटून पालटून डावीकडे व उजवीकडे कलत नागमोडी आकारात वर चढते. म्हणून कदाचित या वेलीला नागवेली हे नाव पडले असावे. या वेलीला पेरापासून आगंतुक मुळे फुटतात आणि त्यांच्या साहाय्याने ती वर चढते. या पेरापासूनच पानेही निघतात. पाने साधी, एकाआड एक, ५–२० सेंमी. लांब व हृदयाकृती असून पानात ३–५ मुख्य शिरा असतात. पाने हिरवी, चकचकीत व टोकदार असतात. नर-फुले व मादी-फुले लहान असून ती वेगवेगळ्या वेलींवर लोंबत्या कणिश फुलोऱ्यावर येतात. फुलांना देठ व पाकळ्या नसतात. फळ लहान व गोल असते. त्यात एकच बी असते. पानांचा मुख्य उपयोग खाण्याकरिता होत असल्याने त्यासाठी बऱ्याचदा नर वेलीची लागवड केली जाते.

आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा आणि केरळ या राज्यांत नागवेलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याखालोखाल महाराष्ट्र, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांचा क्रम लागतो. नागवेलीच्या उत्पन्नातून देशभरात वर्षाकाठी सु. ९०० कोटी रुपयांची उलाढाल होते.

पाने सुगंधी, तिखट, तुरट व उत्तेजक असून ती वात, कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात. श्वासनलिकादाह आणि हत्तीरोग यांत ती गुणकारी असतात. पानांचा रस आम्लीयता कमी करण्यासाठी देतात. नागवेलीचे पान बहुधा चुना, कात, सुपारी आणि तंबाखू यांचे मिश्रण करून खाल्ले जाते. तंबाखू आणि सुपारी दोन्ही कर्करोगजन्य असल्यामुळे नागवेली पानांच्या अधिक सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून नागवेलीचे पान अधिक खाणे हानिकारक आहे.