नाणा (लॅगर्स्टोमिया मायक्रोकार्पा): पाने व फळे

नाणा हा वृक्ष लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगर्स्टोमिया मायक्रोकार्पा आहे. लॅगर्स्टोमिया लँसेओलॅटा अशा शास्त्रीय नावानेही हा ओळखला जातो. तामण व मेंदी या वनस्पती याच कुलातील आहेत. भारतात मुख्यत: महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत हा मोठ्या संख्येने आढळतो. महाराष्ट्रात विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र येथील पानझडी आणि निमसदाहरित वनांमध्ये हा सर्वत्र आढळतो.

नाणा हा मोठ्या आकाराचा पानझडी वृक्ष सु. २० मी. पर्यंत उंच वाढत असून याच्या बुंध्याचा परिघ ७०–८० सेंमी. असतो. साल पांढरट व राखाडी रंगाची असून लांबट पापुद्र्यांनी गळून पडते. पाने साधी, समोरासमोर, ६–१० सेंमी. लांब असून लंबगोलाकृती, निमुळती टोकदार असतात. पानांची वरची बाजू हिरवीगार तर खालची बाजू पांढरट असते. हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होते. फुलोरे मोठे असून फांद्यांच्या अग्रभागी येतात. फुले पांढरी असून गळून पडण्यापूर्वी ती पिवळसर होतात. फळे लांबट प्रकारची असून वाळल्यावर तपकिरी होऊन उकलतात. बिया ५–६ मिमी. लांबीच्या पंखयुक्त, अनेक व चपट्या असतात. यांचा प्रसार वाऱ्यामार्फत होतो.

नाणा हा साग वृक्षाप्रमाणे प्रसिद्ध आहे. याचे लाकूड गडद तपकिरी किंवा लालसर तपकिरी रंगाचे असते. ते कठीण, टिकाऊ आणि काहीसे लवचिक असते. घरबांधणीसाठी आणि फर्निचरसाठी त्याचा उपयोग केला जातो. याखेरीज बैलगाड्या, होड्या, नांगर, पेट्या इ. तयार करण्यासाठीही ते वापरतात.