जांब हा लहान आकाराचा वृक्ष मिर्टेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सायझिजियम जांबोस आहे. लवंग, पेरू, मिरी या वनस्पतींचाही याच कुलात समावेश केला जातो. हा वृक्ष मूळचा दक्षिण-पूर्व आशियाच्या उष्ण प्रदेशातील आहे. तो जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी फळांसाठी आणि शोभेसाठी लावलेला दिसून येतो. भारतात केरळमध्ये तो मोठया प्रमाणावर दिसतो.
पाने, फुले व फळांसह‍ित जांब वनस्पती

जांब या वनस्पतीचे मोठे झुडूप किंवा वृक्ष ३—१२ मी. उंचीपर्यंत वाढतो. खोड आणि फांद्या रोमहीन, साधारणपणे चपट्या असतात. पाने साधी, हिरवी गर्द व भाल्यासारखी असून १०—२० सेंमी. लांब आणि २—४ सेंमी. रुंद असतात. याला फेब्रुवारी महिन्याच्या सुमाराला पांढरी किंवा हिरवट पांढरी, मोहक व सुगंधी फुले येतात. फुलांमध्ये चार दले असून अनेक पुं-केसर असतात. मृदुफळ पेरू किंवा सफरचंद अशा फळांच्या आकारात असते. फळे फिकट हिरवी, हिरवी-गुलाबी, जांभळी, रक्तवर्णी किंवा गर्द लाल व गर्द जांभळी अशा वेगवेगळ्या छटांमध्ये असतात. एका वेळी झाडाला सु. ७०० फळे येतात. फळांचा गर रसाळ, कुरकुरीत, गुलाबाच्या वासाचा व स्वादाचा असतो; परंतु कमी गोड असतो फळांमध्ये करडया रंगाच्या १-२ बिया असतात.

फळांपासून मुरंबा व जेली तयार करतात. पाने रेचक असून पानांपासून मिळविलेले बाष्पनशील तेल स्नायूंच्या दुखण्यावर वापरतात. फळे मूत्रल असून ती मेंदू आणि हृदय यांवर शक्तिवर्धक असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा