सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. निशिगंध ही वनस्पती अगेव्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पॉलिअँथस ट्युबरोझा आहे. भारतात रजनीगंधा या नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप आणि मेक्सिकोतील असून आता तैगातील अनेक भागांत ती लागवडीखाली आहे. निशिगंधाच्या लागवडीसाठी कंद वापरतात.
निशिगंध ही वनस्पती १–१.५ मी. उंच वाढते. खोड (कंद) भूमिगत असते. मुळे फार खोलवर नसतात. पाने साधी, तलवारीसारखी, जमिनीतून खोडापासून निघालेली व हिरवीगार असतात. फुले उंच दांड्याच्या टोकाला गुच्छाने येतात. गुच्छात कळ्या वरच्या टोकाकडे असतात, तर उमललेली फुले खाली असतात. फुले पांढरी, द्विलिंगी आणि सुवासिक असतात. ती ५–६ सेंमी. लांब, खालच्या बाजूस थोडी वाकलेली व नसराळ्यासारखी असतात. बोंडे (फळे) क्वचित आढळतात. बी सपाट असते.
निशिगंधाच्या फुलांपासून सुगंधी अर्क काढतात. त्यापासून ‘रजनीगंधा’ हे अत्तर तयार करतात. फुले हार व वेण्या करण्यासाठी तर फुलांचे दांडे वेगवेगळ्या पुष्परचना व गुच्छ करण्यासाठी वापरतात. शोभेसाठी निशिगंधाच्या फुलांना पिवळा, लाल व निळा रंग देतात. फुलांचे दांडे रंगीत पाण्यात ६–७ तास उभे ठेवतात. रंगीत पाणी दांड्यातून फुलांत चढते आणि कळ्या व पाकळ्या रंगीत होतात.