पाण्याच्या पृष्ठाबाहेर काही वेळ तरंगणारा एक सागरी मासा. अस्थिमत्स्य वर्गाच्या बेलॉनिफॉर्मिस गणाच्या एक्झॉसीटिडी कुलात त्याचा समावेश होतो. या कुलातील माशांना सामान्यपणे पाखरू मासा म्हणतात. जगभर त्यांच्या ९ प्रजाती व ६४ जाती असून सर्व उष्ण प्रदेशातील समुद्रात ते आढळून येतात. त्यांचे वक्षपर विस्तीर्ण व पडद्यांनी बनलेले असून ते पंखांप्रमाणे काम करतात. पाखरू मासे त्यांच्या बळकट शेपटीला रेटा देऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उसळी मारून बाहेर झेप घेतात आणि परांच्या साहाय्याने काही अंतर हवेत तरंगत पार करतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे त्यांना पाखरू मासा असे म्हटले जाते. मात्र ते पक्ष्यांप्रमाणे उडू शकत नाहीत. त्याच्या काही जाती भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांजवळ आढळून येतात. कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या पाखरू माशाचे शास्त्रीय नाव एक्झॉसीटस व्होलिटॅन्स  आहे.

पाखरू मासा (एक्झॉसीटस व्होलिटॅन्स)

एक्झॉसीटिडी कुलातील माशांचे शरीर १५–४५ सेंमी. लांब व दोन्ही टोकांना निमुळते असते. त्यांचे पृष्ठपर व गुदपर शेपटीच्या अगदी जवळ असतात. वक्षपर विस्तृत व पातळ पडद्यांचे बनलेले असतात. काळपट रंगाच्या या वक्षपरांवर काही जातींमध्ये ठळक काळे ठिपके असतात. शरीरावर मध्यम आकाराचे चमकते चंदेरी खवले असतात. मुख वर वळलेले असते, डोळे मोठे असतात व वाताशय मोठा असतो.

शत्रूपासून बचाव करताना किंवा भक्ष्याचा पाठलाग करताना पाखरू मासे पाण्याबाहेर येऊन तरंगतात. पाण्याबाहेर येण्यापूर्वी ते पोहण्याचा वेग अतिशय वाढवितात आणि उसळी घेऊन शरीर पाण्याबाहेर काढतात व वक्षपर पसरतात. ते पुच्छपराने दोन्ही बाजूंच्या पाण्याला फटकारे देत नागमोडी मार्गाने पुढे सरकतात आणि शेपटीला रेटा देऊन हवेत पूर्णपणे झेपावतात. ते पाण्यातून उसळी घेण्यापूर्वी शरीर प्रति सेकंद ७० वेळा हलवून आवश्यक ती गती प्राप्त करतात. एका उड्डाणात ते साधारणपणे ५०–४०० मी. एवढे अंतर सहज कापतात. त्यांचे उड्डाण विमानासारखे असून उडताना त्यांचे पर वर-खाली होत नाहीत. ते तासाला ७० किमी. वेगाने उडू शकतात आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून सु. ६ मी. उंच तरंगू शकतात. पाण्यात परत शिरताना वक्षपर मिटले जातात किंवा शेपटीने पाण्यावर झटका देत पुन्हा तरंगण्यासाठी गती प्राप्त केली जाते.

झिंगे, माशांची अंडी, सूक्ष्म प्लवक हे पाखरू माशांचे भक्ष्य आहे. त्यांच्या प्रजननाचा काळ जरी वर्षभर असला, तरी मार्च-जून दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रजनन होते. त्यांच्या अंड्यांना लांब तंतू असतात. त्यामुळे अंडी एकमेकांत किंवा पाणवनस्पतींमध्ये गुंतून राहतात. या स्थितीत अंडी उबून पिल्ले बाहेर येईपर्यंत अंडी तरंगत राहतात. समुद्रातील डॉल्फीन व पॉरपॉईज यांसारखे सस्तन प्राणी, म्हाकूळसारखे मृदुकाय प्राणी आणि काही पक्षी हे पाखरू माशांचे भक्षक आहेत.

अनेक देशांत पाखरू मासे चवीने खाल्ले जातात. त्यांच्या तरंगण्याच्या सवयीचा उपयोग करून त्यांची पकड केली जाते. उदाहरणार्थ, भारताच्या दक्षिण भागात दोन होड्यांना बांबूच्या काठ्या लावून त्या काठ्यांना कापड पडद्यासारखे ताणून बांधतात. आवाजाला घाबरून पाण्याबाहेर तरंगणारे पाखरू मासे या पडद्याला धडकतात व आपोआपच बोटीत पडतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा