(प्लांट कम्युनिकेशन). सामान्यपणे वनस्पतींना प्राण्यांप्रमाणे बुद्ध‍िमान समजले जात नाही. कारण वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे स्पर्श, दृष्टी, श्रवण इ. क्षमतांसाठी कोणतेही इंद्रिय नसते, तसेच चेतासंस्था नसते. असे असूनही वनस्पतीची संदेशवहन यंत्रणा प्रगत असल्याचे निरनिराळ्या प्रयोगांतून दिसून आले आहे. मागील काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असे आढळले आहे की, वनस्पती समस्यांची उकल करतात, नियोजन करतात, स्वत:चा बचाव करतात, तसेच संदेशवहनदेखील करतात. वनस्पती स्वत:च्या अवयवांशी तसेच इतर वनस्पती, प्राणी, कीटक आणि कवके यांच्याशी संदेशांची देवाणघेवाण करतात. याकरिता त्या बाष्पनशील कार्बनी संयुगे, विद्युत संकेत आणि मुळांवरील कवके यांचा वापर करतात. वनस्पतींचे संदेशवहन प्राण्यांपेक्षाही अधिक प्रभावी व खात्रीशीर असते, असे वनस्पतितज्ज्ञांना वाटते.

बाष्पनशील संयुगांद्वारे संदेशन : वनस्पतींमधल्या बाष्पनशील कार्बनी संयुगांचे चार ठळक प्रकार केले जातात; (१) मेदाम्ले साधित संयुगे, (२) बेंझिनॉइडे, (३) ॲमिनो आम्ले साधित संयुगे आणि (४) टर्पिनॉइडे. विशेष म्हणजे बाष्पनशील कार्बनी संयुगांचा रेणुभार कमी असतो, ती जलरोधी असतात आणि त्यांचे सहज बाष्पात रूपांतर होते. वनस्पतींनी उत्सर्जित केलेल्या बाष्पनशील कार्बनी संयुगांना निसर्गातील जीव वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात; याद्वारे वनस्पती त्यांना हव्या असलेल्या शाकाहारी भक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात, तर काही लगतच्या वनस्पतींना त्यांच्यावर भक्षकांचा हल्ला होण्याआधी त्यांची रासायनिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी त्यांना सतर्क करतात. वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळी बाष्पनशील कार्बनी संयुगे बाहेर टाकतात. उदा., व्हिनस फ्लाय ट्रॅप ही वनस्पती विशिष्ट भक्ष्याला लक्ष्य करण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी बाष्पनशील संयुगे उत्सर्जित करते. काही वनस्पती आपली पाने, फुले किंवा फळे प्राण्यांनी खाऊ नये म्हणून आपल्या सभोवती बाष्पनशील सेंद्रिय संयुगे उत्सर्जित करतात. त्यांच्या गंधामुळे प्राणी त्यांच्यापासून दूर जातात किंवा जवळ फिरकत नाहीत.

टर्पिनॉइडांमुळे वनस्पती आणि कीटक, सस्तन प्राणी, कवके, सूक्ष्मजीव, इतर वनस्पती इ. यांच्यातील संदेशवहन सुलभ होण्यास मदत होते. टर्पिनॉइडे कीटकांना आकर्षित करू शकतात किंवा त्यांना परतवू शकतात. उदा., यूरोप आणि आशिया यांच्या सीमावर्ती भागात पायनस सिल्व्हेस्ट्रिस या पाइन वृक्षांपासून निर्माण झालेल्या पाइनीन, केरीन इ. टर्पिनांकडे टॉमिकस पिनिपेरडा जातीचे भुंगेरे आकर्षित होतात, तर व्हर्बिनोन या टर्पिनामुळे दूर जातात. टर्पिनॉइडे ही टर्पिनांसारखी संयुगे असतात. मात्र त्यांच्यात क्रियाशील गट असतात, तर टर्पिनांमध्ये क्रियाशील गट नसतात. टर्पिनॉइडे ही जैवरेणू असून त्यांच्या गटात सु. २२,००० पेक्षा जास्त संयुगे आहेत.

वनस्पतीमधील संदेशन : (१) व्हिनस फ्लाय ट्रॅप ही वनस्पती विशिष्ट भक्ष्याला लक्ष्य करताना, (२) पायनस सिल्व्हेस्ट्रिस या पाइन वृक्षावरील टॉमिकस पिनिपेरडा जातीचे भुंगेरे.

विद्युत संकेतांद्वारे संदेशन : वनस्पती विद्युत संकेताद्वारेदेखील संदेशवहन करतात. हे विद्युत संकेत पेशीद्रव्यातील कॅल्शियम आयनांच्या माध्यमांद्वारे घडतात. या कॅल्शियम संकेतांसाठी १०० पेक्षा अधिक प्रथिने आणि विकरे माध्यम असतात; त्यांमुळे काही वेळा वनस्पतींमध्ये क्रिया विभव (ॲक्शन पोटेंशियल) देखील निर्माण होते. वनस्पतींमधील अधोवाही ऊती हे विद्युत संकेत वाहून नेतात आणि वनस्पतींची जशी वाढ होते, तसतसे पूर्वस्मृतींच्या आधारे त्यांच्यात विद्युत संकेत वाहून नेण्यासाठी जाळे तयार होते. वनस्पती पर्यावरणातील विविध सूचकांना प्रतिसाद देतात आणि आंतरिक विद्युत संकेत निर्माण करून स्वत:च्या कार्यात बदल करतात. भक्षकापासून बचाव करणे, सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे, बदलणाऱ्या तापमानाला प्रतिसाद देणे, वाढीची दिशा बदलणे आणि मृदेत पोषकद्रव्ये सोडणे इ. बाबी या विद्युत संकेताद्वारे साधल्या जातात. वनस्पतींच्या अधोवाही ऊतींमध्ये भूतकाळातील घटनांसंबंधीच्या स्मृती साठलेल्या असतात. या स्मृतींद्वारे वनस्पती भविष्यातील उद्दीपनांना प्रतिसाद देऊ शकतात.

वनस्पतींमध्ये संदेशवहन त्यांच्या मुळांपासून बनलेल्या गुंतागुंतीच्या जाळ्यापासून देखील होते. या मुळांद्वारे वनस्पती अनेक संसाधनांची उदा., नायट्रोजन, कवके, पोषकद्रव्ये, सूक्ष्मजीव, कार्बनी संयुगे इत्यादींची देवाणघेवाण करू शकतात. मुळांमधील संकेत सावकाश घडतात. वनस्पती इतर वनस्पतींना भक्षकापासून सतर्क करण्यासाठी संदेश पाठवते, जिच्याद्वारे दुसरी वनस्पती भक्षकाला हुसकून लावण्यासाठी संरक्षक रसायनांची निर्मिती करते. अनेक वनस्पती आणि कवके यांच्यात सहजीवी संबंध असतात; वनस्पती कवकांना प्रकाशसंश्लेषणातून ऊर्जा व निर्माण झालेली कार्बनी संयुगे पुरवितात, तर कवके वनस्पतींना जमिनीतून खनिजे आणि इतर पोषकद्रव्ये देतात. जर कवकांनी पोषकद्रव्यांची निर्मिती पुरेशी केली नाही, तर वनस्पती कवकांचा नाश करू शकतात. याउलट कवके उपयुक्त ठरल्यास वनस्पती त्यांना अधिक ऊर्जा आणि त्यांच्यासाठी बहुमोल संयुगे पुरवतात. सु. ८०% वनस्पतींच्या मुळांवर कवके वाढतात. कवकांच्या कवकजालांनी एका वनस्पतीची मुळे दुसऱ्या वनस्पतीच्या मुळांशी जोडली जातात. कवकांच्या अशा जाळ्यांमुळे वनस्पतींच्या दरम्यान पाणी व अन्न वाहून नेले जाते. जेव्हा एखादा परजीवी किंवा घातक सूक्ष्मजीव वनस्पतीवर हल्ला करतात, तेव्हा मुळांवरील कवकांद्वारे संदेश पाठवले जातात आणि लगतच्या वनस्पती रक्षणासाठी विकरांची निर्मिती करतात. ज्या वनस्पतींना संदेश मिळतात, त्या घुसखोरांशी चांगल्या प्रकारे लढतात. कॅनडातील एका वनात, वृक्षांच्या अनेक जाती आणि कवके यांच्यातील संदेशवहनाचे जाळे सु. ३० किमी. लांब असून त्यांच्यातील संदेशन वेगाने घडत असल्याचे आढळले आहे.

वनस्पती, जीवाणू आणि कवक यांच्यातील गुंतागुंतीचे संदेशवहन नायट्रोजन स्थिरीकरणादरम्यान घडते. वनस्पती स्वत:हून नायट्रोजन स्थिरीकरण करू शकत नाहीत; त्यांच्यात जीवाणू व कवक यांच्या मदतीने नायट्रोजन स्थिरीकरण घडून येते. या प्रक्रियेत हरभरा, शेंगदाणे, वाटाणे, सोयाबीन इ. शिंबावंत वनस्पतींमध्ये वनस्पती, जीवाणू आणि कवके यांच्यात महत्त्वाचे संदेशवहन होते आणि ही प्रक्रिया घडते.