एक लहानसे झुडूप किंवा वृक्ष. नेपती ही वनस्पती कॅपॅरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅपॅरिस डेसिड्युआ आहे. तिला कर्डा किंवा करीर अशीही नावे आहेत. आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाच्या शुष्क प्रदेशांत नेपती वृक्ष आढळतो. भारतात नेपती ओसाड, कमी पावसाच्या निमवाळवंटी व वाळवंटी प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात तो काटेवनांमध्ये (थॉर्न फॉरेस्ट) आणि रस्त्याच्या कडेला विपुल प्रमाणात दिसून येतो.
नेपतीचे झुडूप हिरवट रंगाच्या असंख्य फांद्या आणि उपफांद्यांनी बनलेले असते. बऱ्याच फांद्या तारांसारख्या असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला छोटी छोटी पाने येतात आणि ती लवकर गळून पडतात. त्यानंतर पानांचे प्रकाशसंश्लेषणाचे कार्य हिरव्या फांद्यांमार्फत होते. प्रत्येक पानाच्या तळाला दोन लहान (५ मिमी.) तीक्ष्ण काटे असतात. नेपतीचे झुडूप पावसाळा संपत असताना फुलायला लागते. हिवाळ्याच्या सुरुवातीला कोरड्या ऋतूत लालगुलाबी रंगाची असंख्य व द्विलिंगी फुले झुपक्यांनी येतात. त्यामुळे संपूर्ण झुडूप लाल दिसू लागते. फुलात चार सुट्या पाकळ्या आणि आठ सुटे पुंकेसर असतात. अंडाशय एका लहानशा देठावर जायांगधरावर उचललेले असते. फळे लहान बोरांएवढी, गोलसर व पिकल्यावर लाल होतात. फळात अनेक सूक्ष्म बिया आणि खाद्य गर असतो. तो पक्ष्यांना तसेच प्राण्यांना आवडतो. हे झुडूप अतिशय काटक असून अवर्षणामध्येही तग धरून राहते. त्याचे खोड कापले असता त्या ठिकाणी कोंब फुटून नवीन वाढ होते.
नेपतीचे लाकूड अतिशय कठीण असते. मात्र, झुडूप लहान असल्यामुळे लाकडाचा उपयोग शस्त्रांच्या मुठी व कंगवे करण्यासाठी होतो. काही ठिकाणी फळांचे लोणचे करतात. खोडाची साल सारक, कृमिनाशक आणि कफनाशक आहे. मूळ कडू असून संधिवातावर उपयोगी असते.