घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयातही तो समुद्रसपाटीपासून सु. २,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही हा पक्षी आढळतो.
घार

घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी ५० – ६० सेंमी. असते. रंग तपकिरी असतो. डोके बसके, चोच आकडीसारखी आणि काळी असते. चोचीच्या बुडाकडील मांसल भाग पिवळसर; डोळे तपकिरी; पाय आखूड व पिवळे असून त्यांवर तपकिरी पिसे असतात. नख्या तीक्ष्ण व काळ्या, पंख लांब व टोकदार आणि शेपूट लांब व दुभागलेले असते. आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपासून ओळखता येतो. घार एकटी व चार-पाचच्या गटात भटकत असते.

घार माणसाच्या सहवासात राहणारी आहे. दाट वस्तीच्या शहरात किंवा गावात ती असतेच, पण दोन – चार घरांच्या केवळ नाममात्र खेडयातही ती दिसते. ती धीट असून माणसांना घाबरत नाही. कावळ्याप्रमाणे मनुष्यवस्तीतील घाण नाहीशी करण्याच्या कामी तिची मदत होते. तिची उडण्याची शक्ती असामान्य आहे. तासनतास ती आकाशात बऱ्याच उंचीवर उडत असते किंवा पंख पसरून तरंगत राहते. ती उंच जाते, खाली येते, वळते व उडत असताना तिची तीक्ष्ण दृष्टी सारखी जमिनीकडे असते. एखादा बेडूक, साप, सरडा, कोंबडीचे पिलू किंवा उंदीर जमिनीवर दिसला की, ती वेगाने खाली झेप घेऊन भक्ष्यावर झडप घालून तीक्ष्ण नखांनी पकडते आणि झाडावर नेते. चोचीने भक्ष्याला ठार मारते व त्याचे लचके तोडून खाते. गांडूळ, कीटक वगैरेसुद्धा ती खाते. थोडक्यात, खाण्याजोगा कोणताही पदार्थ तिला चालतो.

नर व मादी सारखेच दिसतात. मात्र, मादी आकारमानाने व वजनाने नरापेक्षा मोठी असते. सप्टेंबर ते एप्रिलपर्यंत त्यांचा विणीचा हंगाम चालतो. उंच झाडावर नर-मादी काटक्यांचे घरटे बांधतात. घरट्यासाठी वायर, दोरा, कापूस, चिंध्या यांचाही वापर करतात. मादी मातकट-पांढऱ्या रंगाची दोन-चार अंडी घालते. त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर-मादी दोघेही करतात. आकाशात उंच उडत असतानाही तिचे लक्ष पिलांकडे असते. स्थानिक घारींप्रमाणे स्थलांतरित घारीही आढळतात; त्यांच्या पंखाखाली पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात. स्थानिक घारी आपली हद्द ठरवून तेवढयाच क्षेत्रात वावरतात.