अक्रोड : फांदी व फळे.

अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुग्लांस रेजिया आहे. हा वृक्ष जुग्लँडेसी कुलातील असून मूळचा इराणमधील आहे. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब  व उत्तर प्रदेश या राज्यांत याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. या पानझडी वृक्षाची उंची २५- ३५ मी. असून खोडाचा घेर ३-४ मी. असतो. फळांसाठी लागवड करताना उंची कमी ठेवून फांद्याचा प्रसार वाढवितात. पाने एकाआड एक व संयुक्त असतात. पर्णिका अखंड व सुवासिक असतात. फुले लहान व पिवळसर हिरव्या रंगाची असतात. नर फुले लांब व लोंबत्या बारीक कणिशावर, तर मादी फुले कणिशाच्या टोकाला असतात. फळ हे ५ सेंमी. व्यासाचे, हिरवे, लांबट गोलसर व पेरूएवढे असते. फळाचे कवच जाड व कठिण असते.मेवामिठाई व आइस्क्रीम यांमध्ये अक्रोडचे बी वापरतात. सुकामेवा व मुखशुद्धीसाठी याचे बी खातात. कच्च्या फळांपासून लोणची, मुरंबे, चटणी व सरबत बनवितात. हिरव्या सालीचा तेलात किंवा मद्यार्कात अर्क काढून व त्यात तुरटी घालून केसाचा कलप बनवितात. हिरवी साल मत्स्यविष आहे. पाने पौष्टिक, कृमिनाशक असून झाडाची साल व पाने पुरळ, इसब, गंडमाळा, उपदंश इत्यादींवर उपयुक्त असतात. फळ संधिवातावर उपयुक्त आहे. बियांचे तेल खाद्य असून ते चित्रकारांचे रंग व साबण यांकरिताही वापरतात. पेंड व पाने जनावरांना खाऊ घालतात. लाकूड मध्यम कठिण, जड व बळकट असल्यामुळे सजावटी सामान व अनेक सुबक वस्तूंकरिता वापरतात. १०० ग्रॅ. अक्रोड बियांमध्ये साधारण ६५ ग्रॅ. मेद तर १५ ग्रॅ. प्रथिने असतात. अक्रोडच्या उत्पादनात चीन हा जगातील अग्रेसर देश असून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इराण व तुर्कस्तान हे इतर प्रमुख उत्पादक देश आहेत.

अक्रोडाची फळे प्रतिऑक्सिडीकारकाने आणि ओमेगा-३ प्रकारच्या मेदाम्लाने समृद्ध असतात. अक्रोडामध्ये आर्जिनीन हे अ‍ॅमिनो आम्लही असते. त्यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइडची निर्मिती होत असल्याने रक्तवाहिन्या लवचिक राहतात.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा