पपई (कॅरिका पपया): झाड

पपई ही वनस्पती कॅरिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे. ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून मेक्सिकोत प्रथम तिची लागवड करण्यात आली. हल्ली या ओषधीय वृक्षाचा प्रसार जगातील सर्व उष्ण प्रदेशांत झालेला दिसून येतो. ब्राझील, मेक्सिको, नायजेरिया, इंडोनेशिया, चीन व पेरू या देशांत पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, प. बंगाल, आसाम, केरळ, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत पपईची लागवड केली जात असून देशात पपईचे एकूण उत्पादन सु. २६ लाख टन प्रतिवर्षी होते.

पपईचे कापलेले फळ

पपई या वृक्षाचे खोड सु. ५–१० मी. उंच असून त्याला फांद्या क्वचितच फुटतात. पडून गेलेल्या पानांच्या तळांच्या खुणा (किण) खोडावर दिसतात. खोड नरम असते कारण त्यात काष्ठ कमी असते. पाने साधी, एकाआड एक व मोठी (५०–७० सेंमी. व्यासाची) असतात. पानांचा आकार हस्ताकृती असून ती सात खंडांत विभागलेली असतात. देठ जाड परंतु पोकळ असतात. नर व मादी झाडे वेगवेगळी असून नर-फुले घोसात आणि मादी-फुले एकेकटी येतात. नर-फुलांमध्ये पाच पाकळ्या असतात आणि त्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसतो. त्यात दहा पुंकेसर व वंध्य जायांग असते. नर झाडाला फळे लागत नाहीत. मादी-फुलाच्या पाच पाकळ्या तळाशी जुळलेल्या, परंतु वर सुट्या आणि बाहेर वळलेल्या असतात. त्यातील पुंकेसर वंध्य असतात. मृदुफळ मोठे, हिरवे व लांबट गोल असून पिकल्यावर बाहेरून पिवळे आणि आत शेंदरी बनते. पिकलेल्या फळातील गर गोड आणि तंतुमय असतो. फळात तपकिरी रंगाच्या अनेक बिया असतात.

पपईचे फळ पौष्टिक आहे. त्यात पेक्टिन, पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि पेपेन नावाचे विकर असते. कच्च्या फळावर चिरा मारून स्रवलेल्या द्रवापासून पेपेन मिळवितात. पेपेन औषधी असून ते प्लीहा आणि मासिक पाळीच्या विकारांवर देतात. तसेच ते लोकर, चीज, जेली, च्युईंग गम आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. जेलीपासून टुटीफ्रुटी तयार करतात. पपईची पाने किंवा कच्च्या फळांचे तुकडे मांस लवकर शिजावे म्हणून त्यात घालतात. कच्ची पपई भाजीसाठी वापरतात.