(टायगर). अन्नसाखळीच्या शिखरावरील एक मांसाहारी प्राणी. वाघाचा समावेश स्तनी वर्गाच्या फेलिडी (मार्जार) कुलातील पँथेरा प्रजातीत होतो. या प्रजातीत सिंह, चित्ता, हिम बिबट्या (स्नो लेपर्ड), जग्वार हे प्राणीदेखील येतात. वाघाचे शास्त्रीय नाव पँथेरा टायग्रिस आहे. पँथेरा टायग्रिस टायग्रिस आणि पँथेरा टायग्रिस सोंडाइका अशा वाघांच्या दोन मुख्य उपजाती आहेत; भारत आणि अन्य दक्षिण आशियाई देशांत पँ. टा. टायग्रिस (बेंगॉल टायगर, साउथ-चायना टायगर, इंडोचायनीज टायगर व सायबीरियन टायगर) ही उपजाती, तर इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर पँ. टा. सोंडाइका (सुमात्रन टायगर) ही उपजाती आढळते. फेलिडी कुलामध्ये भारतीय वाघ आकारमानाने सर्वांत मोठा आणि ताकदवान प्राणी आहे. वाघांना अधिवासानुसार निरनिराळी नावे असून भारतातील वाघांना इंग्लिश भाषेत ‘बेंगॉल टायगर’ म्हणतात. तो मूळचा उत्तर यूरेशियातील असून सु. १२,००० वर्षांपूर्वी चीन, मलेशिया, म्यानमार यामार्गे पूर्वेकडून भारतात आला असावा. भारत, बांगला देश, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या देशांचा वाघ ‘राष्ट्रीय प्राणी’ आहे. पुढील माहिती मुख्यत: भारतीय वाघासंबंधी आहे.

वाघ (पँथेरा टायग्रिस)

भारतातील वाघ निरनिराळ्या प्रकारच्या वनांमध्ये जसे, आसाम आणि पूर्व बंगालमधील आर्द्र, सदाहरित आणि निम्न–सदाहरित वने, गंगा–ब्रह्मपुत्रा नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दलदलीतील खारफुटी वने, तरईची पानझडी वने किंवा पश्चिम घाटातील काटेरी वने इ. ठिकाणी राहतात. भारत आणि बांगला देश येथील सुंदरबनातील वाघ खारफुटीत राहणारे एकमेव वाघ आहेत.

स्नायुमय शरीर, मोठे डोके आणि शरीराच्या निम्म्या लांबीइतकी शेपटी हे वाघाच्या शरीराचे वैशिष्ट्य आहे. वाघाच्या शरीरावर दाट फर असते; फरचा रंग फिकट पिवळा ते फिकट लाल असून तिच्यावर गडद काळे पट्टे असतात. कोणत्याही दोन वाघांच्या शरीरावरील पट्टे सारखे नसतात. पोट, गळा व पाय यांच्या आतील फर पांढऱ्या रंगाची असते. वाघाची उंची खांद्याजवळ ९०–११० सेंमी. असते. शरीराची लांबी शेपटीसह २७०–३१० सेंमी. असते; शेपटी सर्वसाधारणपणे ८५–११० सेंमी. लांब असते. पुढचे पाय मजबूत असतात. दात मजबूत असतात; त्यांचे सुळे सु. ७.५ ते १० सेंमी. लांबीचे असतात. मार्जार कुलातील वाघाचे सुळे हे सर्वांत लांब सुळे आहेत. नर मादीपेक्षा मोठा असतो. नराचे वजन १८०–२५८ किग्रॅ. असते, तर मादीचे वजन १००–१६० किग्रॅ. असते. नराचे पुढचे पंजे मादीच्या पंजापेक्षा मोठे असतात. त्यावरून नर ओळखता येतो. वाघाची डरकाळी साधारणत: ३ किमी. पर्यंत ऐकू येते. पूर्ण क्षमतेने वाघ प्रति तास सु. ६५ किमी. वेगाने धावू शकतो.

वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र विस्तृत असते, ज्याद्वारे त्यांची भक्ष्याची गरज भागली जाते. लपण्यासाठी पुरेशी झाडी, पाणवठ्याजवळची जागा आणि मुबलक भक्ष्य मिळेल अशा बाबी हेरून ते अधिवास निवडतात. दुसऱ्या क्षेत्रातील वाघांमध्ये मिसळायला ते मोठे अंतर पार करू शकतात. अधिवासाचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी वाघ/वाघिणी गंधखुणांचा वापर करतात, म्हणजेच मूत्राचे आणि गुदग्रंथीच्या स्रावाचे फवारे उडवितात. तसेच ते नख्यांनी झाडावर किंवा जमिनीवर खुणा करतात. या खुणांमुळे त्यांच्या अधिवासात शिरण्याआधी नवख्या वाघाला/वाघिणीला आधीच्या वाघाची/वाघिणीची ओळख, लिंग, प्रजननाची स्थिती यासंबंधी माहिती होते. वाघीण माजावर आली की, वारंवार गंधखुणा बाहेर टाकते आणि डरकाळ्या फोडून इतर नरांना सूचना देते. वाघ आपल्या क्षेत्रात आलेल्या इतर नरांना भीती दाखवून हुसकावून लावतात. शक्यतो ते लढाई टाळतात. सामान्यपणे भांडताना, प्रजननकाळात किंवा भक्ष्याला मारल्यानंतर ते डरकाळी फोडतात. तसेच गुरगुरणे, म्यांव–म्यांव करणे, फुत्कारणे असेही आवाज ते काढू शकतात.

वाघ निशाचर असतात. परंतु जेथे मनुष्याचा अडसर नसतो, अशा ठिकाणी ते दिवसा वावरतात. ते उत्तम पोहू शकतात आणि तळी, तलाव, नदी अशा ठिकाणी डुंबून आपले शरीर थंड ठेवतात. प्रौढ वाघ एकेकटे वावरतात, तसेच स्वत:चे अन्न एकेकटे मिळवितात. रात्री झोपण्यासाठी ते एकत्र येतात. प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करीत असताना, तरुण वाघ अधिक संख्येने मरतात. तरुण वाघ अधिवासासाठी जेथे दुसरा वाघ नाही असे क्षेत्र निवडतात किंवा दुसऱ्या वाघाच्या क्षेत्रात, जोपर्यंत पूर्ण वाढ होऊन त्या दुसऱ्या वाघाला आव्हान देण्याचे सामर्थ्य कमावत नाही, तोपर्यंत राहतात. तरुण वाघीण तिचा पहिला अधिवास तिच्या आईच्या अधिवासालगत शोधते; कालांतराने या अधिवासांतील अंतर कमी होते. नर वाघांचा अधिवास वेगवेगळा असतो. वाघीणी त्यांचा वावर त्यांच्या अधिवासापुरता मर्यादित ठेवतात आणि बछड्यांची काळजी घेतात.

सामान्यपणे वाघ मोठ्या तसेच मध्यम आकारमानाच्या, खुरी प्राण्यांवर जगतो आणि शिकार करून खातो. सांबर, चितळ, बारशिंगा, नीलगाय, गवा, म्हशी इ. त्याचे भक्ष्य आहे. यांखेरीज कुत्रे, बिबटे, मगर यांचीही तो शिकार करतो. शिकार करताना तो भक्ष्याच्या गळ्याचा चावा घेतो आणि पुढच्या दोन्ही पायांनी भक्ष्याला पकडून त्याला जमिनीवर लोळवतो. जोपर्यंत भक्ष्य गुदमरून मरत नाही तोपर्यंत तो गळा सोडत नाही. ससे, वानरे यांची शिकार करताना तो काही वेळा लहान भक्ष्याला पंज्याच्या फटक्याने ठार मारतो. भक्ष्याला मारल्यावर तो भक्ष्याला झाडाझुडपात ओढत नेऊन ठेवतो आणि नंतर खातो. दोन आठवड्यांपर्यंत तो अन्नाशिवाय राहू शकतो. परंतु अन्न मिळाले नाही तर तो दुसऱ्या मांसाहारी प्राण्यांनी केलेली शिकार पळवतो. मात्र अशा वेळी त्याचा इतर प्राण्यांशी संघर्ष होतो. अशा परिस्थितीत बिबटे, रानटी कुत्रे, तरस, कोल्हे, अस्वले, मगरी यांच्याशी वाघाची लढाई होते आणि वाघ त्यांना ठार मारतो. काही वेळा रानटी कुत्रे, अस्वले आणि मगरी मिळून वाघावर हल्ला करतात आणि त्याला ठार मारतात. वाघ क्वचितच माणसावर हल्ला करतो. मात्र जो वाघ माणसावर हल्ला करतो त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागते. प्राणिसंग्रहालयातील वाघांना दररोज ३ ते ६ किग्रॅ. मांस पुरवावे लागते.

वाघीण ३-४ वर्षांत, तर वाघ ४-५ वर्षांत प्रजननक्षम होतो. वाघ–वाघीण वर्षभर समागम करीत असले, तरी नोव्हेंबर ते एप्रिल हा त्यांचा प्रजननकाळ असतो. गर्भावधी ९३ ते ११२ दिवसांचा असतो. वाघीण एका वेळी १ ते ३ बछड्यांना जन्म देते; क्वचित सहापर्यंत बछडे जन्माला येतात. जन्मलेल्या बछड्यांचे डोळे उघडलेले नसतात; ६–१४ दिवसांनी त्यांचे डोळे उघडतात. वाघीण ५-६ महिने पिलांना दूध पाजते. एखाद्या गर्द झुडपात, खडकांच्या कपारीत, गुहेत ठेवून ३ ते ६ महिने ती त्यांचे पालन करते. या बछड्यातील एखादा बछडा हा अधिक सक्रिय असतो आणि तोच इतर पिलांवर वर्चस्व गाजवतो. या काळात पिले वाघिणीबरोबर राहतात आणि शिकार करायला शिकतात. साधारणपणे १८ महिन्यांनी ते स्वतंत्र होतात. परंतु दोन ते अडीच वर्षे ते वाघिणीसोबत राहतात. बछड्यांच्या संगोपनाची काळजी गरजेनुसार नर घेतो.

पांढरा वाघ

भारतात पांढऱ्या रंगाचे वाघदेखील आढळतात. पांढरे वाघ ही वाघाची उत्परिवर्तित जाती आहे. त्यांच्या शरीरावरच्या पांढऱ्या फरवर गडद करडे, चॉकलेटी किंवा लालसर काळ्या रंगाचे पट्टे असतात. ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार व आसाम येथे वन्य स्थितीत पांढरे वाघ अधूनमधून दिसतात. पांढरे वाघ फरच्या रंगातील फरकामुळे उठून दिसतात. त्यांच्यात मेलॅनीन गटातील काही संयुगे नसतात. त्यांची उत्पत्ती केसांच्या रंगाच्या प्रभावी जनुकांच्या किंवा जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे झाली असावी, असे मानतात. वनांतील काही वाघांमध्ये अंत:प्रजनन झाल्याने प्रभावी जनुकाचा प्रसार हळूहळू झाला असावा. मात्र पांढऱ्या वाघांमध्ये विवर्णता नसते.

पहिल्यांदा पांढरा वाघ मिळाल्याची नोंद १९०७ मधील आहे. मध्य प्रदेशातील रेवा संस्थानचे राजा धीरज मार्तंडसिंग यांना १९५१ मध्ये पांढऱ्या वाघाचा ९ महिन्यांचा एक बछडा मिळाला. त्याचा एका वाघिणीशी संकर करून झालेल्या १० पिलांतील एका वाघिणीशी पुढे संकर होऊन चार पांढरी पिले झाली. भारतातील पांढरे वाघ तीन वंशावळीतील आहेत. पांढरे वाघ अन्य रंगाच्या वाघांपेक्षा मोठे असतात. तसेच पांढरे वाघ अन्य रंगाच्या वाघांपेक्षा लवकर वाढतात आणि २-३ वर्षांत प्रजननक्षम होतात. साधारणपणे १०,००० वाघांमागे एक पांढरा वाघ दिसून येतो. भारतात सु. १०० पांढरे वाघ आहेत.

वनांमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या अंकीय (डिजीटल) कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वाघाची छायाचित्रे काढून त्याची ओळख पटवली जाते. वाघांचे शरीरावरचे पट्टे, पायांचे ठसे दुसऱ्या वाघांपेक्षा वेगवेगळे असतात. त्यांच्या पायाचे ठसे, छायाचित्रे, विष्ठेचे डीएनए परीक्षण यातून एखाद्या क्षेत्रात किती वाघ आहेत, याचा अंदाज करता येतो. वाघांची संख्या कमी होण्यामागे त्यांच्या अधिवासांचा ऱ्हास, अधिवास विभागला जाणे, वाघाचे कातडे आणि शरीराचे भाग यांकरिता त्यांची होणारी शिकार ही मुख्य कारणे आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगात वन्य स्थितीतील वाघांची संख्या सु. १ लाख होती, असा अंदाज आहे. १९९० पर्यंत ही संख्या जेमतेम ३,५०० झाली असावी. २०२२ मध्ये जगातील वाघांचे सर्वेक्षण केले असता त्यांची संख्या वाढून सु. ४,५०० एवढी आढळली आहे.

जगात वन्य स्थितीतील सर्वाधिक वाघ फक्त भारतात आढळतात. भारत सरकारने १९७६ मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ (व्याघ्र प्रकल्प) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) येथून सुरू केले. त्यानंतर त्यात मानस (आसाम), सुंदरबन (प. बंगाल), पालामाऊ (झारखंड), रणथंभोर (राजस्थान), कान्हा (मध्य प्रदेश), सिमलीपार (ओडिशा), मेळघाट (महाराष्ट्र) व बंदिपूर (कर्नाटक) या जंगलांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला. यानंतरही सारिस्का (राजस्थान), पेरियार (केरळ), इंद्रावती (छत्तीसगढ), कुक्सार (प. बंगाल), नागार्जुनसागर (आंध्र प्रदेश) इ. जंगलांचा व्याघ्र प्रकल्पात अंतर्भाव करण्यात आला. महाराष्ट्रातही मेळघाटसह ताडोबा-अंधारी (चंद्रपूर), पेंच, सह्याद्री, नवेगावबांध व बोर या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प राबविण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे देशातील वाघांची संख्या १९७३ मध्ये १,२०० पासून १९९० पर्यंत ३५०० इतकी वाढली. शिकारीमुळे २००७ मध्ये वाघांची संख्या सु. १,४०० इतकी कमी झाली. त्यानंतर भारत सरकारने मोठ्या प्रमाणात वाघाच्या संवर्धनासाठी अनुदान दिले असून त्यांची संख्या वाढण्यावर भर दिला आहे. याखेरीज वाघांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप कमी करणे, त्यांच्या शिकारीला आळा घालणे आणि अधिवासाचे क्षेत्र वाढविणे यांकरिता नवीन व्याघ्र प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या सर्व उपायांमुळे २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील वाघांची संख्या सु. २,२२५ एवढी वाढलेली आढळली आहे. याच सुमाराला बांगला देशात सु. ४४०, नेपाळमध्ये १६३–२५३ आणि भूतानमध्ये १०३ वाघ आढळून आले आहेत. २०१८ मध्ये केलेल्या व्याघ्रगणनेनुसार वाघांची संख्या सु. २,९६८ इतकी आढळली आहे. दरवर्षी २९ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.