सप्तपर्णी (ॲल्स्टोनिया स्कोलॅरीस) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे.

(इंडियन डेव्हिल्स ट्री). एक सदाहरित वृक्ष. सप्तपर्णी हा वृक्ष ॲपोसायनेसी कुलातील असून भारतात सामान्यपणे ॲल्स्टोनिया स्कोलॅरिस या शास्त्रीय नावाची जाती आढळून येते. ॲल्स्टोनिया प्रजातीत एकूण ५० जाती असून भारतात त्यांपैकी सहा जाती आढळतात. या वृक्षाला ‘सातवीण’ असेही म्हणतात. संस्कृत भाषेत ‘सप्तच्छदा’ असे म्हणतात. भारत, श्रीलंका, फिलिपीन्स, म्यानमार, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांत सप्तपर्णी आढळून येतो. महाराष्ट्रात पूर्व आणि पश्चिम घाटातील ओलसर दाट वनात सस. सु. १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात तो दिसून येतो. सप्तपर्णी हा पश्चिम बंगाल राज्याचा राज्यवृक्ष आहे.

सप्तपर्णी १२–१८ मी. उंच वाढतो. काही ठिकाणी हा वृक्ष सु. ४० मी. पर्यंत उंच वाढलेला दिसून येतो. खोडाचा पृष्ठभाग खरबरीत असतो आणि साल करड्या रंगाची असते. खोडाचा घेर सु. २.५ मी.पर्यंत वाढतो. पाने साधी व आंब्याच्या पानांसारखी असून त्यांची टोके निमुळती असतात. पानांचा वरचा भाग गर्द हिरवा, तर खालचा भाग पांढरट असतो. पाने वृक्षाच्या फांद्यांवर झुबक्याने व गोलाकार रचनेत (मंडलात) येतात. पानांची संख्या एका मंडलात तीन ते दहा, परंतु बहुधा सात असते. यामुळे या वृक्षाला सप्तपर्णी हे नाव पडले असावे. फुले डिसेंबर ते मार्च महिन्यात येतात. फुले पांढरी किंवा हिरवट पांढरी, सुगंधी व फांद्यांच्या टोकाला झुबक्याने येतात आणि बिनदेठाची असतात. फळे पेटिका स्वरूपाची असून ती झुबक्याने लटकतात. बिया लहान, लांबट व सपाट असून बियांच्या दोन्ही टोकांना केसांचे झुबके असतात. वाऱ्यामार्फत त्यांचा प्रसार होतो.

सप्तपर्णीचे लाकूड सुरुवातीला पांढरे नंतर फिकट तपकिरी होते. ते चकचकीत, गुळगुळीत, हलके व टिकाऊ असते. लाकडाचा उपयोग बुचे, पेन्सिली, आगकाड्या, प्लायवुड, खोकी, धूळपेट्या बनविण्यासाठी करतात. साल (व्यापारी नाव डिटा-बार्क) कडू शक्त‍िवर्धक व स्तंभक असून हिवताप, आमांश आणि अतिसार यांवर उपयुक्त असते. पूर्वी बेरीबेरी रोगाच्या उपचारासाठी सप्तपर्णीच्या पानांचा काढा दिल्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे. साल त्वचारोगावर वापरतात. बागांमध्ये व रस्त्यांच्या कडेला शोभेसाठी तसेच सावलीसाठी या वृक्षाची लागवड करतात.