आ. विद्युत वितरण योजना

विद्युत् जनित्रांमध्ये (Generators) विद्युत् ऊर्जा निर्माण केली जाते व तारांच्या जाळ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पुरविली जाते. या तारांच्या जाळ्यांमध्ये १) प्रेषण तारा (Transmission Lines), २) वितरण तारा, ३) उपवितरण तारा (Feeders) आणि ४) भरण तारा (Service mains) यांचा समावेश होता. सर्वांत प्रथम जनित्रांमध्ये निर्माण केलेल्या ऊर्जेचा विद्युत् दाब (Voltage) रोहित्राच्या (Transformer) साहाय्याने वाढविला जातो. नंतर प्रेषण तारांमार्फत ही ऊर्जा ज्या भागातील ग्राहकांना विद्युत् पुरवठा करावयाचा आहे, त्या भागातील उपकेंद्रास (Sub-station) पुरविली जाते. या उपकेंद्रामध्ये विद्युत् रोहित्राच्या साहाय्याने ऊर्जेचा विद्युत् दाब कमी केला जातो. नंतर वितरण तारा, उपवितरण तारा व भरण तारा यांच्यामार्फत विद्युत् ऊर्जा ग्राहकांना पुरविली जाते.

आकृतीवरून असे लक्षात येईल की, एका वितरण तारेस अनेक उपवितरण तारा जोडलेल्या असतात, एका उपवितरण तारेस अनेक भरण तारा जोडलेल्या असतात आणि एका भरण तारेस अनेक ग्राहक जोडलेले असतात. याचा अर्थ असा की, एका वितरण तारेमधून अनेक ग्राहकांना विद्युत् ऊर्जा पुरविली जाते. स्वाभाविकपणे वितरण तार पुरेसा विद्युत् प्रवाह (current) वाहून नेण्यास सक्षम असली पाहिजे. म्हणजेच ती तार पुरेशी जाड असली पाहिजे सबब, वितरण तारेस किती विद्युत् प्रवाह वाहून न्यावयाचा आहे त्यानुसार तिची जाडी ठरविली जाते.

याच पद्धतीने उपवितरण तारा व भरण तारा यांचीही जाडी ठरविली जाते.

वर वर्णन केलेल्या वितरण योजनेमध्ये, सुरक्षेच्या दृष्टीने, प्रत्येक प्रेषण तार, वितरण तार, उपवितरण तार व भरण तार यांच्या दोन्ही टोकांस योग्य ते संरक्षण साहित्य  (Protective equipment) जोडलेले असते (सोयीसाठी हे संरक्षण साहित्य वरील आकृतीमध्ये दाखविलेले नाही.)

संदर्भ :

  • Chand, S.; Mehta, V.K. Principles of Power Systems, New Delhi.
  • Wadhawa, C.L. Electrical Power Systems, New Age International Publishers, New Delhi.

प्रतिक्रिया व्यक्त करा