निसर्गपर्यटनाचा पर्यावरणपूरक असा एक पर्यटन प्रकार. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्टया मानवी जीवनाशी अत्यंत संकीर्णपणे जोडलेला आणि सर्व प्रकारच्या सेवांवर आधारित पर्यटन हा आधुनिक उद्योग आहे. पर्यटनाचा हेतू, त्याचे स्वरूप, प्रवासक्षेत्र इत्यादी बाबींनुसार पर्यटनाचे विविध प्रकार केले जातात. निसर्गपर्यटन हा पर्यटनाचा एक प्रमुख प्रकार आहे. यात प्रामुख्याने उद्याने आणि इतर नैसर्गिक क्षेत्रांचा समावेश होतो. परिपर्यटनात विशेषकरून आर्द्रभूमी, वन्यजीव क्षेत्र, संरक्षित वनस्पतींची क्षेत्रे, प्राणी अधिवास किंवा निवासस्थान इत्यादी पर्यावरणाशी निगडित क्षेत्रे समाविष्ट असतात.

परिपर्यटन ही जोडसंज्ञा पर्यटनाला ‘परि’हा उपसर्ग लावून तयार केली गेली आहे. पर्यटन म्हणजे आनंद किंवा मनोरंजनासाठी केलेला प्रवास. परि म्हणजे सभोवार. आपल्या भोवतालच्या गोष्टींशी म्हणजे पर्यावरणाशी संबंधित पर्यटन म्हणजे परिपर्यटन. परिपर्यटनासाठी पर्यावरण मैत्रभाव पर्यटन, पर्यावरणानुकूल पर्यटन अशाही संज्ञा वापरल्या जातात.

पर्यावरण संधारण आणि पर्यटन क्षेत्रातील स्थानिक लोकांचे कल्याण ही स्वत:ची जबाबदारी समजून निसर्गक्षेत्रात केलेले पर्यटन हे परिपर्यटन होय. यात पर्यटनासाठी निवडलेल्या क्षेत्रातील स्थानिक लोकांची संस्कृती आणि त्या क्षेत्रातील नैसर्गिक पार्श्वभूमी यांमुळे पर्यटक प्रेरित होतात. या पर्यटनात प्रवासाचा हेतू मुख्यत: पर्यटनक्षेत्रातील वनस्पती, प्राणी, भूविज्ञानस्थिती, परिसंस्था, स्थानिक लोकांच्या गरजा, संस्कृती, भूमीशी त्यांचे नाते इत्यादी घटकांशी संबंधित असतो. परिपर्यटन हे निसर्गावर आधारित असून त्यात शिक्षण, नैसर्गिक पर्यावरणाचे संधारण आणि शाश्वत पारिस्थितिकीचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो. पर्यटन क्षेत्रातील नैसर्गिक व सांस्कृतिक इतिहासाचा आदर राखून तेथील परिसंस्थेच्या एकात्मतेला बाधा न येऊ देता हे पर्यटन आयोजित केले जाते.

परिपर्यटनात निसर्ग व निसर्गाचे व्यवस्थापन याबाबत स्थानिक नागरिकांचे उद्बोधन यावर भर दिला जातो. आंतरराष्ट्रीय वर्ष २००२ मध्ये परिपर्यटनाचे पुढीलप्रमाणे निकष सुचविले गेले आहेत : (१) निसर्गाधारित उत्पादन, (२) व्यवस्थापनाचा कमीत कमी प्रभाव, (३) पर्यावरण शिक्षण, (४) संधारणासाठी योगदान, (५) समाजासाठी योगदान. या निकषांवरच परिपर्यटन ठरेल अन्यथा ते निसर्गपर्यटन ठरेल.

परिपर्यटनामुळे परिसंस्थेच्या संरक्षणातून जैविक आणि सांस्कृतिक विविधतेचे संधारण होते. तसेच जैवविविधतेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन लाभते. यात स्थानिक समाजाची सहमती व सहभाग असल्याने त्याचा आर्थिक वाटा तेथील लोकांना मिळतो. पर्यावरणीय व सांस्कृतिक ज्ञानात वाढ होते. तसेच अपशिष्टे, टाकाऊ पदार्थांचे प्रमाण घटते. अशा प्रकारे परिपर्यटन हे स्थानिक समाज आणि स्थानिक पर्यावरण यांच्यासाठी दीर्घकाळ फलदायी ठरते. पर्यावरणाची उद्दिष्टे लक्षात न घेता केलेले पर्यटन जरी त्याला ‘परिपर्यटन’असे नाव दिलेले असले तरी पर्यावरणास हानिकारक ठरू शकते.

भारतीय पर्यटकांनाही परिपर्यटनाची जाणीव झाली आहे. परिपर्यटनास चालना मिळावी या उद्देशाने शासकीय व निमशासकीय संस्थांतर्फे (इको टुरिझम सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय पर्यटन विकास निगम) समाजजागृतीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. भारतात प्राकृतिक, नैसर्गिक विविधता वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येते. अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, इतर निसर्गक्षेत्रांस पर्यटक बहुसंख्येने जात आहेत आणि परिसंस्थापूरक पर्यटनात सहभाग घेत आहेत. कर्नाटक, सिक्कीम राज्यातील वन्यक्षेत्र पर्यटन आणि महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ पर्यटनस्थळ हे परिपर्यटनाचे दोन प्रयोग भारतात यशस्वी झाले आहेत. परिपर्यटनाचा प्रसार व्हावा यासाठी भारत सरकार पर्यटन संस्था, पर्यटन केंद्र इत्यादींना आर्थिक साहाय्य करते.