जलसंधारणाची एक साधी व सोपी पद्धत. पावसाचे पाणी (पर्जन्यजल) जलप्रस्तरापर्यंत पोहोचण्याआधी शास्त्रीय पद्धतीने ते साठविणे म्हणजे पर्जन्यजल साठवण. अशा साठविलेल्या पाण्याचा उपयोग अन्य स्रोतांपासून मिळालेल्या पाण्याला पूरक म्हणून केला जातो. या पद्धतीत प्रत्यक्ष पाऊस पडत असलेल्या पाणलोटाच्या भागात पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी छपराच्या टोकाला अर्धनळी किंवा पन्हळ जोडलेले असते. त्यातून आलेले पाणी नलिकेने टाकीपर्यंत वाहून नेले जाते. जमा झालेले हे पाणी भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाखाली साठविले जाते.
पर्जन्यजल साठविण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून जलटंचाई प्रदेशात प्रचलित असल्याचा उल्लेख आढळतो. इ.स.पू. ३०० मध्ये बलुचिस्तान (सध्याचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि भारतामधील कच्छचा भाग) या प्रदेशात जलसिंचनासाठी पर्जन्यजल साठवण होत असे. भारतात प्राचीन काळात इ.स. १०११ ते १०३७ दरम्यान तमिळनाडू राज्यातील कडलोर जिल्ह्यात पर्जन्यजल साठविण्यासाठी जलकुंभ बांधल्याची नोंद आहे.
पर्जन्यजल साठविल्यामुळे जल उपलब्धता वाढते. त्यामुळे त्या प्रदेशातील जलसुरक्षा स्थितीत वाढ होते. जलटंचाईच्या काळात हा परिपूर्ण व खात्रीचा उपाय मानला जातो. भूपृष्ठावरून वाहणारे पर्जन्यजल अडवून साठविल्याने ते जमिनीत पाझरते. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते. काही भागांत जमा केलेले पर्जन्यजल जमिनीत खोलवर नलिकेने सोडले जाते. परंतु ह्या पद्धतीमुळे भूपृष्ठावरील प्रदूषके या पाण्याद्वारे भूजलात मिसळल्याने ते प्रदूषित होऊ शकते. त्याऐवजी असे जल जमिनीत न सोडता तलाव, सरोवर किंवा इतर जलाशयात साठविणे अधिक सोयीचे ठरते. हे पाणी जमिनीत पाझरत असल्याने भूजल प्रदूषित होत नाही. भूपृष्ठावरून पर्जन्यजल दूरवर वाहण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने मृदेच्या वरील थराचे संरक्षण होऊन मातीचे कण वाहून जाण्यावर नियंत्रण येते व मृदा संधारणास मदत होते. पर्जन्यजल साठवून त्यावर संस्करण केल्यास ते पिण्यासाठीही वापरता येते. याशिवाय हे जल उद्योग, सिंचन, इतर घरगुती वापरासाठी, स्वच्छतेसाठी व बागकामासाठी वापरता येते.
जल हे अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. उद्योगधंदे, शेती, घरगुती वापर इत्यादींसाठीही पाण्याची गरज वाढली आहे. काही देशांत पावसाळा वगळता इतर काळात पाण्याची टंचाई अगदी तीव्रतेने जाणवते. त्यासाठी जगातील विविध देशांत आधुनिक तंत्राच्या साहाय्याने पर्जन्यजल साठवण केली जाते. चीन, ब्राझील, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ग्रेट ब्रिटन., भारत इत्यादी देशांत पर्जन्यजल साठवण प्रकल्प राबविले जात आहेत. भारतात तमिळनाडू राज्यात प्रत्येक घरागणिक पर्जन्यजल साठवण अनिवार्य केल्यामुळे गेल्या पाच वर्षांत तेथे पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले आहे. यामुळे चेन्नईमध्ये पर्जन्यजल पातळीत ५०% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पुणे शहरात नव्या गृहनिर्माण संस्थेतील प्रत्येक घरासाठी पर्जन्यजल साठवण अनिवार्य केली आहे. असे प्रकल्प मान्सून पर्जन्य क्षेत्रात, विशेषत: पर्जन्यछायेच्या प्रदेशात राबविले तर लोकांची पाण्याची गरज काही अंशी पूर्ण होऊ शकते. परिणामी पाण्याचे संधारण होऊन ते पर्यावरणाला पूरक ठरते.
भारतातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही काही विज्ञान संस्था, अशासकीय संस्था व पर्यावरणप्रेमी संस्था यांच्या वतीने पर्जन्यजल साठवण प्रकल्प राबविले जात आहेत आणि जनजागृती केली जात आहे.