जपानी काव्यप्रकार. तीन ओळींचा, सतरा शब्दावयवांचा (अक्षरावयवांचा), मितभाषी व बंदिस्त घाट असलेलाहा काव्यप्रकार जपानमध्ये विशेष लोकप्रिय आहे. यामध्ये पहिल्या ओळीत पाच, दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा पाच शब्दावयव, अशी रचना असते. हा प्रकार ‘तांका’ या पाच ओळींच्या जपानी काव्यप्रकारातून उदयास आला. त्यातील पहिल्या तीन ओळींचा होक्कू हायकू, हायकाई म्हणून प्रसिद्ध झाला. हायकूरचनेचा मुख्य विषय ऋतू अथवा निसर्ग असतो. निसर्गप्रतिमांतून प्रतीत होणारी अतिशय तरल, चिंतनशील, सूक्ष्म व अनाकलनीय अशी क्षणचित्रे त्यामधून साकारली जातात. उत्स्फूर्त काव्याविष्कार, बंदिस्त घाट आणि निसर्गप्रतिमांचा प्रतीकात्मक वापर हे हायकूच्या घडणीचे महत्त्वाचे पैलू होत.झेन तत्त्वज्ञान व त्यातून उदयास आलेली चिनी चित्रकलेची एक शाखा यांचा मोठा प्रभाव हायकूवर आढळतो. वर्तमान क्षण सर्व संवेदना-शक्तींसह उत्कटतेने व पूर्णत्वाने जगणे आणि माणूस हा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग मानणे, ही झेन तत्त्वज्ञानाची तत्त्वे हायकूरचनेस अतिशय प्रेरणादायी ठरली.
सोळाव्या शतकात उदयास आलेली जपानी हायकूची ही काव्यपरंपरा सतराव्या शतकात श्रेष्ठ जपानी कवी मात्सुओ बाशो याने जपानी साहित्य- सृष्टीमध्ये अधिक समृद्ध केली. मनुष्य आणि निसर्ग ह्यांची एकरूपता ह्या झेन तत्त्वज्ञानातील तत्त्वांचा प्रभाव त्याच्या हायकूरचनेवर विशेषत्वाने आढळतो. मात्सुओ बाशो, ⇨ योसा बुसान (तानिगुची बुसान) व कोबायाशी इस्सा हे जपानी साहित्यातील उल्लेखनीय हायकूरचनाकार. शिकी, सुरूकी, ओनित्सुरा, सोसकी, योकन या जपानी कवींनीही हायकूरचना केल्या.विख्यात मराठी कवयित्री शिरीष पै यांनी मराठी काव्यसृष्टीमध्ये या काव्यप्रकारास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आशय व तांत्रिक दृष्ट्या हा काव्यप्रकार मराठीमध्ये रुजविण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या काही स्वतंत्र व अनुवादित हायकूरचना मी-माझे-मला, हेही हायकू, फक्त हायकू इ. काव्यसंग्रहांमध्ये अंतर्भूत आहेत. हायकू : प्रवृत्ती आणि परंपरा हा त्यांचा प्रसिद्ध समीक्षाग्रंथ होय. शिरीष पै यांच्या मते, जपानी काव्याच्या संकेताप्रमाणे निसर्गाच्या घटनेशी जेव्हा आपण संबंधित असतो, त्याच वेळी तो आपल्याला अस्सल स्वरूपात भेटतो. निसर्गातील एखादे दृश्य किंवा एखादी नाट्यपूर्ण घटना कवी बघतो आणि अचानक त्या दृश्याशी, घटनेशी त्याच्या अंतर्मनाची तार जुळून जाते आणि त्या विशिष्ट क्षणाची नोंद तो ‘हायकूत करतो.
उदा., आभाळ भरून आलयं गच्च
बोलू नका कोणी
डोळ्यात तुडूंब पाणी
ख्यातनाम मराठी कवयित्री शांता शेळके यांनीही या काव्य-प्रकारातील काही कवितांचे मराठीमध्ये स्वैर भावानुवाद केले. त्यांच्या मते, तीन ओळींचा अल्पाक्षर आणि गतिमान रचनाबंध हे मूळ जपानी हायकूचे रूप. चित्रमयता, भावोत्कटता, निसर्ग आणि मानव यांतील अभेद्यता, अल्पाक्षर रमणीयता, धावता क्षण शब्दबद्ध करून त्याला चिरस्थायीरूप देण्याची प्रवृत्ती, निसर्गाची ओढ, जीवनचिंतन हे हायकूचे ठळक विशेष. यातून मूळ हायकूचा रूपबंध स्पष्ट होतो. पहिल्या दोन ओळींत जी कल्पना असते, त्याला एकदम धक्का देणारी वेगळीच कल्पना तिसऱ्या ओळीत असते. आशय कोणत्याही प्रकारचा असो, ही तांत्रिक बाजू यात प्रकर्षाने जपली जाते.
उदा., देवळातल्या घंटेवर
विश्रांती घेताना हे
फुलपाखरू झोपी गेलेले
ऋचा (संपा., रमेश पानसे), ऋतूरंग या नियतकालिकांचे हायकूवर स्वतंत्र विशेषांक प्रकाशित झाले आहेत. मराठीमध्ये या काव्यप्रकाराला पुढे नेण्याचा प्रयत्न राजन पोळ, पु. शि. रेगे, सुरेश मथुरे,अंजली पोळ, सुचिता कातरकर, तुकाराम खिल्लारे इ. कवींनी केला आहे. मराठीप्रमाणेच गुजराती, सिंधी इ. भारतीय भाषांच्या काव्यामध्येही हायकूरचना आढळते.