तोसा निक्की : अभिजात जपानी साहित्यातील रोजनिशी साहित्यातील प्रथम साहित्यकृती. कि नो त्सुरायुकी हा या कलाकृतीचा कर्ता. कि नो त्सुरायुकी (इ.स. ८७२ – ९४५) हा जपानी आणि चिनी लिपीवर प्रभुत्व असलेला प्रसिद्ध कवी आणि रोजनिशीकार म्हणून प्रसिद्ध आहे. कोकिन वाकाश्यु या वाका (अभिजात जपानी साहित्यातील अल्पाक्षरी कविता) कवितांच्या संग्रहाचाही तो संकलक आहे. वाका कविता लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जपानमधील ३६ चिरंजीवी कवींपैकी त्सुरायुकी एक आहे. ही रोजनिशी त्सुरायुकिने इ.स. ९३५ मध्ये लिहिलेली आहे. आताच्या जपानमधील शिकोकु बेटावरच्या तोसा प्रांताचा राज्यपाल म्हणून त्सुरायुकिने कार्यभार सांभाळला. तेव्हाची राजधानी हेइआनक्यो (आत्ताचे क्योटो) पासून पहिल्यांदाच त्याच्यावर लांब राहायची वेळ आली होती. तिथले कामकाज संपल्यानंतर बोटीने प्रवास करून तो राजधानीस परत आला. ह्या २०० मैल परतीच्या प्रवासासाठी त्याला ५५ दिवस लागले. ह्या ५५ दिवसांची रोजनिशी म्हणजे तोसा निक्की. ह्या प्रवासात त्याला लहरी हवामान, खवळलेला समुद्र, चाच्यांची भीती ह्यामुळे सतत काळजी आणि चिंता वाटत होती. तोसा प्रांत सोडायच्या आधी त्याच्या मुलीचे निधन झाल्याने त्या दु:खातून तो बाहेर पडला नव्हता. त्याची ही  मन:स्थिती ह्या रोजनिशीमधून दिसून येते. दिवसभर छोट्या बोटीतून प्रवास आणि रात्री नजीकच्या किनार्‍यावरचा मुक्काम हा त्याचा नित्यक्रम होता. हा प्रवास त्याच्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या दमवून टाकणारा होता. ही रोजनिशी पूर्णपणे जपानी लिपी हिरागानामध्ये लिहिली आहे. हेइआन कालखंडामध्ये पुरुष लिखाण करण्यासाठी चिनी लिपी कांजिचा वापर करत असत. असे असून त्याने हिरागाना या जपानी लिपिचा वापर केला आहे. हिरागाना लिपिचा वापर स्त्रिया करत असत. त्यामुळे ही रोजनिशी त्याच्या बोटीवरच्या लव्याजम्यातल्या एका स्त्रीने लिहिली आहे असे एक मत आहे. मात्र रोजनिशीमध्ये आलेल्या विनोदावरून ही रोजनिशी एका पुरुषाने लिहिल्याचे स्पष्ट होते.

या रोजनिशीचे लिखाण त्सुरायुकीने क्योटोला परत आल्यानंतर केले. ह्या रोजनिशीमध्ये काही खरे आणि काही काल्पनिक प्रसंग आले आहेत. ह्या प्रसंगांची वीण अतिशय उत्कृष्टपणे त्याने गुंफली आहे. हेइआन कालखंडामध्ये रोजनिशी लिहिताना गद्य आणि पद्य दोन्हीचा वापर केला जात असे. त्याप्रमाणेच या रोजनिशीमध्येसुद्धा अधूनमधून गीतांचा वापर केला आहे. ही गीते प्रामुख्याने बोटीवरची आहेत. ह्या गीतांमधून हेइआन कालखंडांची संस्कृती दिसून येते. जपानी साहित्यामध्ये बोटीवरची गीते लिहिली गेलेले हे एकमेव उदाहरण आहे. त्सुरायुकिची बोट जिथे थांबून मुक्काम करायची तिथे निरोप देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात असत. भेटी पण दिल्या जात असत. या रोजनिशीमध्ये अशा निरोप समारंभांची वर्णने खूप वेळा येतात. तसेच त्याच्या मुलीच्या मृत्यूचा उल्लेख वारंवार येतो अशी टीका केली जाते. जपानी साहित्यामध्ये साहित्यिक रोजनिशीची सुरुवात तोसा निक्की या रोजनिशीने झाल्याने तिला महत्त्व आहे. प्रवासवर्णन म्हणूनही ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे. या रोजनिशीचा इंग्रजी भाषेमध्ये तोसा डायरी ह्या नावाने अनुवाद झाला आहे.

संदर्भ :

  • Kodansha, Kodansha Encyclopedia Of Japan, New York,1983.

समीक्षक : निस्सीम बेडेकर