हेइके मोनोगातारी : प्रसिद्ध जपानी युद्धकथा. याच्या लेखकाच्या नावाबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. इ. स. १३३० मध्ये त्सुरेझुरेगुसाचे लेखन करणार्‍या योशिदा केनकोच्या मते शिनानो प्रांताच्या पूर्व राज्यपाल युकिनागा ह्याने ही कादंबरी लिहिली असावी. ह्या कादंबरी मध्ये चिनी आणि जपानी अक्षरे वापरली गेली आहेत. त्यामुळे एखाद्या शिक्षित व्यक्तीचे हे काम आहे. युकिनागाने बौद्ध भिक्षुना सामुराइ योद्ध्यांच्या युद्ध पद्धती, शस्त्रे याबद्दल माहिती करून घेण्यासाठी पाठवले होते. त्याचा उपयोग कादंबरी लिखाणात केला गेला असावा. कादंबरीच्या लिखाणानंतर ती श्योबुत्सु ह्या अंध भिक्षुला सांगण्यात आली. त्या वेळच्या मौखिक परंपरेप्रमाणे हेइके मोनोगातारी ही एका कडून दुसर्‍याला सांगितली गेली. त्यामुळे त्यात काही बदल पण झाले असावेत.

इ. स. १३३० च्या आधी लिहिली गेलेली “हेइके मोनोगातारी” ही युद्धकथा म्हणून प्रसिद्ध आहे. कामाकुरा कालखंडामध्ये सामुराइ योद्ध्यांचा उदय झाला. ह्या काळामध्ये यादवी युद्धे होत होती. कामाकुरा कालखंडाच्या सुरूवातीला हेइशी आणि गेनजी हे दोन शक्तीशाली गट होते. त्यातला हेइशी हा गट सुरूवातीला खूप शक्तीशाली होता. परंतु हेइशी गटाचा प्रमुख ताइरानो कियोमोरी अतिशय अहंमन्य होता. हेइके घराणे सोडून बाकी सगळे हे प्राण्यांच्या योग्यतेचे आहेत असे त्याचे म्हणणे होते. त्याच्या ह्या मग्रुरीमुळे लोकांच्या मनात असंतोष होता. अश्या वेळी सम्राटाच्या मदतीने गेनजी घराण्याच्या मिनामोतो नो योरितोमोने हेइके घराण्या बरोबर युद्ध करून त्यांचा पुर्णपणे निप्पात केला. ही कथा हेइके मोनोगातारीमध्ये सांगितली आहे. हे एक इतिवृत्त आहे. ह्या कादंबरी मध्ये कांजी म्हणजेच चीनी अक्षरे आणि काना म्हणजे जपानी अक्षरे ह्यांचा वापर केला आहे. ह्या कादंबरीमध्ये पूर्णत: गद्याचा वापर केला आहे. ह्या कथा सांगताना बिवा ह्या तंतुवाद्याचा वापर केला जात असे. मध्ययुगीन कालखंडातल्या ह्या कादंबरी मध्ये बौद्धधर्मातील “जीवन क्षणभंगुर आहे” ही कल्पना वर्णन केलेली प्रामुख्याने दिसून येते. हेइके मोनोगातारीच्या सुरुवातीस म्हटले आहे  की “गिओनश्योज्या ह्या देवळामध्ये वाजणार्‍या घंटेचा आवाज सांगतो की ह्या जगातल्या सर्व गोष्टी कायम टिकत नाहीत. गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्याच्या मृत देहावर अर्पण केलेल्या श्यारासोज्युच्या फुलांचा रंग बदलला. ह्यावरून हेच दिसून आले की वैभवाच्या टोकावर असलेल्या माणसाला देखील कधीतरी दारिद्र्य येते. उच्चकुलीन व्यक्तीची सुद्धा कायम तशीच स्थिती असेल असे नसते. वसंत ऋतूच्या रात्री बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे जीवन हे क्षणभंगुर आहे. शक्तीमान वीरपुरुषसूदधा काळाच्या प्रवाहात नाहीसा होतो. सोसाट्याच्या वार्‍यामुळे उडून जाणार्‍या रस्त्यातल्या धुळी प्रमाणे.”

ह्या कादंबरीमध्ये तीन भाग दिसून येतात. पहिल्या भागात ताइरा नो कियोमोरी हे प्रमुख पात्र आहे. दुसर्‍या भागामध्ये मिनामोतो नो योशिनाका ह्या मिनामोतो जनरल बद्दल लिहिले आहे. तिसर्‍या भागामध्ये मिनामोतो नोयोशित्सुने ह्या दिग्गज सामुराइ योद्धयाबद्दल लिहिले आहे. हेइके मोनोगातारी मध्ये जीवनाची क्षणभंगुरता ह्या बौद्ध धर्माच्या विचारा बरोबर कर्माचा विचार मांडला आहे. जो जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते. ताइरा नो कियोमोरिने फक्त तिरस्कार, द्वेष केला. अत्यंत क्रूरपणे तो वागला. त्यामुळे त्याचा शेवट पण वाईट झाला. त्याचे मृत शरीर सुद्धा गरम लागत होते इतका त्याच्या अंगात तिरस्कार भरला होता. त्याचे शरीर नदीच्या पाण्यात ठेवून थंड करावे लागले होते. हेइके मोनोगातारी चे इंग्रजी The Tale of Heike मध्ये  ह्या नावाने भाषांतर करण्यात आले आहे.

संदर्भ :

समीक्षक : निसीम बेडेकर

Keywords : #平家物語