पाचुंदा हा लहान वृक्ष कॅपॅरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅपॅरिस ग्रँडिस आहे. तरटी, वाघाटी इत्यादी वृक्षांचा समावेश कॅपॅरिस प्रजातीमध्ये केला जातो. भारतातील डोंगराळ भागात, विशेषेकरून पश्‍चिम घाट व दक्षिण पठाराचा भाग आणि राजस्थान या प्रदेशांत तसेच श्रीलंका, म्यानमार इत्यादी देशांतही तो आढळून येतो.

पाचुंदा (कॅपॅरिस ग्रँडिस ) : पाने, फूल आणि फळे यांसह फांदी.

पाचुंदा वृक्षाची उंची ३–६ मी. असते. खोडाची साल जाड, मऊ, खडबडीत आणि भेगाळलेली असते. फांद्यांवर हुकासारखे वाकडे व लहान काटे असतात. पाने साधी, लहान व एकाआड एक असतात. पानांवर शेवाळी रंगाची मुलायम लव असते. फुले नाजूक व पांढरी असून मंद सुवासिक असतात. फुलामध्ये चार पाकळ्या असून त्या सुट्या असतात. पुंकेसर अनेक व सुटे असून अंडाशय जायांगधरावर उचलले असल्यामुळे पुंकेसर ठळकपणे दिसतात. फळे लहान बोरांएवढी व हिरवी असून पिकल्यावर लाल होतात. फळांत चिकट  गर आणि २–६ लांबट बिया असतात. बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो.

पाचुंद्याचे लाकूड मजबूत व टिकाऊ असते. त्याचा उपयोग शेतीची अवजारे, हत्यारांच्या मुठी तसेच दांडे अशा किरकोळ वस्तू बनविण्यासाठी करतात. या वृक्षाचा कोळसा चांगला होतो, म्हणून त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा