पाडळ या पानझडी वृक्षाचा समावेश बिग्नोनिएसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव स्टेरिओस्पर्मम चेलोनॉइडिस आहे. बिग्नोनिया चेलोनॉइडिस, बिग्नोनिया सॉव्हिओलन्स, स्टेरिओस्पर्मम सॉव्हिओलन्स अशा शास्त्रीय नावांनीही तो ओळखला जातो. निळा गुलमोहोर व टेटू हे वृक्ष देखील बिग्नोनिएसी कुलातील आहेत. पाडळ वृक्ष मूळचा आशिया खंडाच्या उष्ण भागातील आहे. भारतात हिमालय आणि पश्चिम घाट येथील सदाहरित वनांमध्ये तो आढळतो.

पाडळ हा मोठ्या आकाराचा निमसदाहरित वृक्ष आहे. तो १०–२० मी. उंच वाढत असून खोडाचा घेर १००–१५० सेंमी. असतो. खोडाची साल खडबडीत व पिवळसर-तपकिरी असते. पाने संयुक्त, मोठी व समोरासमोर असतात. पर्णिका ७, ९ किंवा ११ असतात. मार्च–मे महिन्यांत या वृक्षाला पालवी फुटते. याच सुमारास फांद्यांच्या टोकांना फुलोऱ्यांत तुतारीसारखी फुले लोंबताना दिसतात. फुले मध्यम आकाराची व सुगंधी असतात. फुलांच्या पिवळ्या पाकळ्यांवर तांबूस जांभळ्या रेषा असतात. पुंकेसर चार असून त्यांपैकी दोन मोठे आणि दोन लहान असतात. फळ शेंगेच्या स्वरूपात असून ते ३०–५० सेंमी. लांब आणि १–२ सेंमी. जाड असते. बिया अनेक, चपट्या, हलक्या व पंखधारी असतात. फळ दोन भागांत तडकून बिया बाहेर पडतात. बीजप्रसार वाऱ्यामार्फत होतो.

पाडळाचे लाकूड कठीण व टिकाऊ असून ते तपकिरी रंगाचे असते. त्याचा वापर इमारती लाकूड, फर्निचर, बैलगाड्या, होड्या आणि शेतीची अवजारे बनविण्यासाठी होतो. पाने, फुले आणि फळे यांचा काढा तापावर देतात. बागेमध्ये आणि रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी पाडळ उपयुक्त आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.